Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

प्रादेशिक

मूलभूत संशोधनावर लक्ष केंद्रित करावे -काकोडकर
मुंबई, २६ एप्रिल/प्रतिनिधी

आपल्या देशाला अनुकरण करण्याची सवय लागली आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचे अनुकरण करणे हे वाईट नसले तरी त्या बळावर आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकत नाही. यासाठी आपल्या देशाने स्वत: तंत्रज्ञान निर्माण करणे गरजेचे आहे. जर तंत्रज्ञान विकसित करावयाचे असेल तर शास्त्रज्ञांनी मूलभूत संशोधनाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे मत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

रस्तेप्रकल्पांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी योजना!
‘एमएमआरडीए’चे पाऊल
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी
सध्या शहरात सुरू असलेल्या मेट्रो, फ्लायओव्हर, स्कायवॉक यासारख्या विविध प्रकल्पांच्या कामांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. आता सातरस्ता ते चेंबूरदरम्यान सुरू झालेल्या मोनोरेल उभारणीच्या कामामुळे मुंबईकर आणखी धास्तावले आहेत. या पाश्र्वभूमीवर मोनोरेल उभारणीच्या कामामुळे मुंबईकरांची कमीतकमी गैरसोय व्हावी, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वाहतूक व्यवस्थापन सल्लागार कंपनीची नेमणूक केली आहे.

एआयईईई परीक्षा सुरळीत
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी
सीबीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेली ‘अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा’ (एआयईईई) आज सुरळीत पार पडली. महाराष्ट्रात या परीक्षेसाठी एकूण सात केंद्रांची तजवीज करण्यात आली होती. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना अन्य राज्यातील केंद्रे मिळाली होती. यंदा मात्र सीबीएसईने अशी चूक होऊ दिली नाही.

जुने हिट चित्रपट पुनप्र्रदर्शित होणार
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी
‘रंग दे बसंती’, ‘ओए लकी लकी ओए’, ‘जोधा अकबर’ हे चित्रपट मोठय़ा पडद्यावर पाहायचे राहून गेले असतील आता प्रेक्षकांनी ही संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. कारण ‘यूटीव्ही मोशन पिक्चर्स’तर्फे वितरित करण्यात आलेले हे चित्रपट पुन्हा एकदा ‘सिंगल स्क्रीन’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याचे मुख्य कारण आहे हिंदी चित्रपट निर्माते-वितरक आणि मल्टिप्लेक्स यांच्यातील वाद. उत्पन्न विभागणीवरून निर्माण झालेला हा वाद न शमल्यामुळे ४ एप्रिलपासून एकही हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. या वादात सिंगल स्क्रीन चालक मात्र नाहक भरडले जात आहेत. सिंगल स्क्रीन सुरू राहावीत आणि त्यांना या परिस्थितीत मदत करावी यासाठी यू-टीव्ही मोशन पिक्चर्सतर्फे गेल्या दोन वर्षांतील हीट चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. वर नमूद केलेल्या चित्रपटांप्रमाणेच ‘फॅशन’, ‘वेन्सडे’, ‘देव डी’, ‘रेस’ हेही चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

तब्बल दहा वर्षांनंतर पार पडली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी

तब्बल दहा वर्षांनंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या एकूण २२ जागांपैकी निवडणुकीने भरावयाच्या नऊ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. उर्वरित १३ सदस्यांची निवड ही माजी अधिकारी आणि नामांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. १९९९ पर्यंत परिषदेची निवडणूक ‘पोस्टल बॅलेट’ पद्धतीने होत असे. निवडणुकीत घोटाळा झाल्याने १९९९ साली झालेली निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार यंदाची निवडणूक ‘फिजिकल बॅलट’ पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष मतदानाद्वारे घेण्यात आल्याचे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे उपाध्यक्ष डॉ. अर्शद गुलाम मोहोद यांनी सांगितले.

शुश्रुषाच्या नियोजित रुग्णालयाचा सोमवारी भूमिपूजन समारंभ
मुंबई, २६ एप्रिल / प्रतिनिधी
शुश्रुषा सिटिझन्स को - ऑप हॉस्पिटल लि.च्या विक्रोळी येथील नियोजित मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या वास्तुचा भूमिपूजन समारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजिण्यात आला असून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. जयराज फाटक उपस्थित राहणार आहेत. शुश्रुषाच्या विक्रोळीच्या या प्रकल्पाचे प्रमुख राज्याचे माजी मुख्य सचिव दिनेश अफझुलपूरकर आहेत. या नियोजित रुग्णालयाच्या उभारणीचा उद्देश विक्रोळी व आसपासच्या परिसरातील मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना माफत दरात अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, हा असल्याचे अफझुलपूरकर यांनी सांगितले.