Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रेल्वे स्थानकावरील बेवारस सुटकेसमुळे पोलिसांची धावपळ
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

रेल्वे स्थानकावरील एका फलाटावर रविवारी सायंकाळी एक बेवारस सुटकेस सापडल्याने

 

पोलिसांची धावपळ उडाली होती.
रेल्वे स्थानकावरील चार क्रमांकाच्या फलाटावर एक सुटकेस सायंकाळपासून बराचवेळ पडलेली होती. ते एका स्टॉलवाल्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ही बाब सांगितली. जवानांनी पहिल्या क्रमांकाच्या फलाटावरील ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक पांडेय यांना सुटकेसची माहिती दिली. पांडेय तसेच पोलीस उपनिरीक्षक निमसय्या यांनी लगेचच रेल्वे पोलिसांना कळवून श्वानासह फलाटावर धाव घेतली. सुटकेसच्या बाजूने जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम दूर करण्यात आले. सुटकेसचा वास घेतल्यानंतर काही क्षणांनंतर श्वान भुंकल्याने पोलिसांना संशय आला व त्यांनी ती अलगद उचलून रेल्वे पोलीस दलाच्या ठाण्याबाहेर मोकळ्या जागेत आणून ठेवली आणि तिच्याभोवती वाळूची पोती रचून ठेवली. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक दीपक बागुल यांच्या नेतृत्वाखालील बॉम्बशोधक व नाशक पथक तेथे आले. या पथकातील श्वानाने सुटकेसचा वास घेतला, मात्र त्यात काहीच नसल्याचा निर्वाळा दिला. या पथकाने नंतर ही सुटकेस कस्तुरचंद पार्कवर नेली. तेथे ती उघडली असता त्यात केवळ कपडे सापडले. कुणी प्रवासी ती सुटकेस फलाटावर विसरला असावा, असे पोलिसांनी सांगितले. नंतर ही सुटकेस रेल्वे पोलीस ठाण्यात देण्यात आली. या बेवारस सुटकेसमुळे मात्र पोलिसांची धावपळ झाली. या साऱ्या गोंधळात मात्र रेल्वे स्थानकावरील सारे व्यवहार नेहमीसारखेच सुरळीत सुरू होते.