Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

खुर्चीची भक्ती बुडविण्यासाठी देशभक्तीला विजयी करा- मोदी
कल्याण, २६ एप्रिल/प्रतिनिधी

गेली साठ वर्षे सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेल्या खुर्चीभक्तीला उखडून टाकण्यासाठी

 

देशाचे संरक्षण, बळकट अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणाऱ्या देशभक्तीला विजयी करा. यासाठी शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मते द्या, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार जगन्नाथ पाटील यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, भाजपचे राष्ट्रीय महासचिव गोपीनाथ मुंडे, आ. हरिश्चंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे, महापौर रमेश जाधव, सेनेचे उमेदवार आनंद परांजपे आदी उपस्थित होते. मोदी म्हणाले, साठ वर्षांत काँग्रेसच्या राजवटीमुळे जनता ग्रस्त झाली आहे. महागाई, बेरोजगाई, उद्योग बंद होत असल्याने नवे आर्थिक संकट रोखण्याची या राजवटीची हिंमत नाही, म्हणून जनतेने दोन टप्प्यांत सुमारे ६० टक्के मतदान करून काँग्रेसला झटका दिला आहे. देशात यामुळे परिवर्तनाची लाट आली आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या तिजोरीतून ५० हजार कोटी अशासकीय संस्था दिल्याच्या नावाखाली काढण्यात आले आहे, असे ताशेरे ‘कॅग’ने मारले आहेत. मग जनतेच्या कष्टाचे हे पैसे गेले कोठे, असा सवाल मोदींनी केला.
काँग्रेस राजवटीने फक्त खुर्ची भक्ती या अजेंडा वापरला. जनतेला मूर्ख समजले. त्याचे .. काढण्याची वेळ आता आली आहे. शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. देशाचे संरक्षण, विकास-उद्योगांच्या गंगा देणारा देशभक्तीचा अजेंडा आम्ही लालकृष्ण अडवाणींना पंतप्रधान करून जनतेला देऊ, असे मोदी म्हणाले.
दहशतवादाविरुद्ध काँग्रेस सरकार काही करू शकत नाही. परदेशातून काळा पैसा आणण्याची भाषा केल्यानंतर सोनियांचा तीळपापड होतो म्हणजे कोठेतरी काळेबेरे होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
मुंडे म्हणाले, ठोका, माराची भाषा करणाऱ्या वसंत डावखरेंना वेड लागले आहे की काय? त्यांना ‘रासुका’ लावण्याची मागणी त्यांनी केली.