Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अक्षय्य तृतीयेला सराफा बाजार थंडच
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

अक्षय्य तृतीयेनिमित्त आज वाढत्या भावामुळे सोने खरेदीचा मोठा उत्साह जाणवत नसला तरी

 

घरोघरी पारंपरिक सणाचा उत्साह असून बाजारपेठांमध्ये खरेदीदारांनी गर्दी केली.
अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारपेठेत मातीची भांडी मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आली आहेत. या दिवशी कृत युगाचा आरंभ झाल्यामुळे याला ‘युगादी’ म्हणतात. या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. अक्षय्य तृतीयेला जपदान, होम केल्याने ते अक्षय पुण्यकारक ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ व दुसऱ्यात तीळ घालून त्यांना दोरा गुंडाळून धान्यावर ठेवतात. ब्रह्मा, विष्णू, शिव स्वरूपात त्यांची पूजा करून दान-धर्म करण्याची रित आहे. त्यामुळे पितर तृप्त होतात. मनोरथ पूर्ण करतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस मानला जातो. १५ ते २५ रुपये दराने ही मातीची भांडी विकत मिळतात. शहरात आणि गावागावात मुख्य रस्त्यांवर कुंभार समाजाच्या लोकांनी दुकाने थाटली आहेत.
निवडणुकीच्या धामधुमीनंतर असह्य़ अशा कडक उन्हातही सराफा बाजार लग्नसराई व अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तासाठी सज्ज असला तरी ग्राहकांची गर्दी मात्र जेमतेमच दिसून येत आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया या सणास हिंदू कुटुंबात अर्धा ग्रॅम का होईना पण सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. यामुळे घरात सुखसमृद्धी नांदत असते असे मानले जाते. हा सण उद्यावर आलेला असतानाही सराफा व्यापाऱ्यांच्या मतानुसार खरेदीदारात फारसा उत्साह दिसत नाही. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने मोठय़ा सराफा दुकानांमध्ये ग्राहकी आहे. पण, खास अक्षय्य तृतीयेनिमित्त होणारी गर्दी कमीच आहे.
गेल्या दोन महिन्यात सोने चांगलेच तेजीवर आहे. सध्या सोने १५,५०० ते १५,८०० दरम्यान स्थिरावले आहे. सोन्याच्या वाढलेल्या दरामुळेही यंदा सराफा व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे व्यावसायिक सांगतात.
सध्या दिवसभर कडक उन्हाळा जाणवत असल्याने सायंकाळी ५ पासून रात्री ९ पर्यंत सराफा बाजार व ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांची थोडीबहुत गर्दी दिसून आली.