Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ठाले पाटलांच्या राजीनाम्याचा आग्रह
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महाबळेश्वर संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’त लिहिलेल्या लेखावर साहित्य क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यासंदर्भात विदर्भ साहित्य संघाने आज तातडीने बोलावलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पाटलांवर पुन्हा शरसंधान करून चक्क त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने साहित्य

 

क्षेत्रातील थंडावलेले वातावरण पुन्हा तापू लागले आहे.
पाटलांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत झालेले पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडले. त्यानंतर मात्र महाबळेश्वरातील ८२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात झालेला अभूतपूर्व तमाशा महाराष्ट्राने अनुभवला. संमेलनाध्यक्षांना मिळालेल्या धमक्या, त्यांचा राजीनामा, त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये झालेला खल, प्रकाशकांना मारहाण, अध्यक्षांविना पार पडलेले संमेलन या पाश्वभूमीवर या संमेलनाची वाट लागत असताना त्यासाठी विरोधकांनी पाटलांना जबाबदार धरून त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणारा पाटलांचा दीर्घ लेख रविवारच्या ‘लोकसत्ता’तील ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. त्यातून पाटलांनी विरोधकांसह मिडियाचाही समाचार घेतला आहे.
या लेखात पाटलांनी विरोधकांवर ताशेरे ओढताना कोणाचाही प्रत्यक्ष नामोल्लेख केलेला नसला तरी विदर्भ साहित्य संघाच्या आघाडीवर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून नागपुरात संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कार्यकारिणीच्या तडक बैठकीत पाटलांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा तीव्र टीका करण्यात आली. यावेळी पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठरावही मांडण्यात आला.
आजवरच्या कोणत्याही अध्यक्षाने महामंडळाच्या सभेत ठरलेल्या निर्णयाची अवहेलना करून त्यावर सार्वजनिक विधाने केली नव्हती. सांगलीच्या संमेलनापासून आजवर महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षांनी चालवलेल्या जातीवाचक विधानांमुळे महामंडळाची कधी नव्हे तेवढी अप्रतिष्ठा झाली आहे. महामंडळाची कायम घटकसंस्था वि.सा. संघ व अन्य समाविष्ट संस्थांनी वेळोवेळी केलेल्या घटनात्मक व वैध सूचना डावलून त्यावर घटनाबाह्य़ निर्णय घेणे व ते रोखण्यासाठी संघाने केलेल्या पत्रव्यवहाराची साधी पोचही महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली नाही. सांगलीच्या संमेलनात अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या जुन्या घटक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले गेले. त्यामुळे अध्यक्षांच्या बेताल, हडेलहप्पीच्या कार्यपद्धतीमुळे महामंडळाने गेली दोन वर्षे जनक्षोभ व माध्यमांची टीकाही ओढवून घेतली आहे. असे प्रसंग टाळण्यासाठी अध्यक्षांनी कुठलीही दक्षता बाळगली नाही. उलट सांगली व महाबळेश्वरच्या संमेलनात पूर्वाध्यक्षांचा महामंडळ अध्यक्षांनीच निषेध केला. त्यामुळे पूर्वाध्यक्षांना संमेलन स्थळ सोडून जावे लागले. ही दोनही संमेलने पोलीस संरक्षणात घेण्याची लाजिरवाणी वेळ महामंडळावर आली. हे सर्व प्रकार महामंडळाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाहीत, अशी टीका या ठरावात करण्यात आली आहे.
महामंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्या वर्तणुकीमुळे सर्वाचाच विश्वास गमावला असून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा महामंडळाने केलेली त्यांची निवड रद्द करून महामंडळावरील संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या जागी मराठवाडा साहित्य परिषदेच्या महामंडळावरील प्रतिनिधीची अध्यक्ष म्हणून निवड करावी, अशी मागणी वि.सा. संघाने ठरावाद्वारे केली आहे. या बैठकीला संघाचे उपाध्यक्ष वामन तेलंग व डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ कवी प्रा. नारायण कुलकर्णी कवठेकर, द.सा. बोरकर, नरेन्द्र लांजेवार, डॉ. रवीन्द्र शोभणे, नरेश सबजीवाले, मेघना वाहोकार आणि शुभदा फडणवीस उपस्थित होते.