Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘अनौपचारिक शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडते’
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

श्रीकृष्णनगर मधील विश्वास माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व

 

विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संजय जीवने यांच्या हस्ते झाले तर, अध्यक्षस्थानी विश्वास शिक्षण संस्थेचे संस्थापक व प्राचार्य श्रीराम काळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक अलका काळे, पर्यवेक्षिका अपर्णा इंगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. उद्घाटक व प्रमुख पाहुणे संजय जीवने यांनी विद्यार्थी जीवनातच नव्हे तर सर्वच स्तरावर व्यक्तिमत्त्व विकास शिबिराची उपयुक्तता विशद केली. अनौपचारिक शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडत असते. त्यासाठी मनाला घडवा म्हणजे व्यक्तिमत्त्व घडेल, असे ते म्हणाले. भरपूर वाचन करा, वाचन मानवाला विचारप्रवृत्त करते. आत्मविश्वास निर्माण करते. परिश्रम व जाणीवपूर्वक अभ्यास करा. प्रश्न विचारण्याची सवय लावा. प्रश्न पडायला सुरुवात झाली की जीवनात परिवर्तन सुरू होते. चांगल्या चित्तवृत्तींची संख्या वाढवा, असे मौलिक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. श्रीराम काळे यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. कार्यप्रवण राहिल्यास माणूस मोठा होतो. स्वत:मधील सुप्त गुणांना ओळखणे आवश्यक असून आत्मपरीक्षण व निरीक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे गमक आहे. कलेचा अविष्कार व अभिव्यक्तीतून माणूस अष्टपैलू कर्तृत्ववान होतो. जीवनात चांगले आदर्श बाळगा ग्रंथसंपदेचे महत्त्व ओळखून अवांतर वाचन करा. असा उपदेश काळे यांनी केला.
अलका काळे व अपर्णा इंगळे यांचेही समयोचित भाषण झाले. संचालन भारती राजापुरे यांनी केले तर देवानंद यावलकर यांनी आभार मानले.