Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

नवनीत

दिल्लीतील सुलतानशाहीचा इतिहास अभ्यासण्यासारखा आहे. तेरावे, चौदावे आणि पंधरावे शतक अरब-तुर्क सुलतानशाहीचे होते. यापैकी बहुतेक सारे सुलतान अशिक्षित आणि असंस्कृत होते. त्यांच्यातील विषयासक्ती पराकोटीची तर होतीच, पण एकीकडे इस्लामवर श्रद्धा ठेवणारे, उलेमा धर्मनेत्यांचे आशीर्वाद मिळविणारे हे युद्धखोर

 

लोक धर्मरक्षक मानले गेले. त्यांनी जितका इस्लामच्या शिकवणुकीला हरताळ फासला, तितका अन्य कोणी फासला नसेल. प्रत्येक सुलतान आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तींची हत्या करून सत्ता प्राप्त करून घेई. त्याचे बहुतेक जीवन ऐश्वर्य, उपभोगपरायण असे. आपल्या मदनिका आणि मदिरासक्तीत ते मस्त राहिले. त्यांचे प्रचंड राणिवसे असत. त्यांनी प्रजाजनांसाठी फारसे काही केले नाही. तरीही कधी उलेमांनी त्यांच्याविरुद्ध एखादे विधान केल्याचे दिसत नाही. उलट सर्वसत्ताधीश सुलतान इस्लामचे अधिरक्षक आहेत, असेच उलेमा भासवत राहिले, हीच स्थिती सूफींची दिसते. दरबारचे चाकर असणाऱ्या पोटभरू फारसी इतिहासकारांनी सुलतानाच्या धर्मपरायणतेबद्दल अतिशयोक्तिपूर्ण वर्णने लिहून ठेवली आहेत. तुघलक शासन काळात फिरुजशाह याने भारतात प्रवास करून ‘दलाइले फिरुजशाही’ नामक पद्य इतिहासग्रंथ तयार केला. त्यात मुसलमानी विजयानंतर मंदिरातील ज्ञानग्रंथ कसे मिळविले, त्याच्या नोंदी आहेत. या ग्रंथांचे लगोलग अरबी-फारसी तर्जुमे करण्यात आल्याचीही माहिती तो देतो. ‘तिब्बे सिकंदरी’ हा राजप्रशंसेचा ग्रंथ प्राचीन संस्कृत आयुर्वेदविषयक सिद्धान्ताचे विवेचन करणारा असून त्याची रचना मियांभुव याने आपली म्हणून दाखविली आहे. प्रवासी पंडित अल्-बेरुनी हा गजनीच्या मुहम्मदाच्या फौजेबरोबर भारतात आला. त्याने मुहम्मदाच्या लूटमारीकडे दुर्लक्ष तरी केले किंवा दहशतीमुळे त्याने विरोधी लिहिले नसावे, पण तो मुहम्मदाला चांगले म्हणत नाही, हे ध्यानात घेण्यासारखे वाटते. त्याने जे यात्रावृत्त लिहून ठेवले ते ‘अल्बेरुनीज् इंडिया’ या नावाने आज प्रकाशित आहे. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, येथे झालेली विविध शास्त्रांतील प्रगती, येथील रीतिरिवाज यांचे प्रशंसापूर्ण वर्णन मिळते. अशोक कामत

सायन आणि निरयन पंचांगात काय फरक असतो?
२२ मार्चला सूर्य बरोबर पूर्व बिंदूपाशी उगवतो आणि बरोबर पश्चिम िबदूपाशी मावळतो. या दिवसानंतर सूर्यमार्ग विषुववृत्ताच्या उत्तरेस सरकू लागतो म्हणून २२ मार्च रोजी सूर्य तारकांच्या पाश्र्वभूमीवर असतो. त्या बिंदूस वसंतसंपात िबदू म्हणतात. या वसंतसंपात िबदूला आरंभिबदू मानून राशी मोजण्यास सुरुवात करतात.
पृथ्वीच्या आसाच्या मंद भ्रमणामुळे हा संपातिबदू नक्षत्रचक्रांत मागच्या मागच्या नक्षत्रात सरकतो. साधारण ९५० वर्षांनी तो एक नक्षत्र मागे सरकतो. अशा तऱ्हेने सरकणारा आरंभिबदू विचारात घेऊन जे पंचांग राशीचक्राची विभागणी करतो ते सायन पंचांग होय. संपातचलन होते हे मान्य असूनसुद्धा एक विशिष्ट बिंदूच आरंभिबदू धरून त्याप्रमाणे राशीचक्राची विभागणी करणाऱ्या पंचांगाला निरयन पंचांग म्हणतात. आपण सामान्यत: जी पंचांगे वापरतो, ती सर्व निरयन पंचांगे आहेत. काही वर्षांपूर्वी वसंतसंपात बिंदू रेवती नक्षत्रात होता, त्यामुळे त्यानंतरचे अश्विनी नक्षत्र व मेष रास यांना प्रथम क्रमांक मिळाला. आता कल्पना करा, की निरयन पंचांगाप्रमाणे एक ग्रह मेष राशीत एक अंशावर आहे. संपातचलनामुळे हा संपात आजमितीस २४ अंश मागे म्हणजे पश्चिमेकडे सरकला आहे. म्हणजे सायन पद्धतीप्रमाणे तोच ग्रह मेष राशीच्या २५व्या अंशात आहे, असे म्हटले जाईल. अशा तऱ्हेने ग्रहाचे स्थान सांगण्याचा संकेत बदलतो हा महत्त्वाचा फरक आहे. तिथी, अमावास्या समाप्ती इ. गोष्टी पंचांगात समानच असतात. सायन पंचांगांप्रमाणे सूर्य २२ मार्च रोजी मेषेत जातो, तर निरयन पंचांगांप्रमाणे सूर्याचा मेष राशीतील प्रवेश १५ एप्रिल रोजी होतो. निरयन पंचांगातही पूर्वीच्या वसंतसंपाताल्या जागेविषयी मतभेद असल्यामुळे सूर्याचे राशीप्रवेश वेगवेगळय़ा दिवशी होतात.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

‘द हिस्टरी ऑफ द डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर’ हा एकमेव ग्रंथ लिहिला असता तरी एडवर्ड गिबन यांची इतिहासकार म्हणून इतिहासात नोंद झाली असती. त्यांचा जन्म २७ एप्रिल १७३७ रोजी झाला. शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण केले. पण कुमारवयातच त्यांना वाचनाची प्रचंड गोडी लागली. कॉलेजात गेले, पण अभ्यास के ला नाही. परिणामी कॉलेज सोडले. पुढे रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये प्रवेश केल्याने घरच्यांचा रोष पत्करला. पुढे पुन्हा प्रोटेस्टंट पंथात प्रवेश केला. वयाची तिशी उलटेपर्यंत वाचन आणि मौजमजाही त्यांनी पुष्कळ केली. दरम्यानच्या काळात त्यांचा प्रेमभंगही झाला. इतिहासलेखनाची सुरुवात स्विस स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासापासून त्यांनी केली. पण तो पूर्ण झाला नाही. ‘क्रिटिकल ऑब्झव्‍‌र्हेशन ऑन द सिक्स्थ बुक ऑफ द इनेइड्’ या ग्रंथामुळे ऐतिहासिक लेखक म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. ख्रिस्त आणि ख्रिस्तधर्म यांच्यावर या ग्रंथात केलेल्या विवेचनामुळे तो गाजला. तथापि, त्यांच्यावर खोटे पुरावे तयार करून ते इतिहास लिहितात, असाही आरोप समकालीन इतिहासकारांनी त्यांच्यावर केला. तेव्हा ‘फॉल ऑफ रोमन एम्पायर’ हा खरमरीत ग्रंथ लिहून त्याला चोख उत्तर दिले. इंग्लंडच्या अमेरिकेविषयीच्या धोरणावर युरोपात टीका के ली जात होती. त्याला उत्तर म्हणून ‘मेम्वॉर जस्टिफिकेटिक’ हा भलामोठा लेख त्यांनी लिहिला. ‘मेम्वॉर्स ऑफ हिज (माय) लाइफ अँड रायटिंग्ज’ हे त्यांचे आत्मनिवेदन मिस्लेनिअस वर्क्‍स’ मध्ये लॉर्ड शेफील्ड यांनी प्रसिद्ध केले. याशिवाय इतर अनेक स्फुटलेखन त्यांनी केले. परंतु इंग्लंडच्या इतिहास लिहिण्याचे त्यांचे स्वप्न मात्र साकार झाले नाही. चरितार्थासाठी त्यांनी सरकारी नोकरी पत्करली होती. व्यापार व वनरोपण आयुक्तपदाची त्यांच्यावर जबाबदारी होती. लेखनामुळे सतत करावी लागणारी धावपळ यामुळे जिवाची खूप दगदग झाली. लंडन येथे १६ जानेवारी १७९४ रोजी वयाच्या ५७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

ते दोघेजण तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. दोघेही अगदी लहानपणापासून एकमेकांचे परममित्र होते. ते एकत्र खेळले, एकत्र शिकले आणि एकत्र मोठे झाले. तरुणपणी दोघे वेगवेगळय़ा प्रांतात जाऊन स्थायिक झाले, पण मैत्री संपली नाही. आपापल्या व्यापात मग्न असले तरीही दोघे एकमेकांना दर तीन महिन्यांनी भेटायचे. तसा नेमच होता त्यांचा. भेटले नाहीत तर असहय़ व्हायचे, कधी हा दुसऱ्याकडे तर कधी दुसरा याच्याकडे जायचा. काव्यशास्त्रविनोदात दोन दिवस घालवून पुन्हा दोघे आपापल्या कामात व्यग्र व्हायचे.
एका मित्राला मौल्यवान वस्तू जमवण्याचा नाद होता. चांदीच्या मूर्ती, सोन्याचे रत्नजडित दागिने, भांडी, पेटय़ा, अत्तराच्या मौल्यवान कुप्या, हस्तिदंती पुतळे, दुर्मिळ चित्रे अशा अनेक वस्तू त्याने देशदेशांतून आयुष्यभर गोळा केल्या होत्या. त्या ठेवण्यासाठी भलामोठा भक्कम पेटारा होता. त्याला प्रचंड कुलूप होते. पेटारा ठेवायला तळघरात खास खोली होती. तिला कुलूप होते. आसपास कुणी फिरकू नये म्हणून त्याने भलामोठा दांडगा कुत्रा पाळला होता. खोलीचा पहारा करण्यात खास शिपाई हत्यार घेऊन उभा असायचा.
शिरस्त्याप्रमाणे तीन महिन्यांनी मित्र भेटायला आला. मौल्यवान वस्तू जमवणारा मित्र आगतस्वागत, गप्पागोष्टी झाल्यावर म्हणाला, ‘‘माझा संग्रह खूप वाढला आहे. बघून थक्क होशील.’’
त्याने पेटारा उघडला. एक एक चीजवस्तू काढून मित्राला देऊ लागला. मित्र डोळे भरून आनंदाने त्या वस्तू पाहात होता. गर्वाने पेटाऱ्याचा मालक असलेला मित्र म्हणाला, ‘‘माझा हा अप्रतिम, दुर्मिळ संग्रह पाहून तुला स्वत:च्या दुर्दैवाचे नक्की वाईट वाटत असेल ना? आणि माझ्या भाग्याचा हेवाही वाटत असेल तुला!’’
आपली पांढरीशुभ्र रेशमासारखी दाढी कुरवाळत मित्राने त्याच्याकडे पाहिले. तो हसून म्हणाला, ‘‘मुळीच नाही. उलट मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो आणि तुझ्या दुर्दैवाचे दु:ख होते.’’ मित्र हे ऐकून चकित झाला. भेटायला आलेला मित्र म्हणाला, ‘‘एवढय़ा किमती वस्तू वर्षांनुवर्षे गोळा करण्यासाठी तू केवढे कष्ट घेतलेस. किती पैसे खर्च केलेस. तुला पेटारा, कुलपे, खोली, बंदोबस्त किती किती यातायात करावी लागली. माझ्याकडे पाहा. यातले काही न करता या वस्तू बघून तुला जेवढा आनंद मिळतो, तेवढाच आनंद मी मिळवू शकतो. दोघांच्या आनंदात बघ काहीसुद्धा फरक नाही, पण त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टात मात्र खूप फरक आहे. म्हणून म्हणतो, तुझ्या कमनशिबीपणाचे मला दु:ख वाटते.’’ मित्र खजील झाला. दिवसभरात आपण काय निवडायचे हे ठरवत असतो. आपल्या भावना आपणच निवडत असतो. आनंदी राहणं किंवा दु:खी, असमाधानी राहणं यांची निवड आपणच करतो. जे मिळत नाही त्याबद्दल तक्रार न करता जे मिळालंय त्यात समाधानी राहणं आपल्या हातात असतं. जे वाटय़ाला आलं आहे त्याचा आनंदानं स्वीकार करायचा का त्याबद्दल सतत संताप, त्रागा करायचा, हे आपण ठरवू शकतो. आजचा संकल्प : मी आनंदी राहणे पसंत करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com