Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सोलर फेंसिंगसाठी पूर्ती साखर कारखान्याची आर्थिक मदत
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

उसाच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या रानटी डुकरापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सोलर फेंसिंग ही पद्धत उपयोगी असून यासाठी पूर्ती साखर कारखाना आर्थिक मदत करणार असल्याची

 

घोषणा पूर्ती साखर कारखान्याचे प्रबंध संचालक सुधीर दिवे यांनी केली.
ऊस लागवडीचे यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पूर्ती साखर कारखान्यातर्फे विविध भागात शेतकरी संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून कोटगाव येथे शेतकरी संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष जयकुमार वर्मा व प्रबंध संचालक सुधीर दिवे उपस्थित होते. संमेलनात शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी जंगली श्वापदापासून होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी दिवे म्हणाले, शेतकऱ्यांची ही समस्या सोलर फेंसिंगद्वारे सुटू शकते. सोलर फेंसिंगसाठी बँकाच्या मदतीने शेतकऱ्यांना हे कुंपण लावून देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती मदत पूर्ती साखर कारखान्यातर्फे करण्यात येईल. सोलर फेंसिंगच्या लागणाऱ्या खर्चासाठी विविध बँकांनी कर्ज देण्याचे कबूल केले असून सुरुवातीला भरावयाच्या राशींपैकी ५० टक्के राशी पूर्ती साखर कारखाना भरेल व ही राशी ऊस खरेदीच्या रकमेमधून नंतर वळती करण्यात येईल, असेही दिवे म्हणाले. कोटगाव क्षेत्र नेहमीच उसाची मोठय़ा प्रमाणात लागवड करीत असते व पूर्ती साखर कारखान्याच्या ऊस प्रोत्साहन अभियानाला सहकार्य करीत असते त्याबद्दल जयकुमार वर्मा यांनी आभार मानले. शेतकऱ्यांतर्फे ग्रामपंचायत सदस्य आशा बेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य टेकचंद सावरकर, माजी सभापती महादेवराव वाडीभस्मे, सरपंच श्रीराम ठवकर, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य चंद्रविलास रंगारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी अधिकारी चंद्रकात अलोणी, अनंत जुगेले यांनी केले होते.