Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गवळीपाठोपाठ पोलिसांनाही द्यावा लागला ‘प्रोटेक्शन मनी’
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी

संघटित गुन्हेगारीतून आमदार बनलेल्या अरुण गवळीला ‘प्रोटेक्शन मनी’ देणाऱ्या अनेक

 

बिल्डर्स, बुकी, मटकाकिंग, बारमालकांची नावे अंतर्भूत असलेली छोटी लाल डायरी सध्या चर्चेचा विषय असली तरी या डायरीत नावे आल्याने पोलिसांचा ससेमिरा चुकवितानाच या संबंधितांना पोलिसांनाही ‘प्रोटेक्शन मनी’ द्यावा लागल्याची उदाहरणे बाहेर येत आहे. अर्थात याबाबत कागदोपत्री पुरावा हाती लागणे शक्य नसले तरी अशा पद्धतीचा व्यवहार झाल्याची कुणकुण आपल्या कानावर आल्याचे एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना मान्य केले.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी हा त्याच्या साथीदारांसह सध्या ‘मोक्का’अंतर्गत तुरुंगात आहे. गवळीचा विश्वासू साथीदार सुरेश पाटील याच्याकडून गवळीच्या व्यवहाराची नोंद असलेली दोनशे पानांची लाल डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत स्फोटक माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणाऱ्या तब्बल दोनशेहून अधिक छोटय़ा मोठय़ा विकासकांची नावे यामध्ये आहेत. याशिवाय बारबालक, बुकी, मटकाकिंग आदींनी किती प्रोटक्शन मनी दिला याचाही उल्लेख आहे. या पैशाचे गवळीच्या आदेशानुसार वाटप होत होते, असे पाटीलने पोलिसांना सांगितल्याचाही दावा केला जात आहे. या डायरीत पोलिसांनाही किती रक्कम दिली जात होती, याचाही उल्लेख आढळतो. मात्र त्याबद्दल मौन धारण करण्यात आले आहे. त्याचवेळी गवळीला प्रोटेक्शन मनी दिलेल्या जवळपास सर्वच विकासकांना पोलिसांचे बोलावणे आले होते. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे अधिकृतपणे सांगितले जात असले तरी गवळीशी तुमचा संबंध प्रस्थापित होऊ नये यासाठी या प्रत्येक विकासकाकडून पोलिसांनाची प्रोटेक्शन मनी मागितला आणि बहुतांश सर्वांनी तो दिल्याचे सांगितले जाते. याबाबत एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला विचारले तेव्हा त्याने तशी कुणकुण आपल्या कानावरही आली. परंतु कुणीही विकासक तक्रार करण्यासाठी पुढे न आल्याने आम्हाला काहीच करता येत नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. साधारणत: पाच-सहा महिन्यांपूर्वी आपल्याला बोलावणे आले होते. आपला गवळीशी काहीच संबंध नसल्याने आपण बिनधास्तपणे गेलो. मात्र आपल्यावरच गुन्हा दाखल होईल, असे धमकावल्याने आपण घाबरलो. त्यानंतर पोलिसांकडूनच ‘प्रोटेक्शन मनी’साठी आपल्याला संदेश आला. काहीही झंझट नको म्हणून आपण त्यास मान्यता दिली. एका खासगी व्यक्तीमार्फत पोलिसांनी ‘प्रोटेक्शन मनी’ स्वीकारल्याचे एका विकासकाने सांगितले. आपण याबाबत तक्रार का केली नाही त्यावर तो विकासक म्हणाला की, पोलिसांशी दुश्मनी नको म्हणूनच आपण काही केले नाही.