Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

उन्हाळ्याच्या सुटीमुळे नगर शहरातील महालक्ष्मी उद्यान बालगोपाळांनी असे फुलले आहे.

स्थायीसह अन्य नियुक्तयांबाबत लवकरच हालचाली
नगर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता महापालिकेचे राजकीय चक्र गतिमान होण्याची शक्यता आहे. मनपातील स्थायी समितीसह सर्वच महत्त्वाच्या नियुक्तया व निवडणुका रखडल्या असून, विरोधी सेना-भाजप युतीने आक्रमक धोरण स्वीकारल्यास येत्या आठवडय़ातच यासंदर्भात हालचाली होतील, असे दिसते. मनपाची निवडणूक होऊन महापौर व उपमहापौरांनी कार्यभार स्वीकारला, त्याला आता ४ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला. गटनोंदणीच्या घोळामुळे महापौर व उपमहापौर या दोन पदांच्या निवडीनंतर अन्य सर्व समित्या व पदांची निवडप्रक्रिया ठप्प आहे.

डिग्रसच्या रोपवाटिकेत
पाच बिबटय़ांना पाहुणचार!

राहुरी, २६ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील डिग्रस येथील वन खात्याच्या रोपवाटिकेत दोन मोठे बिबटे व दोन बछडे पाहुणचार घेत आहेत. त्यात आणखी एका बिबटय़ाची भर पडली. एकाच वेळी पाच बिबटे असल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.पारनेर तालुक्यातील कळस येथील बिबटय़ा पाहुणचारासाठी डिग्रस येथे दाखल झाला. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एक नर व एक मादी मुक्कामी आहे.

एका जनकल्याणकारी योजनेचा जन्म
पाण्याने भरलेले ढग उंचावरून जातात, पण खाली वर्षांवत नाहीत. जमीन तशीच तहानलेली रहाते. कधीमधी थोडाफार पाऊस पडतो, पण त्याचीही शाश्वती नसते. अशा भूभागाला पर्जन्यछायेतील प्रदेश म्हणतात. असा भूभाग भारतात नोंद घेण्याइतपत आहे. सह्य़ाद्री पर्वतराजीच्या कुशीतही तो आहे. संगमनेर तालुकाही पर्जन्यछायेच्या प्रदेशातच येतो. एकेकाळी भंडारदरा धरणाच्या परिसरात २५० इंचापर्यंत पाऊस पडायचा, तर संगमनेर तालुक्यातील पावसाची सरासरी जेमतेम १८-१९ इंच असायची. अलीकडे धरण परिसरातील पावसाचे प्रमाण ६० इंचापर्यंत, तर संगमनेरमध्ये ८ ते ९ इंचापर्यंत खाली आले आहे. शिवाय पाऊसही नियमित नसतो.

तूट असो की लूट, जकातीला १० कोटींचा
फटका नक्की!

नगर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

जकात खासगीकरणाचा महापालिका प्रशासनाभोवतीचा तिढा अद्यापि सुटला नसून १० कोटींची एकदम घट सोसून खासगीकरण करायचे की वर्षभर हळूहळू १० कोटींचीच लूट सहन करून वसुली मनपा यंत्रणेमार्फतच करायची असे दोनच पर्याय प्रशासनासमोर उरले आहेत.

कुकडीचे दुसरे आवर्तन मिळणे कठिण
उन्हाळी पिकांना फटका

श्रीगोंदे, २६ एप्रिल/वार्ताहर

कुकडीच्या पाच धरणांत उपयुक्त पाणीसाठा पावणेचार टीएमसी असल्याने पुणे, नगर व सोलापूरकरांना उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन मिळणार नसल्याचे आकडेवारी सांगते. एका आवर्तनासाठी चार ते साडेचार टीएमसी एवढे पाणी लागते. कालवा समितीने दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी आता तेवढे पाणी नसल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी उन्हाळ्यात पाण्याचे राजकारण करण्याचे आयते कोलीत पुढाऱ्यांना मिळणार आहे. नियोजनाप्रमाणे पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल.

व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ
क्राईम डायरी

वाढता चंगळवाद आणि गरीब-श्रीमंतांमधील वाढत्या दरीने सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. त्यातून निर्माण होत असलेल्या लुटारूंच्या टोळ्यांचा भस्मासूर आता सर्वाच्या डोक्यावर हात ठेवू लागला आहे. लुटारू टोळ्यांनी प्रामुख्याने व्यापाऱ्यांना लक्ष केल्याने या वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी एका टोळीचा छडा लावला असला, तरी इतर टोळ्या नेस्तनाबूत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

कोपरगावात आंब्याची मोठी आवक
कोपरगाव, २६ एप्रिल/वार्ताहर

अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. आवकही मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. जुने लोक व कुटुंबप्रमुख अक्षयतृतीयेला आमरसाची, टरबूज, खरबुजाची आगरी टाकल्याशिवाय आंबा खात नाहीत. सध्या गुजरात, रत्नागिरी व राजापूर येथून आंबे, तर पंढरपूर भागातून खरबुजांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली आहे. कराकेळीद्वारे पूर्वजांना पाणी देण्याची प्रथा अनेकांनी यंदाही पाळली.

श्रीगोंदे दरोडाप्रकरणी दोन संशयित आरोपींनाअटक
श्रीगोंदे, २६ एप्रिल/वार्ताहर

शहरातील कोथंबिरेमळा येथे काल पडलेल्या दरोडय़ातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. फौजदार ए. बी. घावटे यांनी पोलीस पथकाच्या मदतीने ज्ञानेश्वर बंडू गायकवाड (भिंगाण-श्रीगोंदे) व सावकाऱ्या बकदस्या काळे (चोराची वाडी) या दोघांना दरोडाप्रकरणी संशयावरून अटक केली. या दरोडय़ात १०-१२जणांची टोळी कार्यरत होती, अशी माहिती असून दोघा संशयितांकडून अधिक माहिती तपासाच्या दृष्टीने मिळू शकेल, असे श्री. घावटे यांनी सांगितले.

कोपरगाव बाजार समितीत कांद्याची १९ हजार गोण्या आवक
कोपरगाव, २६ एप्रिल/वार्ताहर
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची १९ हजार २२२ गोण्यांची आवक झाली. १५० ते ५५० रुपयांपर्यंत कांद्याला भाव निघाला. गव्हाची आवक २ हजार ५३५ क्विंटल झाली. भाव १००० ते १ हजार ४०० रुपये आहे. ज्वारी ४५२ क्विंटल - ८११ ते १ हजार रुपये, बाजरी ३३८ क्विंटल ८५० ते १ हजार १०० रुपये, हरभरा ५३३ क्विंटल २ हजार ५२५ रुपये, सोयाबीन २७० क्विंटल २३०० ते २ हजार ५७६, मका २७९ क्विंटल ८४० रुपये प्रतिक्विंटल भाव राहिला.

धनादेश न वटल्याने दंडासह १५ दिवसांची कैद
नगर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने अरुण एकनाथ पवार (रा. म्हैसगाव, ता. राहुरी) यास १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा व ५ हजार ३०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंजली खडसे यांनी हा निकाल दिला. फिर्यादी श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीतर्फे वकील सुनील मुंदडा यांनी काम पाहिले. चेन्नई येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीची नगरला शाखा आहे. या कंपनीकडून पवार याने मिनिडोरसाठी कर्ज घेतले होते. परतफेडीसाठी त्याने बँकेला धनादेश दिला. मात्र, तो न वटल्याने बँकेने न्यायालयात दावा ठोकला. न्यायालयाने पवार याला दोषी धरून १५ दिवसांची साधी कैद व ५ हजार ३०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.