Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रादेशिक पक्षांना थारा देऊ नका!
मुंबई, २६ एप्रिल / खास प्रतिनिधी

भाषा आणि प्रांताच्या नावाखाली काही लोक जनतेला भडकविण्याचे काम करीत असले तरी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईला वाचविण्यासाठी देशाच्या

 

कानाकोपऱ्यातून (एन.एस.जी. कमांडो) हात पुढे आले होते याची आठवण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज करून दिली. तसेच ही राष्ट्रीय निवडणूक असल्याने संकुचित प्रादेशिकवादाला थारा देऊ नका, असे आवाहन करीत शिवसेना व मनसेला चार हात लांबच ठेवा, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला.
मुंबईतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना सोनिया गांधी यांनी शिवसेने-भाजपबरोबरच मनसेला लक्ष्य केले होते. सोनिया गांधी यांनी प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढविला असला तरी योगायागाने कालच मुंबईत झालेल्या मेळाव्यात बोलताना काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छोटय़ा व प्रादेशिक पक्षांचे समर्थन करताना या पक्षांच्या वाढीस काँग्रेसलाच जबाबदार धरले होते. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया असले तरी मुंबई ही नगरी देशाची गेटवे आहे. छत्रपती शिवाजी महाजारांमुळे मुंबई व महाराष्ट्राला वेगळी हिंमत लाभली आहे. यामुळेच २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईचे जनजीवन सुरळीत होण्यास फारसा वेळ लागला नाही. अन्य कोणते शहर असते तर पुन्हा उभे राहण्याकरीता अधिक कालावधी लागला असता. मुंबईकरांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशातील असा एकही प्रांत नाही की तेथील लोक मुंबईत राहात नाहीत. मुंबईच्या विकासात त्यांचे योगदान आहे. मात्र भाषेच्या नावाखाली परप्रांतीयांना मुंबईत लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या रोजगाराचा हक्क डावलला जात आहे. जाती व धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष कदापिही सहन करणार नाही, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला.
दहशतवाद आणि मंदीच्या संकटांचा सामना करण्यासाठी केंद्रात स्थिर आणि बळकट सरकारची गरज आहे. अशा वेळी गेली पाच वर्षे स्थिर सरकार देणाऱ्या काँग्रेस पक्षालाच पुन्हा निवडून देण्याचे आवाहन सोनियांनी केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे अनुभवी, प्रामाणिक नेतृत्व काँग्रेसकडे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी गतवेळप्रमाणेच मुंबई काँग्रेसला साथ देईल, असा विश्वास व्यक्त केला. भाजप सरकारच्या तुलनेत काँग्रेसप्रणित सरकारने गेल्या पाच वर्षांंमध्ये जास्त निधी मुंबईच्या विकासाला उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. मुंबईत राहणाऱ्यांना परप्रांतीय व अल्पसंख्यांकाना इजा पोहचणार नाही याची खबरदारी राज्य सरकार घेईल, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी अयोध्येत राममंदिर भाजपला कधीच उभारता येणार नाही. हे काम आम्हीच करू, असे सांगितले. या वेळी शिवराज पाटील, गुलाम नबी आझाद, विलासराव देशमुख, माणिकराव ठाकरे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित सावंत यांनी केले.
सुरक्षेचा फटका राज्यमंत्री व माजी विधानसभा अध्यक्षांना!
वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या सभेच्या वेळी सुरेक्षाचा फटका अनेकांना बसला. विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप यांना सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून सुमारे तासभर ताटकळावे लागले. बराच वेळ उभे राहिल्यावर प्रवेश मिळत नसल्याने शेवटी त्यांनी दरवाज्याजवळ खुर्चीत बसणे पसंत केले होते. बराच वेळाने त्यांना आत प्रवेश मिळाला. रिपब्लिकन पक्षाचे नेते व गृहनिर्माण राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर हे पक्षाच्या अन्य नेत्यांसमावेत आले असता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव नसल्याचे कारण पुढे करून विशेष सुरक्षा पथकाने (एस.पी.जी.) त्यांना प्रवेश नाकारला. शेवटी संतप्त झालेले शेगावकर हे माघारी फिरले असता सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) के. एल. प्रसाद यांनी मध्यस्थी करून त्यांना प्रवेश मिळवून दिला.