Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

नांदेडमध्ये हॉटेलमालकास पोलिसांची अमानुष मारहाण
प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांकडून हॉटेलमालकाविरुध्द खोटे गुन्हे दाखल

नांदेड, २६ एप्रिल/वार्ताहर

पोलिसांविरुद्ध तक्रारी करतोस का? अशी विचारणा करत अतिरिक्त पोलीसप्रमुख शहाजी उमाप, पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल येथील प्रसिद्ध हॉटेल झंकारचे मालक दिलीप आघाव यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीनंतर स्वत:वरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आघाव यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्य़ाची नोंद केली. दिलीप आघाव यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. दरम्यान पोलिसांनी कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.नांदेड शहरातल्या श्रीनगर परिसरात दिलीप आघाव यांचे झंकार हॉटेल आहे. काल रात्री ११ वाजता अतिरिक्त पोलीसप्रमुख शहाजी उमाप, पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील हे या भागातून जात होते.

भोवती अंधाराची वीण
अरुणचा मळा शहरापासून एवढा जवळ असेल वाटलं नव्हतं. बाहेरच्या रस्त्याला मोटारसायकल लागल्यावर काही वेळातच, तो रस्ता सोडून कच्च्या रस्त्यावरून आम्ही जात होतो. अरुण पुढे त्याच्या मागं आम्ही. एके ठिकाणी थांबवल्या आमच्या गाडय़ा. रात्रीचे आठ वाजून गेलेले. शहराच्या वर पांढरा उजेड तरंगणारा. आम्ही काळ्या रानाच्या अंगखांद्यावर. धुऱ्यावरच्या पाऊलवाटेनं तो घेऊन जात होता. इकडच्या तिकडच्या पाण्याच्या पाटाचे खड्डे. अंधार. मोबाईल टॉर्चचा कितीसा उजेड पडणार. चिमुकल्या पांढरट प्रकाशात आमची पावलं पडत होती.

घोषणा न करताच औरंगाबादमध्ये आता दोन दिवसाआड पाणी
औरंगाबाद, २६ एप्रिल/प्रतिनिधी

शहरात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणावर कपात झाल्यामुळे शहराच्या काही भागाला सध्या दोन दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. सर्व भागाला एक दिवसाआड पाणी देण्यात येते. तरीही मोठय़ा भागाला दोन दिवसाआड पाणी देण्याबाबत प्रशासनाच्या वतीने कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज आले नाही तर उद्या पाणी नक्की येईल, एवढीच आशा या भागातील रहिवाशांना आहे. नाथसागर भरलेला असतानाही घसा कोरडाच राहणे हीच औरंगाबादकरांची शोकांतिका आहे.

भाजपच्याच मंडळींनी बोगस मतदान केले - रमेश आडसकर
बीड, २६ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदान केल्याचा आरोप चुकीचा असून भाजपच्याच मंडळींनी अनेक गावांत बोगस मतदान केले आहे, असा प्रतिआरोप करून ऐंशी टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झालेल्या मतदान केंद्रांची यादी मागवली असून त्यानंतर बोगस मतदान कोणी केले हे स्पष्ट होईल, असे सांगून माजी मंत्री अशोक पाटील व काँग्रेसने साथ दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आडसकर यांनी केला. बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश आडसकर यांनी शनिवारी दुपारी जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार बैठक घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक डक उपस्थित होते.

वाढीव मतदानाचा फायदा कोणाला याचीच बीडमध्ये चर्चा
बीड, २६ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या मागील नऊ निवडणुकांपेक्षा या वेळी ६६ टक्के विक्रमी मतदान झाले. दुपारनंतर वाढलेल्या २० टक्के मतांचा नेमका फटका कोणाला? याचे अंदाज बांधले जात आहेत. मतांच्या टक्केवारीतील वाढ ही काँग्रेस आघाडीला फायद्याची मानली जाते. मात्र या वेळी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनीही उमेदवार म्हणून भाजपला उघडपणे समर्थन दिल्याने वाढीव मताच्या फायद्याबाबत राजकीय जाणकारांचाही गोंधळ उडाला आहे.

बस उलटून २१ जण जखमी
उस्मानाबाद, २६ एप्रिल/वार्ताहर

भरधाव वेगाने गाडी सुरू असताना वाहक व चालक यांच्यात सुरू असणाऱ्या गप्पांमुळे राज्य परिवहन मंडळाची बस उलटून अपघात झाला. यात २१ जण जखमी झाले आहेत. तरमकुंडी (ता. वाशी) येथील गिरवली फाटय़ाजवळ हा अपघात झाला. वेगाने वळण घेताना झालेल्या या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. किरकोळ जखमींवर वाशी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

धनादेश न वटल्याने दंडासह १५ दिवसांची कैद
नगर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने अरुण एकनाथ पवार (रा. म्हैसगाव, ता. राहुरी) यास १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा व ५ हजार ३०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंजली खडसे यांनी हा निकाल दिला. फिर्यादी श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीतर्फे वकील सुनील मुंदडा यांनी काम पाहिले. चेन्नई येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीची नगरला शाखा आहे. या कंपनीकडून पवार याने मिनिडोरसाठी कर्ज घेतले होते. परतफेडीसाठी त्याने बँकेला धनादेश दिला. मात्र, तो न वटल्याने बँकेने न्यायालयात दावा ठोकला.

वैद्यकीय परिषद सदस्य निवडणूकीत अवघे २५ टक्के मतदान
औरंगाबाद, २६ एप्रिल/खास प्रतिनिधी

९ वर्षांनंतर झालेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. मराठवाडय़ात ९ हजार मतदारांपैकी अवघ्या १२०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात औरंगाबादच्या ५३८ मतदारांचा समावेश होता. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी ७८ हजार मतदार आहेत. ९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात मराठवाडय़ातील डॉ. तुषार चुडीवाल, डॉ. देवडे पाटील व डॉ. शरदचंद्र वानखेडे हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. बीड, नांदेड आणि लातूर येथेही अल्प प्रतिसाद मिळाला आहे. औरंगाबाद शहरात एकूण २२०० मतदार आहेत. त्यापैकी अवघ्या ५३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत २५ टक्केच मतदान झाले आहे. जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका झाल्या. या निवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी मुंबईच्या हाफकिन इन्स्टिटय़ूटमध्ये होणार आहे.

रागाच्या भरात फिनेल प्यायले
औरंगाबाद, २६ एप्रिल/प्रतिनिधी

मिलिंदनगरात राहणाऱ्या १७ वर्षांच्या युवकाने रागाच्या भरात फिनेल प्राशन केले. ही घटना काल सायंकाळी घडली. संदीप रत्नाकर निकम असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ कारणावरून राहत्या घरी त्याने हे कृत्य केले. हा प्रकार लक्षात येताच त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत ताराबाई शिवाजी मालोदे या २३ वर्षांच्या विवाहितेने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले. त्या फुलंब्री तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे दीर पुंडलिक मालोदे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. यामागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मध्यवर्ती बस स्थानकासमोर एकाला लुटले
औरंगाबाद, २६ एप्रिल/प्रतिनिधी

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी हॉटेलच्या पाठीमागे गेले असता बळीराम भगवान काळे (३२, रा. मध्यवर्ती बस स्थानकासमोर) यांना दोघांनी लुटले. ही घटना शनिवारी घडली. इमाम सादिक तांबोळी आणि रईस बोक्या या दोघांनी त्यांना मारहाण करून अडीच हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचे काळे यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. इमाम आणि रईस यांनी त्यांच्या खिशातील दीड हजार रुपये रोख आणि एक हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. त्याआधी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. आठ हजार रुपयांचा ऐवज पळविला अन्य एका घटनेत चोरटय़ांनी मधुसूदन अंजी रेड्डी (रा. एन-४) यांच्या घरातून ७९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ते कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील चांदीचे चार शिक्के, डीव्हीडी, मनगटी घडय़ाळ, नळाच्या तोटय़ाही पळवून नेल्या. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

दोन गटांत हाणामारी; झोपडय़ांची जाळपोळ
हिंगोली, २६ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील भटसावंगी येथील बंजारा समाजाच्या दोन गटांत जबर हाणामारी होऊन एकमेकांनी एक दुसऱ्याच्या झोपडय़ांना आग लावून नुकसान केल्याची घटना घडल्याने दोन्ही गटांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. रामधन राठोड याच्या शेतात आरोपी शामराव जाधव, विजय जाधव, जांबी वकील आढे, संदीप जाधव, विनोद जाधव, भोपळ्या जाधव यांनी अनधिकृतरीत्या शेतात प्रवेश करून आमच्या शेतात तारेचे कुंपण का घातले, या कारणावरून शनिवारी सकाळी आठच्या सुमारास लाठय़ाकाठय़ा, कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले व शेतातील झोपडीजाळून टाकल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास शामराव जाधव घरासमोर उभा असताना आरोपी रामधन राठोड, सुरेश, तुकाराम राठोड, बबन जाधव यांनी शामराव जाधवला लाठय़ाकाठय़ाने जबर मारहाण करून जखमी केले व फिर्यादीची झोपडी जाळून नुकसान केले. एकमेकांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध बासंबा पोलिसांत गुन्हे दाखल झाल्याची घटना घडली आहे.

राजकीय ज्ञानवर्गाचे औरंगाबादमध्ये उद्घाटन
औरंगाबाद, २६ एप्रिल/खास प्रतिनिधी

पूर्णवाद युवा फोरम संचलित राजकीय ज्ञानवर्गाचे उद्घाटन अॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत तापडिया नाटय़मंदिरात झाले. संस्थेतर्फे भारतीय घटना, अर्थशास्त्र, राजकारण, इतिहास या विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्राला आवश्यक असलेल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाबरोबरच सुजाण नागरिक निर्माण करणे असा प्रयत्न या ज्ञानवर्गाच्या मार्फत केला जाणार आहे, अशी माहिती अॅड. लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी दिली. या वेळी न्यायाधीश प्रमोद देशपांडे, पोलीस उपायुक्त के. के. येळंबकर, अनिल बोकील, उल्हास उढाण, सभापती सुदाम शिंदे, डॉ. उमाकांत राठोड आदी उपस्थित होते. औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी गौरव पुरंदरे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी विष्णू महाराज पारनेरकर यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. रुस्तुम अचलखांब यांचा वाढदिवसानिमित्त जाहिर सत्कार
औरंगाबाद, २६ एप्रिल/खास प्रतिनिधी

येथील लेखक व दिग्दर्शक आणि लोककलावंत डॉ. रुस्तुम अचलखांब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजंता स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने १ मे रोजी जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. स. भु. महाविद्यालयाच्या नाटय़शास्त्र विभागाच्या सभागृहात १ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा होणार आहे. या वेळी डॉ. रुस्तुम अचलखांब यांनी लिहिलेल्या ‘गांधी, आंबेडकर आणि मी’ व ‘रायरंद आख्यान’ या एकांकिकेचे अभिवाचन होणार आहे. रायरंद आख्यानातील रायरंदची भूमिका स्वत: डॉ. अचलखांब सहप्रयोग सादर करणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी या वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. विनय हातोले, शोभा दांडगे, प्रा. किशोर जांगडे, अॅड. रमाकांत भालेराव आणि विद्या जाधव यांनी केले आहे.

बाळूमामाच्या मेंढराच्या कळपाला हद्दपार करण्याची मागणी
औरंगाबाद, २६ एप्रिल/खास प्रतिनिधी

आरोग्यविषयक अवैज्ञानिक दावा करणाऱ्या बाळूमामाच्या मेंढरांच्या कळपावर राज्यात बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन औरंगाबादचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अमितेशकुमार यांना देण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्य़ांत बाळूमामाचा तथाकथित कळप वास्तव्य कळतो. मेंढराच्या सहवासात राहिल्यामुळे मुका बोलायला लागतो, पांगळा चालू लागतो, अंगावरील पांढरे कोड, कर्करोग आणि एचआयव्हीसारखे असाध्य रोग, कौटुंबिक समस्यांपासून देखील मुक्तता मिळते.
एवढेच नव्हे तर मेंढरांना उभ्या पिकात चरू दिले तर बरकत येते. त्यास विरोध केला तर काही अघटित घटना घडते. असा अवैज्ञानिक प्रकार बाळूमामांच्या मेंढराच्या कळपाद्वारे केला जात आहे. मेंढय़ा शेतात बसविण्यासाठी संस्थांच्या नावाने ६०० रुपयांची पावती फाडली जाते. कळपासोबत असलेल्या ७० व्यक्तींच्या जेवणाचा खर्चही घेतला जातो. बाळूमामा संस्थानच्या वतीने सांगण्यात येणारे दावे सत्य असतील तर शासनाने त्यांना मेंढरांच्या कळपाचे संगोपन केंद्र उभारून द्यावे, असे समितीचे म्हणणे आहे.

सिलिकॉनमध्ये प्रोमॅट्रिक परीक्षा सुविधा
औरंगाबाद, २६ एप्रिल/प्रतिनिधी

औरंगाबादमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी सिलिकॉन व्हॅली या संस्थेत प्रोमॅट्रिक परीक्षा केंद्राचा पर्याय खुला झाला आहे, अशी माहिती सिलिकॉनचे संचालक नीलेश गायकवाड यांनी दिली. नाशिक, पुणे, मुंबई, ठाणेपाठोपाठ औरंगाबाद शहरात वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या सिलिकॉन व्हॅली संस्थेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आयटी क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सिलिकॉनमुळे मोठा फायदा झाला आहे. आता मायक्रोसॉफ्ट, सन, ओरॅकलसारख्या कंपन्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने प्रोमॅट्रिक सेंटरमुळे शक्य झाल्या आहेत. इथे एससीएनए हा अभ्यासक्रमही शिकविला जातो. राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख शहरात सिलिकॉन व्हॅलीच्या शाखा आहेत. दहावी, बारावीनंतर आयटीमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे कोर्सेस या ठिकाणी घेतले जातात. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले. या ुवेळी राजेंद्र भापकर उपस्थित होते.

वाहतूक पोलिसाला लाच घेताना पकडले
अंबाजोगाई, २६ एप्रिल/वार्ताहर

अवैध वाहतुकीतून अंबाजोगाई ठाण्याला लाखोंची माया मिळत असली तरी, लाचप्रतिबंधक खात्याच्या कारवाईला एक वाहतूक पोलीस बळी पडला. एका ऑटोचालकाकडून दोन हजारांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. अंबाजोगाईतालुक्यात अॅपे ऑटोची तीन अधिक एकची पासिंग असताना १० ते १५ प्रवासी घेऊन वाहतूक करतात. ऑटोची क्षमता नसतानाही प्रवाशांच्या जीविताशी खेळले जात होते. एवढे प्रवासी वाहतूक करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी कारवाई केली नाही. ऑटोचालक सुरेश पवारने वाहतूक पोलीस एन. आर. हजारे याच्याविरोधात लाचलुचपत विभागात तक्रार केल्यानंतर आज दुपारी न्यायालयाशेजारी असलेल्या ऑटोमोबाईलच्या दुकानासमोर हजारे याला दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिटीकर, जमादार ढोले, खांडे, प्रवीण मोटेगावकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे हप्ते वसूल करणाऱ्या पोलिसांत खळबळ उडाली आहे.

अंबड तालुक्यात तीव्र पाणी टंचाई
अंबड, २६ एप्रिल/वार्ताहर

अंबड तालुक्यात उन्हाचा तापमानाचा पारा वाढण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाईही तीव्र स्वरूप धारण करत आहे. सुमारे ३५ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच ३५ विहिरी अधिग्रहित केल्या असून २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. दरवर्षी पाणीटंचाई निवारण्यासाठी हजारो रुपये खर्च करून उपाययोजना करण्यात येते. मात्र कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केल्यास दरवर्षी होणारा शासनाचा खर्च वाचेल व पाणीटंचाईही जाणवणार नाही. अंबड तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. तालुक्यातील आठ-दहा वाडय़ा व पंचवीस-तीस गावासाठी पाणीटंचाई प्रश्न दरवर्षीच उन्हाळा संपेपर्यंत नित्याचाच झाला आहे. प्रशासन दरवर्षी पाणीटंचाई आराखडा तयार करून लाखो रुपये खर्च करते. मात्र पाणीटंचाईप्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही. ३५ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात टँकर आला की, पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. अधिग्रहित विहिरीवरही गर्दी असते. टँकरच्या फऱ्ेया नियमित होत नाही.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावरान आंबा बाजारात
सोयगाव, २६ एप्रिल/वार्ताहर

पाडव्याला मिळणारा गावरान आंबा यंदा उशिराने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झाला आहे. यंदा गावरान आंब्याचा भाव ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचला. त्यामुळे आंब्याची खरेदी मात्र सर्वसामान्यांच्या खिश्याला न पडवडणारी आहे. फळ बाजारात अजूनही परप्रांतातला आंबा मोठय़ा प्रमाणावर आला आहे. नीलमसारखा आंबा २० ते २५ रुपये किलो विकू लागला. मात्र परराज्यातील आंब्याला चव नसल्याने त्याची विक्री जेमतेम आहे. अक्षय तृतीयेला सणानिमित्त ग्रामीण भागात आमरसाचे जेवण असतेच; त्यामुळे या दिवशी आंब्याला मोठी मागणी असते. अजिंठय़ाच्या डोंगरात वसलेल्या हळदा, डकला, जळकी, वसई या गावांत गावरान आंब्याचे मोठे उत्पादन होते. विशेष म्हणजे येथील आंबा खान्देशात लोकप्रिय आहे.
यंदा विचित्र हवामानच्या फटक्याने आंब्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे आंबा उशिरा बाजारात आला. आंबा उत्पादकाने सांगितले की यंदा आंब्याचे भाव तेजीतच राहणार आहे.

सरपंचांच्या रखडलेल्या मानधनासाठी निधी मंजूर
हिंगोली, २६ एप्रिल/वार्ताहर

जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या झालेल्या मासिक बैठकांचे गेल्या १४ महिन्यांपासून मानधन रखडले होते. त्यांच्या वाटपासाठी २१ लाख ७५ हजारांचा निधी मंजूर होऊन वाटप सुरू झाल्याने सरपंच मंडळी समाधान व्यक्त करीत आहेत. जिल्ह्य़ात ७११ गावांची संख्या तर ग्रामपंचायतची संख्या ५६५ आहे. ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यांना प्रती महिन्यांच्या मासिक बैठकीला सरपंचाला १०० रुपये तर सदस्यांना १० रुपये मानधन मिळते. जिल्ह्य़ातील सरपंच व सदस्यांना जून ०७ ते मार्च २००८ तसेच जून ०८ ते सप्टेंबर ०८ सुमारे १४ महिन्यांचे मानधन रखडले होते. दोन टप्प्यात सदर मानधनाची रक्कम मंजूर झाली. हिंगोली तालुका २ लाख ३४ हजार ८१२ व १ लाख ६७ हजार ७६०, कळमनुरी २ लाख ७७ हजार २८७ व २ लाख १० हजार २३४ रुपये, वसमत २ लाख ४० हजार ७४३ व १ लाख ६१ हजार ९७१ रुपये, औंढा ३ लाख २५५ रुपये व १ लाख ९४ हजार ३२५ रुपये, सेनगाव २ लाख ४१ हजार ८५३ रुपये व १ लाख ४५ हजार ७०० रुपये अशा प्रकारे एकूण २१ लाख ७५ हजार रुपये मानधनाची रक्कम मंजूर झालेली असून हिंगोली तालुक्यात वाटपाचे काम सुरू झाले असल्याने सरपंच मंडळी समाधान व्यक्त करीत आहेत.

खुजडा पाटीजवळ मृतदेह आढळला
परभणी, २६ एप्रिल/वार्ताहर

पूर्णा तालुक्यातील फुकट गाव येथील चंपत रंगनाथ बोकारे (वय ३२) यांचा मृतदेह खुजडा पाटीजवळ आढळून आला. त्यांचा मृत्यू अपघाताने झाला की खून झाला याबाबत गूढ अजूनही कायम आहे. फुक्कट गाव येथील चंपत रंगनाथ बोकारे हे पूर्णा शहरातील एका आडत दुकानावर मुनीम म्हणून काम करत होते. रविवारी (२६ एप्रिल) सकाळी खुजडा पाटीवरील दूध संकलन केंद्राजवळ त्यांचा एक हात तुटलेला तर डोक्यावर जबर जखमा झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती खुजडा येथील पोलीस पाटील यांनी पूर्णा पोलिसात दिली. यामुळे पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली. बोकारे यांचा जखमी झालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे त्यांचा अपघात की खून हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.