Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लिट्टेने जाहीर केला शस्त्रसंधी; मात्र सरकारला हवी शरणागती
कोलंबो, २६ एप्रिल/पी.टी.आय.

सरकारने चोहोबाजूंनी कोंडी केली असल्याने अत्यंत नाईलाजाच्या परिस्थितीत लिबरेशन

 

टायगर्स ऑफ तामिळी इलमने (तामिळी वाघ) आज एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केला. मात्र सरकारने ही शस्त्रसंधी धुडकावून लावला आहे. सर्व तामिळी बंडखोरांनी प्रथम शरण यावे, असे सरकारने फर्मावले आहे.
दरम्यान, २३ तामिळी बंडखोरांनी आज सकाळी श्रीलंकेच्या लष्करापुढे शरणागती पत्करली. तामिळी वाघांचे विशेष गणवेश फेकून साध्या पोषाखात हे बंडखोर शरण आल्याचे लष्करी प्रवक्ता उधव ननयाकर याने सांगितले. यापुढे आणखी तामिळी वाघ शरण येतील, अशी अपेक्षा प्रवक्त्याने व्यक्त केली.
मुल्लाभिवू भागात पुडुकुडीयीरीचु या युद्धबंदी असलेल्या भागात आता ७०० पेक्षा जास्त तामिळी वाघ उरले नसावेत असा अंदाज लष्कराने व्यक्त केला. त्यातच आज सकाळी नौदलाने बंडखोरांच्या तीन नौका बुडवल्या. त्यात १२ तामिळी वाघ मारले गेले. संयुक्त राष्ट्रांनुसार आतापर्यंत ५० हजार तामिळी नागरिकांना लिट्टेच्या बालेकिल्ल्यांतून पकडण्यात आले आहे तर श्रीलंका सरकारने हा आकडा १० ते १५ हजार इतका दिला आहे. आता प्रभाकरन याच्यासमेत असतील तर केवळ ३०० केडर दडून बसले असतील त्यांचेही मनोबल खचल्याने आता ते शस्त्रसंधीची भाषा बोलू लागले आहेत.
लिट्टेने मात्र संयुक्त राष्ट्रे, युरोपीय राष्ट्रे, अमेरिका व भारत यांच्या आवाहनानुसार शस्त्रसंधी जाहीर केली असल्याचे जाहीर केले आहे. या राष्ट्रांनी आता श्रीलंका सरकारवर दडपण आणून आमच्याप्रमाणे शस्त्रसंधीला प्रतिसाद देऊन तामिळींच्या जीविताचे रक्षण करावे.
मात्र या घडीला तामिळी वाघांशी शस्त्रसंधी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे संरक्षणमंत्री गोथाबाय राजपक्ष यांनी म्हटले आहे. लिट्टेच्या सर्व बंडखोरांनी आता शरणागती पत्करावे, असेही ते म्हणाले.