Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तापमानात घट
नागपूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

गेल्या आठवडाभरापासून ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारा पारा घसरून आज प्रथमच ४३.१ अंशावर आल्याने उकाडय़ापासून किंचित दिलासा मिळाला. तसेच अकोला वगळता विदर्भातील इतर शहरांमधील तापमानातही एक ते दोन अंशांनी घट झाली. यामुळे नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून मुक्तता मिळाली. दरम्यान, सध्या तापमानात किंचित घट झाली असली, तरी येणाऱ्या काळात वाढच होण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात

 

आला आहे.
यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकणे सुरू केले होते. प्रारंभीच ४२ ते ४४ अंशापर्यंत पारा गेल्याने सर्वाधिक उष्म्याच्या मे महिन्यांची नागरिकांनी धास्ती घेतली होती. त्यानंतर पारा घसरलाही होता. मात्र, त्यानंतर पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे यात वाढ होऊन गेला आठवडाभर अंग भाजून उष्म्याने नागरिकांना होरपळून काढले. आठवडाभर तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. आठवडा संपता संपता यात पुन्हा घट झाली आणि रविवारी तापमान ४३.१ अंशावर आले. आज एक अशांने काही होईना पाऱ्यात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे उन्हाची काहीली काही प्रमाणात कमी झाली होती. विदर्भाच्या बहुतेक भागात कमाल तापमानात किंचित घट झाली. पहाटे काही क्षणांची थंड झुळूक येते आणि आठ वाजत नाही तोच तिचा अवतार बदलतो. उष्ण वाऱ्यात बदललेली ही झुळूक मध्यान्ही बारा वाजेनंतर झळांचे रौद्र रूप धारण करते आणि तिच्या चटक्यांपासून बचाव करण्यासाठी केवळ माणसेच नव्हे तर सारी सृष्टीच धडपडताना दिसते. माणसे डोईवर टोप्या, रुमाल, दुपट्टे गुंडाळून बाहेर पडताना दिसतात. मात्र आज तापमानात झालेली घट, अक्षय्य तृतीयेच्या सणाची तयारी आणि सुटीचा दिवस असल्याने रस्त्यावर रहदारी दिसून येत होती. आज नागपुरात ४३.१ अंश तापमान नोंदवले गेले. अकोला ४४.२ , वर्धा ४२.७, यवतमाळ ४१.६, वाशीम ४१.६, गोंदिया ४१.१, बुलडाणा ४०.६ तर अमरावती येथे ४१.५ अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले.