Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

केवळ २५.८२ टक्के डॉक्टरांचे मतदान
एमएमसीच्या निवडणुकीतही मतदारांमध्ये निरुत्साह
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे(महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल- एमएमसी)च्या आज शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत नागपुरात फक्त २५.८२ टक्के मतदान झाले. डॉक्टर मंडळी घराबाहेरच

 

न पडल्याने इतके कमी मतदान झाल्याचे बोलले जात आहे.
नागपूर जिल्ह्य़ासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. मतदान सुलभतेने व्हावे यासाठी मेडिकलमध्ये नऊ बुथ तयार करण्यात आले होते. असे असतानाही मतदानास फारसा उत्साह दिसून आला नाही. नागपूर जिल्ह्य़ात २८११ पुरुष व १९३३ महिला असे एकूण ४ हजार ७५२ मतदार होते. यापैकी ८३३ पुरुष आणि ३९४ महिला असे एकूण १२२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नावे यादीत नसल्याने अनेक मतदारांना आल्यापावली परत जावे लागल्याचे प्रकारही या केंद्रावर घडले.
आज सकाळी ८ वाजता मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. ती शेवटपर्यंत कायम राहिली. महाराष्ट्र वैद्यक परिषदेत आदिवासी डॉक्टरांना प्रतिनिधित्व न दिल्याने आदिवासी डॉक्टर नाराज होते. संपूर्ण महाराष्ट्रात १२०० आदिवासी डॉक्टर्स आहेत. आदिवासी डॉक्टरांनी मतदान करताना ‘महाराष्ट्र वैद्यक परिषदेवर आदिवासी डॉक्टरांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे’ असे लिहिलेली चिठ्ठी मतदार यादीला जोडून मतपेटीत टाकली.
कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रत्येक बुथवर दोन पोलीस ठेवण्यात आले होते. तर निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ४० आणि मेडिकलमधील २० अशा एकूण ६० कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून मेडिकलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सुभाष दुसाने यांनी काम पाहिले.
एकूण १३ सदस्य असलेल्या परिषदेवर नऊ प्रतिनिधी निवडणुकीद्वारे निवडून द्यायचे आहे. तर अन्य चार प्रतिनिधींची नियुक्ती शासनामार्फत केली जाणार आहे. आज झालेल्या निवडणुकीत तीन पॅनलचे एकूण ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात आय.एम.ए, डॉ. आंबेडकर मेडिकोज कम्यून आणि महाराष्ट्र रिफॉर्मिस्ट पॅनलचा समावेश आहे. तर काही उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात होते. आयएमएतर्फे विदर्भातून डॉ. किशोर टावरी (नागपूर) आणि डॉ. उद्धव देशमुख (अमरावती) यांचा समावेश होता. इतर संघटनांपेक्षा आय.एम.ए.ने मोठय़ाप्रमाणात प्रचार करून डॉक्टरांना मतदानासाठी प्रवृत्त केले. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली, अन्यथा आणखी घटली असती अशी चर्चा मतदान केंद्रावर होती.
विदर्भातील अन्य जिल्ह्य़ामध्येही २८ ते ३३ टक्क्याच्या दरम्यानच मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक कमी मतदार गडचिरोली जिल्ह्य़ात आहेत. येथे फक्त १०६ मतदार होते. याशिवाय वर्धेत ६००, वाशिम २११, यवतमाळ ७६९, चंद्रपूर ६७९, बुलढाणा ६६०, भंडारा ३५३, अमरावती १२७२, अकोला ८३६ आणि गोंदिया येथे १८२ असे मतदार होते. संपूर्ण विदर्भात एकूण मतदारांची संख्या १० हजार ४२० एवढी आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात ६७९ पैकी २२३ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. ही टक्केवारी ३२.८४ एवढी आहे. अन्य जिल्ह्य़ातील माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.
नागपूर विभागातील मतपेटय़ा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागारात ठेवण्यात येणार आहेत. २८ एप्रिलला या मतपेटय़ा मुंबईला पाठवल्या जातील. २ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत आय.एम.ए.चे सर्व उमेदवार निवडून येईल, असा विश्वास डॉ. किशोर टावरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. विदर्भात मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.