Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९

प्रादेशिक पक्षांना थारा देऊ नका!
मुंबई २६ एप्रिल/प्रतिनिधी
भाषा आणि प्रांताच्या नावाखाली काही लोक जनतेला भडकविण्याचे काम करीत असले तरी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईला वाचविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून (एन.एस.जी. कमांडो) हात पुढे आले होते याची आठवण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज करून दिली.तसेच ही राष्ट्रीय निवडणूक असल्याने संकुचित प्रादेशिकवादाला थारा देऊ नका, असे आवाहन करीत शिवसेना व मनसेला चार हात लांबच ठेवा, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

दिल्ली डेअरडेव्हिल्स
जीते है दिलशान से
पोर्ट एलिझाबेथ, २६ एप्रिल / वृत्तसंस्था

तिलकरत्ने दिलशानने ४७ चेंडूत केलेल्या दोन षटकार व पाच चौकारांसह केलेल्या ६७ धावा आणि मिथुन मन्हासने त्याला १३ चेंडूंत २३ धावा करून दिलेली तोलामोलाची साथ यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. प्रथम फलंदाजी करताना बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने केलेल्या ७ बाद १४९ धावांना प्रत्युत्तर देताना दिल्लीने सहा विकेट्स शिल्लक राखून १५०धावा केल्या.दिलशानलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. बंगलोरला आज राहुल द्रविडची उणीव जाणवली.
(किंग्ज XI पंजाब जीते है रॉयल से)

लिट्टेने जाहीर केला शस्त्रसंधी; मात्र सरकारला हवी शरणागती
कोलंबो, २६ एप्रिल/पी.टी.आय.

सरकारने चोहोबाजूंनी कोंडी केली असल्याने अत्यंत नाईलाजाच्या परिस्थितीत लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळी इलमने (तामिळी वाघ) आज एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केला. मात्र सरकारने ही शस्त्रसंधी धुडकावून लावला आहे. सर्व तामिळी बंडखोरांनी प्रथम शरण यावे, असे सरकारने फर्मावले आहे. दरम्यान, २३ तामिळी बंडखोरांनी आज सकाळी श्रीलंकेच्या लष्करापुढे शरणागती पत्करली. तामिळी वाघांचे विशेष गणवेश फेकून साध्या पोषाखात हे बंडखोर शरण आल्याचे लष्करी प्रवक्ता उधव ननयाकर याने सांगितले. यापुढे आणखी तामिळी वाघ शरण येतील, अशी अपेक्षा प्रवक्त्याने व्यक्त केली.

खुर्चीची भक्ती बुडविण्यासाठी देशभक्तीला विजयी करा- मोदी
कल्याण, २६ एप्रिल/प्रतिनिधी

गेली साठ वर्षे सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेल्या खुर्चीभक्तीला उखडून टाकण्यासाठी देशाचे संरक्षण, बळकट अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणाऱ्या देशभक्तीला विजयी करा. यासाठी शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मते द्या, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार जगन्नाथ पाटील यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, भाजपचे राष्ट्रीय महासचिव गोपीनाथ मुंडे, आ. हरिश्चंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे, महापौर रमेश जाधव, सेनेचे उमेदवार आनंद परांजपे आदी उपस्थित होते. मोदी म्हणाले, साठ वर्षांत काँग्रेसच्या राजवटीमुळे जनता ग्रस्त झाली आहे. महागाई, बेरोजगाई, उद्योग बंद होत असल्याने नवे आर्थिक संकट रोखण्याची या राजवटीची हिंमत नाही, म्हणून जनतेने दोन टप्प्यांत सुमारे ६० टक्के मतदान करून काँग्रेसला झटका दिला आहे. देशात यामुळे परिवर्तनाची लाट आली आहे.

मराठी टक्का कमी करण्याचे षड्यंत्र
हाणून पाडा - राज ठाकरे

ठाणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी
उत्तर भारतातून महाराष्ट्रात लोंढेच्या लोंढे आणून आणि त्यांना येथे छटपूजेच्या नावाखाली संघटित करून मुंबई-ठाण्यातील मराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. ते वेळीच उद्ध्वस्त करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात केले. शिवसेनेच्या राजकारणावर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यातील सेंट्रल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी हे आवाहन केले. त्यावेळी व्यासपीठावर मनसेचे सतीश प्रधान, तिन्ही मतदारसंघातील उमेदवार राजन राजे (ठाणे), वैशाली दरेकर (कल्याण) आणि डी. के. म्हात्रे (भिवंडी) आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

गवळीपाठोपाठ पोलिसांनाही द्यावा लागला ‘प्रोटेक्शन मनी’
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी
संघटित गुन्हेगारीतून आमदार बनलेल्या अरुण गवळीला ‘प्रोटेक्शन मनी’ देणाऱ्या अनेक बिल्डर्स, बुकी, मटकाकिंग, बारमालकांची नावे अंतर्भूत असलेली छोटी लाल डायरी सध्या चर्चेचा विषय असली तरी या डायरीत नावे आल्याने पोलिसांचा ससेमिरा चुकवितानाच या संबंधितांना पोलिसांनाही ‘प्रोटेक्शन मनी’ द्यावा लागल्याची उदाहरणे बाहेर येत आहे. अर्थात याबाबत कागदोपत्री पुरावा हाती लागणे शक्य नसले तरी अशा पद्धतीचा व्यवहार झाल्याची कुणकुण आपल्या कानावर आल्याचे एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना मान्य केले. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी हा त्याच्या साथीदारांसह सध्या ‘मोक्का’अंतर्गत तुरुंगात आहे. गवळीचा विश्वासू साथीदार सुरेश पाटील याच्याकडून गवळीच्या व्यवहाराची नोंद असलेली दोनशे पानांची लाल डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत स्फोटक माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पाकिस्तानमध्ये शाळेतील बॉम्बस्फोटात १३ विद्यार्थिनी ठार
इस्लामाबाद, २६ एप्रिल/पी.टी.आय.

वायव्य सरहद्द प्रांतामधील दिर जिल्ह्यातील एका मुलींच्या शाळेबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात १३ विद्यार्थिनी ठार, तर ४० विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. हा बॉम्ब शाळेबाहेर एका खेळण्यामध्ये ठेवण्यात आला होता. शाळेतील मुली हे खेळणे हाताळत असताना भीषण बॉम्बस्फोट झाला. येथील लाकमान बंदा गावात ही प्राथमिक शाळा आहे. शाळेतील विद्यार्थिनींना हे खेळणे शाळेच्या आवारात सापडले. त्याच्याशी खेळत असताना त्यातील बॉम्बचा स्फोट झाला. यात १३ विद्यार्थिनी ठार झाल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला आहे. मात्र सरकारी अधिकाऱ्यांकडून मृत विद्यार्थिनींचा आकडा सात सांगितला जात आहे. ४० विद्यार्थिनी या स्फोटात जखमी झाल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. मृत विद्यार्थिनी ४ ते १२ वयाच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. मलकंद प्रांतामध्ये शरिया कायद्याला विरोध करणारी धोरणे या भागात लावल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेला हा अशाप्रकारचा पहिलाच हल्ला आहे.

कसाबच्या खटल्याबाबत गांभीर्याचा अभाव -जेटली
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याच्यावरील खटला पुरेशा गांभीर्याने हाताळला जात नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी आज येथे केली.
कसाबचा चुकीचा डीएनए अहवाल पाकिस्तानला पाठविण्यात येतो. कसाबच्या आईला आपल्याला भेटण्याची इच्छा आहे, या परराष्ट्र व्यवहारमंत्री प्रणब मुखर्जी यांच्या विधानाचीही जेटली यांनी खिल्ली उडवली. कसाबच्या आईला व्हिसा दिल्याशिवाय ती कसाबला कशी भेटणार, असा सवालही या वेळी जेटली यांनी केला. दरम्यान, फ्रेण्डस ऑफ बीजेपी या कार्यक्रमात अभिनेत्री किरण खेर यांनी जेटली यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे महान प्रशासक आहेत, असा आपल्याला विश्वास आहे, असे या वेळी किरण खेर म्हणाल्या.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी