Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

अक्षय्य तृतीयेला सराफा बाजार थंडच
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

अक्षय्य तृतीयेनिमित्त आज वाढत्या भावामुळे सोने खरेदीचा मोठा उत्साह जाणवत नसला तरी घरोघरी पारंपरिक सणाचा उत्साह असून बाजारपेठांमध्ये खरेदीदारांनी गर्दी केली.
अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारपेठेत मातीची भांडी मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आली आहेत. या दिवशी कृत युगाचा आरंभ झाल्यामुळे याला ‘युगादी’ म्हणतात. या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. अक्षय्य तृतीयेला जपदान, होम केल्याने ते अक्षय पुण्यकारक ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ व दुसऱ्यात तीळ घालून त्यांना दोरा गुंडाळून धान्यावर ठेवतात.

केवळ २५.८२ टक्के डॉक्टरांचे मतदान
एमएमसीच्या निवडणुकीतही मतदारांमध्ये निरुत्साह

नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे(महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल- एमएमसी)च्या आज शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत नागपुरात फक्त २५.८२ टक्के मतदान झाले. डॉक्टर मंडळी घराबाहेरच न पडल्याने इतके कमी मतदान झाल्याचे बोलले जात आहे. नागपूर जिल्ह्य़ासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. मतदान सुलभतेने व्हावे यासाठी मेडिकलमध्ये नऊ बुथ तयार करण्यात आले होते. असे असतानाही मतदानास फारसा उत्साह दिसून आला नाही.

ठाले पाटलांच्या राजीनाम्याचा आग्रह
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महाबळेश्वर संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’त लिहिलेल्या लेखावर साहित्य क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यासंदर्भात विदर्भ साहित्य संघाने आज तातडीने बोलावलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पाटलांवर पुन्हा शरसंधान करून चक्क त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने साहित्य क्षेत्रातील थंडावलेले वातावरण पुन्हा तापू लागले आहे. पाटलांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत झालेले पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडले.

असल्या प्रेमवीरांपासून सावध राहणेच शहाणपणाचे
राखी चव्हाण

एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणींवर हल्ला करण्याची प्रवृत्ती आता मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांपुरतीच मर्यादित राहिलेली नसून विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर यासारख्या शहरांमध्येही तेवढय़ाच वेगाने ही प्रवृत्ती फोफावत चालल्याचे गेल्या आठवडय़ात घडलेल्या दोन घटनांवरून मान्य करावे लागेल. शॉकिंग.. दुर्दैवी.. निंदनीय.. एवढेच या घटनेविषयी म्हणून चालणार नाही तर, समाज नेमका कुठल्या दिशेने चालला आहे, याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

जैविक कचरा व्यवस्थापनावर चिकित्सकांची बैठक
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जैविक कचरा व्यवस्थापनासंदर्भात चिकित्सकांना पाठवण्यात आलेल्या ‘कारणे द्या’ नोटीसमुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी श्री आयुर्वेद महाविद्यालयात निमा संघटनेच्या चिकित्सकांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नाना पोजगे होते. डॉ. रवींद्र पारख, डॉ. सहारे, डॉ. अतिक रहमान हे केंद्रीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या जाचक अटी लादल्या, त्यावर सांगोपांग चर्चा झाली. तसेच जाचक अटीबद्दल चिंताही व्यक्त करण्यात आली. या संदर्भात लवकरच एक शिष्टमंडळ संबंधितांना भेटून मागण्याचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे संचालन डॉ. वीरेंद्र शहा यांनी केले. डॉ. विकास शिरसाट यांनी आभार मानले. या बैठकीला निमाचे सचिव डॉ. मंगेश भलमे, डॉ. शुभांगी बिजवे, डॉ. भावना भलमे, डॉ. मृण्मयी मासोदकर, डॉ. उमेश शिंगणे, डॉ. अविनाश वाळके, डॉ. शांतीदास लुंगे, डॉ. फाये यांच्यासह अन्य सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी
इंदोरा वसाहतीमधील दोन युवकांच्या मृत्यू प्रकरण
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

इंदोरा वसाहतीमधील दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणी जरीपटका पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या इंदोरा वॉर्ड समितीने केली आहे. इंदोरा वसाहतीतील अभिजीत मेश्राम, अतुल मेश्राम आणि प्रशांत डोंगरे हे तिघेही आंबेडकर जयंतीसाठी वर्गणी गोळा करीत होते. या दरम्यान त्यांचे वॉर्डातील काही तरुणांशी वाद झाला. याची तक्रार जरीपटका पोलीस ठाण्यात करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. आंबेडकर जयंतीच्या दिवशी या तिघांनाही पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप वॉर्ड समितीचे अध्यक्ष दिनेश घुरडे यांनी केला आहे. दरम्यान, या युवकांची जामिनावर सुटका झाल्यावर पोलिसांनी त्यांना १५ दिवस या वसाहतीत न दिसण्याची धमकी दिली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे अपमानीत झाल्यानेच अभिजीत आणि अतुल मेश्राम या दोघांनी बेळाघाट जवळील लामटा येथे तलावात आत्महत्या केली, असा दावाही घुरडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

योगामुळे अनेक लाभ -फटिंग
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

प्रदूषित वातावरणात योग ही संजीवणी ठरते, असे मत पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव फटिंग यांनी व्यक्त केले. दुर्गामाता मंदिर मानेवाडा सोसायटी येथे आयोजित योग आणि प्राणायाम वर्गाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. योगाभ्यास केल्याने अनेक आजारावर नियंत्रण शक्य होते. प्रत्येकांना त्यांच्या क्षमतेनुसार योग करावा, असे आवाहन फटिंग यांनी केले. यावेळी गुलाबराव उमाठे, योग शिक्षिका शीला नायडू, कुंदा गोमासे, देवेंद्रकुमार नीलमवार, ममता मुलमुले, पांडुरंग पन्नासे उपस्थित होते.

अॅड. राजेंद्र राठी तडजोड अधिकारीपदी
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

अभियोक्ता राजेंद्र जे. राठी यांची जिल्हा न्यायालयाने नव्यानेच निर्माण झालेल्या मध्यस्थी केंद्रात मध्यस्थ व तडतोड अधिकारी म्हणून जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. या मध्यस्थी केंद्रात दाखल असलेल्या प्रकरणातील पक्षकारांना नोटीस काढून व त्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन दोन्ही बाजूच्या पक्षकारामधील वाद समझोत्याद्वारे मिटवून त्यांच्यात सामंजस्याने तडतोड घडवून आणणे हे कार्य त्यांच्याकडून केले जातील. तसेच समझोता किंवा तडजोडीच्या अटी ठरवण्याचे कार्य मध्यस्थ व तडजोड अधिकारी करतील. तडजोड झाल्यास वा न झाल्यास तसा अहवाल जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाला सात दिवसांच्या आत पाठवला जातो. या मध्यस्थी केंद्राचे कामकाज जिल्हा न्यायालयातील खोली क्र. ६०५ येथे होईल.

वैशालीनगरात उद्यापासून ग्रीष्मकालीन कराटे शिबीर
नागपूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

निलेश कराटे-डो ट्रेनिंग स्कूल ऑफ नागपूरच्यावतीने वैशालीनगरमधील एनएसव्हीएम फुलवारी स्कूल येथे २७ एप्रिल ते २८ जूनपर्यंत ग्रीष्मकालीन कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी मुलामुलींना मुख्य प्रशिक्षक ब्लॅक बेल्ड शोडान निलेश शेन्डे, सहप्रशिक्षक प्रशांत डेकाटे, सिमरन मडके प्रशिक्षण देतील. शिबिरात शोतोकान शैलीच्या काता, कुमिते, गोहॉन, इप्पॉन, योगा, रिक्रिएशन, बेसिक व आत्मसंरक्षणाच्या वेगवेगळय़ा तांत्रिक व प्रात्यक्षिक बाबींवर भर देण्यात येईल. शिबिरामध्ये ४ ते २५ वर्ष वयोगटापर्यंतचे मुले, मुली सहभागी होऊ शकतील. पहाटे ५ ते सकाळी ६.३० आणि संध्याकाळी ६.३० ते ८ या वेळेत शिबीर घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी मुख्यप्रशिक्षक निलेश शेन्डे (९४२२८२५००५) यांच्याशी संपर्क साधावा.

‘नादबह्म’ उद्यापासून गायन व वादन शिबीर
नागपूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

‘नादबह्म’ संस्थेच्यावतीने २७ एप्रिल ते २७ जून या कालावधीत व्हायोलिन, हार्मोनियम, तबला व गायन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सर्व वयोगटातील मुलामुलींना प्रवेश देण्यात येणार असून, ६ ते ८ वयोगटातील दहा विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९८८१९३९०६३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

एससीव्हीटी परीक्षा २२ मे रोजी
नागपूर, २६एप्रिल / प्रतिनिधी

आर्टिझन टू टेक्नोकॅट योजनेंतर्गत एससीव्हीटी तृतीयस्तर परीक्षा २२ मे रोजी घेण्यात येईल. या परीक्षेसाठी प्रथम व द्वितीयस्तर कौशल्य चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक किमान शैक्षणिक अर्हताधारक विद्यार्थीच या परीक्षेला बसण्यास पात्र असतील. अधिक माहितीसाठी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रद्धानंदपेठ, अंध विद्यालयाजवळ, नागपूर येथे संपर्क साधावा.

चर्चवरील हल्ल्याचा माकपकडून निषेध
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

सावनेरमधील चर्चवर बजरंगदलातर्फे करण्यात आलेल्या हल्ल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने निषेध केला आहे. दोषींना पकडून त्यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. संघ परिवाराच्या फॅसिस्ट विचारसरणीला धरून हा हल्ला असून धर्मातराचा आरोप लावून ख्रिश्चनांवर हल्ला करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच अशा घटनांमुळे संघपरिवाराच्या सांप्रदायिक राजकारणाची सुरुवात होत असते. मध्यप्रदेश, गुजरात, ओरिसामध्ये याचा अनुभव यापूर्वी घेण्यात आला असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

स्वानंदचे १ मे पासून नाटय़ प्रशिक्षण शिबीर
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

स्वानंद व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १ मेपासून नाटय़ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दादीबाई हिंदू मुलींच्या शाळेत होणाऱ्या या शिबिरात अभिनय, नाटय़लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, नृत्य गायन या विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत शिबीर होईल. ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी शिबीर संयोजक रोशन नंदवंशी, ९४२१७०६३०६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून असे नाटय़ शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

‘लेले ज्वेलर्स’मध्ये खऱ्या रत्नांचे अलंकार
नागपूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

विविध आकर्षक प्रकारच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लेले ज्वेलर्स’ने साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतियेच्या निमित्ताने खऱ्या रत्नांच्या अलंकारांची श्रृंखला बाजारात सादर करण्याची घोषणा चंद्रकांत लेले यांनी पत्रकार परिषदेत केली. लेले ज्वेलर्सतर्फे खास सादर करण्यात आलेले हे दागिने अडीच हजार रुपयांपासून ते १ लाखांपर्यंत उपलब्ध आहेत. या नव्या डिझाईन्समुळे खरे मोती, पोवळी, पाचूचे दागिने आता नागपूर शहरात अगदी मनासारख्या डिझाईन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. लेले ज्वेलर्सच्या या नव्या उत्पादनांचे तात्या टोपेनगरातील जोग हाऊसमध्ये प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्राहकांच्या वाढता प्रतिसाद बघता लेलेंनी धरमपेठ भागातील वेस्ट हायकोर्ट मार्गावरील नव्या प्रतिष्ठानात स्थानांतरण केले आहे. १९१९ मघ्ये दिवंगत गणेश महादेव लेले यांनी बर्डी मेन रोडवर सुरू केलेल्या या प्रतिष्ठार्नाच्या दागिन्यांना नव्वद वर्षांची परंपरा असून ग्राहकांमध्ये त्यांची विश्वाससार्हता कायम आहे. वेस्ट हायकोर्ट मार्गावरील नवे प्रशस्त शोरुम संपूर्णपणे वातानुकूलित आहे. याठिकाणी नववधूसाठी लागणारे दागिन्यांपासून सर्व राशींची रत्ने, चांदीची उपकरणे, तसेच चांदीच्या भेटवस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.