Leading International Marathi News Daily

सोमवार,२७ एप्रिल २००९

मराठी उद्योग जगत : प्रगतीचा एक्स्प्रेस वे!
भारतातील १०० अग्रगण्य कंपन्यांच्या ‘मोस्ट पॉवरफुल’ सीईओंची यादी नुकतीच एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली त्यात पहिल्या क्रमांकावर टाटा उद्योगसमूहाचे रतन टाटा, तर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि तिसऱ्या क्रमांकावर इन्फोसिसचे नारायण मूर्ती आहेत. अशा या यादीत फक्त एकच मराठी नाव सापडलं आणि ते म्हणजे हिंदुस्तान लिव्हरचे नितीन परांजपे, त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन! गेल्या वर्षी सीटी बँकेचे ग्लोबल सी.ई.ओ. म्हणून विक्रम पंडितांचं नाव खूप गाजलं. १०० सीईओंच्या यादीत फक्त एकच मराठी नाव असल्यामुळे वाईट वाटलं, आणि त्याहीपेक्षा अधिक दु:खद वस्तुस्थिती अशी की या शंभर भारतीय अग्रगण्य कंपन्यांच्या यादीमध्ये एकाही मराठी उद्योगसमूहाचा समावेश नाही! एकेकाळी भारतीय उद्योगसमूहांचा उल्लेख करताना आपण टाटा, बिर्ला आणि किर्लोस्कर असा करत होतो, तर गेल्या काही वर्षांपासून फक्त टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असाच करतो. काही नवीन नावेही आपण घेतो ती म्हणजे इन्फोसिस, HDFC, ICICI Bank, पॅन्टलून रिटेल यात सुद्धा एकाही मराठी नाव दिसत नाही! असं जरी असलं तरी गेल्या काही वर्षांत ज्या मराठी टॉप मॅनेजर्सशी आणि उद्योगपतींशी माझा कामानिमित्ताने जवळून संबंध आला, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की, मराठी टॉप मॅनेजर्स आज उद्योजक आणि मोकळ्या मनाने चर्चा करायला तयार आहेत, बदलायला तयार आहेत आणि हीच मानसिकता मला वाटतं मोठय़ा यशाची नांदी आहे! येत्या १० वर्षांत ‘मोस्ट पॉवरफुल’ सीईओंच्या यादीमध्ये किमान १० सीईओ हे मराठी टॉप मॅनेजर्स असायला हवेत, आणि भारतीय १०० अग्रगण्य कंपन्यांच्या यादीमध्ये किमान पाच मराठी उद्योगसमूहांचा तरी समावेश

 

असायला हवा. निदान त्या दृष्टीने प्रयत्न तरी व्हायला पाहिजेत.
सीईओ सर्वसाधारणपणे असं बघितलं गेलं आहे की फायनान्स, टेक्नोक्रॅट किंवा मार्केटिंगची बॅकग्राऊंड असलेले व किमान १५ ते २० वर्षे अनुभव असलेले मॅनेजर्सच सीईओ होतात. आपले मॅनेजर्स शैक्षणिक पात्रतेत आणि अनुभवात कुठेच कमी पडत नाहीत, पण तरी प्रश्न पडतो की ते सीईओ का होत नाहीत? उत्तरादाखल मी असं म्हणेन की सचिन तेंडुलकर हा जरी जगातला नंबर एकचा फलंदाज असला, तरी तो यशस्वी कॅप्टन का होऊ शकला नाही! तसंच काहीसं आपल्या मराठी मॅनेजर्सबद्दलसुद्धा होत असावं. आज प्रत्येक टॉप सीईओचा त्यांच्यात असलेल्या `X' फॅक्टरचा एक स्वतंत्र ठसा त्यांच्या कंपनीवर दिसतो. तसा मराठी मॅनेजर्सनीसुद्धा आपल्या स्वत:चा ठसा कामात उमटवला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी ‘MNC' चा मंत्रघोष अनुसरला पाहिजे, MNC म्हणजे (१) मल्टीटास्किंग (२) नेटवर्किंग आणि (३) कमिटमेंट. मल्टीटास्किंग म्हणजे तुम्ही जर फायनान्समध्ये कार्यरत असाल तरी, मॅन्युफॅक्चरिंगची कार्यप्रणाली आणि मार्केटिंगचा गेमसुद्धा तुम्हाला कळला पाहिजे; आणि जर मार्केटिंगमध्ये असाल तर फायनान्सची कसरत आणि ह्य़ुमन रिसोर्सचा केंद्रबिंदू माहीत असायलाच हवा. कंपनीचा सर्वागीण विचार करण्याची तुमची हातोटी असली पाहिजे व मुख्य म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता नुसती आहे असं भासवून चालणार नाही तर वेळ पडली तर निर्णय घेऊन ते यशस्वी करून दाखवायला पाहिजे. नेटवर्किंगबद्दल बोलायचं झालं तर मी म्हणेन की, तुमचे गुंतवणूकदार, बिझनेस पार्टनर्स, मीडिया, ग्राहक, सरकारी अधिकारी, स्पर्धक आणि तुमचे सहकारी यांच्याबरोबर नुसते चांगले संबंध असून चालणार नाही तर त्यांच्याकडून तुमच्या पात्रतेच्या जोरावर मान मिळवता आला पाहिजे आणि कुठल्याही कामात ‘कमिटमेंट’ ही असलीच पाहिजे! त्याच्याशिवाय मोठी जबाबदारी मिळेल याची अपेक्षा ठेवणं बरोबर नाही. थोडक्यात, तुमच्या क्षेत्रात गुणवत्तेबरोबर, सर्वार्थाने ऑलराऊंडर असायला हवे! आणि जर तुम्हाला वाटतं की कंपनीच्या काही चुकीच्या धोरणांमुळे किंवा मालकांच्या आडमुठेपणामुळे तुम्हाला सीईओ होता येत नाही, तर स्वत:ची कंपनी काढायचे धारिष्ट दाखवा आणि यशस्वी चेअरमनबरोबर सीईओदेखील व्हा! इन्फोसिसचे नारायण मूर्ती, एअरटेलचे सुनील मित्तल आणि बिग बाजारचे किशोर बियाणी यांची उदाहरणं आपल्यासमोर अगदी ताजी आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही एक केस स्टडी म्हणून बघायलाच पाहिजे. सव्र्हिस सेक्टरमध्ये तरी असे निर्णय घ्यायला काही हरकत नाही.
मराठी उद्योगाविषयी बोलताना थोडं मागे जायला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर भारतातील व परदेशातील उद्योगांनी मुंबईत येऊन मोठमोठे कारखाने व कार्यालये थाटली, म्हणून महाराष्ट्र सदैव औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर राहिला पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगांना एक मोठय़ा स्पर्धेला सामोरं जावं लागलं. तुलनेने भारतातील इतर राज्यांचा विकास झाला नाही आणि तिथल्या लोकांना बाहेरून आलेल्या उद्योजकांशी स्पर्धा करावी लागली नाही. त्याचबरोबर जसे पारशी, कच्छी, जैन व मारवाडी उद्योगपतींना त्यांच्या समाजाकडून पैशाचं पाठबळ मिळतं, तशी आपल्या मराठी उद्योगांना आर्थिक मदत मिळत नाही. तसं असलं तरी आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी उद्योगांचा विचार केला तर साधारणपणे असं दिसेल की, १००० कोटींच्या वर उलाढाल करणारे किमान पाच तरी मराठी उद्योगमसूह आपल्या महाराष्ट्रात आहेत; ५०० कोटींच्यावर उलाढाल करणारे किमान २५ आहेत; व १०० कोटींच्यावर जाणारे किमान ५०; तर १० कोटींपर्यंत सहज मजल मारणारे किमान १०० उद्योगपती आहेत; व त्याच बरोबर एक कोटीच्या घरात व्यवहार करणारे किमान ५०० लहान उद्योग/ सव्र्हिस महाराष्ट्राच्या विविध शहरात व घराघरात आहेत. या प्रत्येकानं आपलं विश्व स्वत:च्या डोक्याने, सचोटीने आणि मेहनतीने उभं केलेलं आहे, ही माणसं मेहनतीला घाबरणारी मुळीच नाहीत, मग त्यांनी असं काम करायला हवं की त्यांचे नावसुद्धा भारतातील पहिल्या १०० उद्योगांच्या यादीमध्ये उद्या दिसेल? या प्रश्नाचं नेमकं उत्तर देण्यासाठी प्रत्येक उद्योगाचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल, त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांचं व्यवस्थापन, त्यांना भेडसावत असलेल्या स्पर्धा आणि त्यांच्या मालकीहक्कांचे प्रश्न समजल्याशिवाय उत्तर देणे कठीण आहे. तरी यशाचं गमक जर एकच शब्दात द्यायचं झालं तर मी म्हणेन की ‘प्रोफेशनल अप्रोच’ ज्याला आपण ‘व्यावसायिक दृष्टिकोन’ असं म्हणतो! उदाहरणादाखल आपल्या स्वागतकक्षातील सोफा कसा असावा हे आपल्या अंतर्गत सजावटकाराला ठरवू द्या. पण त्या सोफ्यावर कोणाला बसवायचं याचा निर्णय तुम्ही घ्या.
मराठी उद्योग मग तो मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील असो की सव्र्हिस इंडस्ट्रीमधील, वर दिलेल्या ढोबळ आकडेवारीनुसार विभागता येतील. आघाडीवर जाण्यासाठी कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायाला मुख्यत: तीन गोष्टी लागणारच- १) लेटेस्ट प्रोडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी किंवा स्वत:ची रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट क्षमता उदा. औषध कंपनी रॅनबॅक्सी आणि
डॉ. रेड्डी यांची जशी आहे २) अग्रेसिव्ह मार्केटिंग व नवीन बाजारपेठ- मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी नवीन नवीन प्रोडक्ट्स आणि ब्रॅण्ड्स आणून तुमच्या स्पर्धकाला तुम्हाला सतत चॅलेंज करावं लागेल. इथे मला टीव्ही बनविणारी कंपनी LG व Samsung या कोरियन कंपन्यांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. तसेच नवीन नवीन बाजारपेठ सतत शोधणे आवश्यक आहे. कालच आलेल्या नॅनो कारचं उदाहरण घ्या. टाटांनी नॅनोबरोबर जॅगवार आणि लॅण्ड रोव्हर कारसुद्धा ताब्यात घेतली आणि आता ते नॅनोला घेऊन युरोप आणि अमेरिकेत जात आहेत आणि ३) शेवटी पैसे उभारणीसाठी लागणारी ‘धडाडी’ व ‘कला’. मी धडाडी हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण पैसे उभारणीसाठी खरोखरच धडाडी लागते! एकवेळ कदाचित आपल्याकडे धडाडी असेल, पण या कलेत आपण नक्कीच कुठेतरी कमी पडतो! पैसे उभारणे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि तो प्रोफेशनलीच हॅण्डल करायला पाहिजे. पण अग्रगण्य कंपन्यांच्या यादीत येण्यासाठी व खऱ्या अर्थाने ग्लोबल होण्यासाठी आणखी चार मुख्य गोष्टींचा विचार करावा लागेल. १) सर्व प्रथम कुठल्याही उद्योगातलं स्ट्राँग मार्केट इन्टेलिजन्स असणं हे फारच महत्त्वाचं आहे. तुमच्या कंपनीबरोबर, तुमचे भारतातले व विदेशातले स्पर्धक, प्रोडक्ट्स, ग्राहकवर्ग, गुंतवणूकदार, मीडिया, सरकारी धोरण या सगळ्यांची क्रीटीकल माहिती वेळच्या वेळी मिळवता आली पाहिजे. २) दुसरे, तुमच्या उद्योगाला एक सक्षम प्रवक्ता (स्पोक्स-पर्सन) हा असायला हवा. जो तुमच्या पार्टनर्सबरोबर, गुंतवणूकदारांबरोबर, मीडिया व प्रेसबरोबर, स्पर्धकांबरोबर, शासकीय पातळीवर किंवा अन्य लोकांबरोबर तुमच्या उद्योगाविषयी, प्रोडक्ट्सविषयी समर्थपणे बोलू शकतो व तुमची बाजू मांडू शकतो. ३) तिसरं, तुमच्या उद्योगास योग्य असे एक अनुभवी व स्वतंत्र सल्लागार मंडळ (‘थिंक टॅन्क) असणं आजच्या स्पर्धात्मक जगात फार महत्त्वाचं आहे. हे मंडळ प्रत्येक महत्त्वाचा निर्णय एक त्रयस्थ म्हणून बघून तुम्हाला सकारात्मक दृष्टीने तुमच्या हिताचा सल्ला देईल व योग्य वेळी सावध करू शकतील; आणि शेवटी ४) फॉरेन कोलॅबोरेशन्स आणि जॉइन्ट व्हेन्चर्स ही आजच्या काळाची गरज आहे. नवीन प्रोडक्ट्स, अपडेटेड टेक्नॉलॉजी, उत्पादन प्रक्रिया, मार्केटिंग कौशल्य, स्ट्रॅटेजिक गुंतवणूक किंवा भागीदारी अशा अनेक गोष्टींसाठी देशी किंवा परदेशी कंपन्यांबरोबर सामंजस्याची अॅग्रीमेंट्स करावी लागतील व ती यशस्वी देखील करून दाखवावी लागतील. भारतातील जवळ जवळ प्रत्येक अग्रगण्य कंपनीचे देशी किंवा परदेशी कंपन्यांबरोबर वेगवेगळे सामंजस्याचे करार आहेत. आज जागतिक पातळीवर तुम्ही किती लोकांना बरोबर घेऊन काम करू शकता हे यशाचं एक मोजमाप झालेलं आहे. ज्या मराठी उद्योगांची दुसरी पिढी आज कार्यरत आहे. निदान त्यांनी तरी आपल्याला कुठलाही पार्टनरच नको अशी भूमिका घेणं बरोबर नाही. त्यांना मी सांगेन की, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी इतर कंपन्यांच्या चांगल्या व वाईट अनुभवाची पूर्ण माहिती तरी मिळवा. कोलॅबोरेशन्सला एक केस स्टडी म्हणून तरी बघायला काय हरकत आहे. वर दिलेली सूत्रे थोडय़ाफार फरकाने सव्र्हिस सेक्टरला सुद्धा लागू होतात.
काही प्रमाणात मोठे उद्योगसमूह आज दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीकडे आहेत व काही ठिकाणी आज मालकी हक्कावरून वाद आहेत. हा प्रश्न एकंदरीतच थोडा नाजूक आहे. म्हणून तो संयमाने आणि विचारपूर्वक सोडविला पाहिजे व त्यासाठी घरातील मोठय़ा माणसांनी वस्तूनिष्ठपणे भूमिका घेणे फार गरजेचे आहे. असे प्रश्न सोडविण्यासाठी कंपनीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला सोबत घेण्याचं टाळणं ते तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या उद्योगासाठीसुद्धा केव्हाही चांगलं.
मर्यादित साधनांतून अतुलनीय, अद्वितीय आणि उत्तुंग यशासाठी आपल्याला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करावाच लागेल. ‘बदल’-Change' हा आजच्या यशाचा मंत्र आहे आणि स्पर्धा ही कुणालाही चुकलेली नाही. म्हणून ठरलेल्या चाकोरीतून बाहेर पडून नवीन प्रयोग करावे लागतील, बदलत राहावं लागेल व वर म्हटल्याप्रमाणे यशाचे गमक एकच आहे. ‘प्रोफेशनल अप्रोच’! आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र एकोनॉमिक डेव्हलपमेंट काऊन्सिलसारख्या चांगल्या संस्था कार्यरत आहेत, जिथे विविध उपक्रम राबवले जातात त्याचा योग्य उपयोग मराठी उद्योगांनी करून घेतला पाहिजे. यंदाच्या १ मे ‘महाराष्ट्र दिन’ च्या निमित्ताने इतकंच म्हणेन की संपूर्ण मराठी उद्योगजगतात आपला प्रत्येक हात हा दुसऱ्याच्या मदतीसाठीच पुढे झाला पाहिजे! जे येतील त्यांना बरोबर घेऊन व जे येणार नाहीत त्यांनासुद्धा बरोबर घेऊनच पुढे जाऊ अशी मानसिकता आणि दृढ निश्चय केल्याशिवाय आपण प्रगतीच्या एक्सप्रेस-वेवर धाव घेऊ शकणार नाही.
(पुढील लेखात-फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि एसएमई सेक्टर)
नितीन पोतदार
कॉर्पोरेट लॉयर

े८२००५४७४७