Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मराठी टक्का कमी करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा -राज ठाकरे
ठाणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

उत्तर भारतातून महाराष्ट्रात लोंढेच्या लोंढे आणून आणि त्यांना येथे छटपूजेच्या नावाखाली

 

संघटित करून मुंबई-ठाण्यातील मराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. ते वेळीच हाणून पाडा. कारण अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच अस्मिता ही महत्त्वाची आहे. त्यासाठीच हा यज्ञ पेटविला असून त्याला साथ द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात केले. शिवसेनेच्या राजकारणावर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली.
ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यातील सेंट्रल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी हे आवाहन केले. त्यावेळी व्यासपीठावर मनसेचे सतीश प्रधान, तिन्ही मतदारसंघातील उमेदवार राजन राजे (ठाणे), वैशाली दरेकर (कल्याण) आणि डी. के. म्हात्रे (भिवंडी) आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक जवळ आली आहे. तेव्हा गाफिल राहू नका. त्याचा फटका मुंबई-ठाण्यातील मराठी माणसालाच बसेल, हे सांगण्यासाठीच आपण आलो आहोत, असे प्रारंभीच स्पष्ट करून ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठीचा मुद्दा प्रभावीपणे मांडतानाच शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
ठाण्यात शिवसेनेच्या उमेदवारावर खुनाचा आरोप असून ज्यावेळी हे चौगुले राष्ट्रवादीत होते तेव्हा विलास जाधव यांच्या हत्येनंतर स्वत: उद्धव ठाकरे यांनी जाधव कुटुंबियांची भेट घेऊन तुमच्या मुलाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली होती. आमदार एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबाला वकील दिला होता. तोच चौगुले आज शिवसेनेचा उमेदवार आहे, हे कोणते राजकारण, असा सवाल करीत राज यांनी मयत विजय जाधव यांच्या कुटुंबियांना व्यासपीठावर आणून शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली. हा आपला बालेकिल्ला आहे. ठाण्यातील सुसंस्कृत मतदार आपलेच असून कोणताही उमेदवार दिला तरी त्यालाच मते मिळणार, असे शिवसेनेने गृहितच धरले आहे. त्यामुळेच राजकारणाचा तमाशा झाला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेच्या सोयीच्या राजकारणाचे वाभाडे काढताना राज पुढे म्हणाले, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना त्या काँग्रेसच्या उमेदवार असूनही केवळ मराठीचा मुद्दा म्हणत शिवसेनेने पाठिंबा दिला. मात्र मराठीच्या मुद्दय़ावर आपण आंदोलन केले तेव्हा संसदेत शिवसेनेच्या खासदारांनी का पाठिंबा दिला नाही, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचा हा भंपकपणा म्हणजे सोयीचे राजकारण असून बाळासाहेबांचे मराठीप्रेम वेगळे व इतरांचे मराठीप्रेम हे सोयीनुसार असल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
राम जेठमलानी यांनी संसदेवरील हल्ल्यातील आरोपी सय्यद गिलानी याचे वकीलपत्र घेतले होते. इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचे वकीलपत्रही त्यांनी घेतले होते. त्यांना शिवसेना-भाजप संसदेत पाठवते याला काय म्हणावे, असे म्हणत त्यांनी जेठमलानी यांची माफी मागण्यास नकार दिला.
महाराष्ट्राभोवती संकटाचे फास आवळले जात असून मी सतत धोक्याचा इशारा देत आहे. निवडणुका संपताच पुन्हा आंदोलन सुरू होईल. सगळ्यांनाचा आपली अस्मिता प्रिय असून ती जपण्यासाठी आपण यज्ञ पेटविला आहे. त्याला साथ द्या आणि एकदाच आपल्या ताब्यात महाराष्ट्र द्या, असे आवाहनही राज ठाकरे यांनी भाषणाच्या अखेरीस केले.