Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

असल्या प्रेमवीरांपासून सावध राहणेच शहाणपणाचे
राखी चव्हाण

एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणींवर हल्ला करण्याची प्रवृत्ती आता मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांपुरतीच मर्यादित राहिलेली नसून विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर यासारख्या शहरांमध्येही तेवढय़ाच वेगाने ही प्रवृत्ती फोफावत चालल्याचे गेल्या आठवडय़ात घडलेल्या दोन घटनांवरून मान्य करावे लागेल. शॉकिंग.. दुर्दैवी.. निंदनीय.. एवढेच या घटनेविषयी म्हणून चालणार नाही तर, समाज नेमका कुठल्या दिशेने चालला आहे, याचा विचार करण्याची वेळ

 

आता येऊन ठेपली आहे.
अमरावती जिल्हय़ात एकतर्फी प्रेमप्रकरणातून सोमवारी एका तरुणीची भोसकून हत्या करण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी नागपूर शहरातही असाच प्रकार घडून आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. काय दोष होता प्रियांकाचा, असा प्रश्न समाजमनाला पडला आहे. दीपक इंगळे नावाच्या युवकाकडे ती मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती एवढाच तिचा दोष. स्वसंरक्षणाचे धडे देणाराच एक दिवस तिचा घात करेल, हे प्रियांकाच्या गावीही नव्हते म्हणूनच ती दीपकशी मोकळेपणाने बोलत होती. प्रशिक्षणानिमित्त होणाऱ्या बोलण्याचा दीपकने वेगळाच अर्थ लावला आणि विवाहित असतानाही प्रियांकावर त्याचा जीव जडला. प्रियांकाच्या नजरेस ही बाब आल्यावर तिने त्या प्रशिक्षण केंद्रात जाणे सोडले. एवढेच नाही तर त्या परिसरातील राहते घर सोडून दुसरीकडे निवारा शोधला पण, एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या दीपकने तिचा पिच्छा सोडला नाही. अक्षरश: परीक्षा केंद्रावर प्रियांकाला गाठून तिच्या वडिलांसमोरच तिच्यावर चाकूने हल्ला चढवला. कोणताही दोष नसताना प्रियांका आज मृत्यूशी झुंज देत आहे. सुमारे आठ वर्षांंपूर्वी चंद्रपूर शहरातही असाच एका तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. ज्या तरुणाने हा हल्ला केला होता तो त्या तरुणीच्या भावाचाच मित्र होता. हा प्रकारही एकतर्फी प्रेमप्रकरणातूनच घडलेला होता.
मला जे हवे ते मी मिळविनच, ही प्रवृत्ती दिवसेंदिवस समाजात बळावत चालली आहे. हा प्रकार फक्त श्रीमंत वर्गातच आढळून येत नाही तर, मध्यमवर्ग आणि निम्न स्तरावरसुद्धा तेवढाच बोकाळलेला आहे. श्रीमंत कुटुंबात मुलांचे एकतर अती लाड झाल्यामुळे हवी ती गोष्ट त्यांना मागता क्षणीच मिळत असते. मध्यमवर्गात कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आईवडील दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असल्याने मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे फारसा वेळच नसतो. त्यामुळे मुलांनी काही मागितले तर लगेच ते त्याला देऊन मोकळे होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि खालच्या स्तरात मात्र हिसकावून घेण्याची प्रवृत्ती अधिक आढळून येते. यातूनच हवे ते मिळवण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होते. एकंदरीत काय तर, प्रत्येकच वर्गात काही ना काही कारणे आढळतातच. यासोबतच टीव्ही आणि चित्रपटाचा मोठा परिणाम तरुण-तरुणींवर होत असल्याचे समाजात बघायला मिळते. एकतर्फी प्रेमाचा उत्तम नमूना म्हणजे ‘डर’ या हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटातील नायक, नायिकेचे दुसऱ्यावर प्रेम आहे, हे ठावूक असूनही तिचा पिच्छा पुरवतो पण, अखेरीस त्यालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. शेवटी हा चित्रपट असला तरीही, एकतर्फी प्रेमप्रकरणाच्या घटना समाजात वारंवार घडून येत आहे आणि यात प्रामुख्याने बळी जात आहे तो तरुणींचा. मुली शिकल्या, नोकरीला लागल्या, एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षेत्र त्यांनी काबीज केले पण, समाजात वावरतांना अजूनही त्यांना सुरक्षा मात्र नाही. प्रत्येक वस्तू आपलीच असल्याच्या तरुणांच्या स्वामित्वभावाचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत.
प्रेम करणे वाईट नाही पण, समोरचा व्यक्ती प्रतिसाद देत नाही, हे लक्षात आल्यावर टोकाची भूमिका घेणे, हे मात्र नक्कीच वाईट आहे. मुलींना चिडवणे, त्यांचा पिच्छा करणे, प्रतिसाद नाही दिला तर त्यांच्यावर हल्ला करणे, ही सारी कमकुवत मानसिकतेची लक्षण आहेत. ही मानसिकता निर्माण होण्यामागे घरासह आजूबाजूचे वातावरणही तेवढेच कारणीभूत आहे पण, वातावरण दूषित आहे म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही तर, हे वातावरण बदलण्यासाठी काय करता येईल, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. लहानपणापासूनच मुलांना कौटूंबिक ओलाव्याची गरज असते. यात आईवडिलांनी कुठेही कमी पडता कामा नये. मुलांना पुरेसा वेळ देणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच त्यांना समजून घेणेही गरजेचे आहे. हल्ली सर्वानाच सर्व गोष्टी कशा झटपट व्हायला हव्या असतात. तात्काळ मिळणाऱ्या आनंदावर, क्षणिक सुखावर सगळय़ांचा भर असतो. त्याच्या दुरगामी परिणामाची चिंता मात्र कुणालाच नसते. यावर चिंतन करण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.