Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

म्युअर मेमोरिअलमधील वृद्धाश्रमाचा वर्धापनदिन
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

म्युअर मेमोरिअल रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील वृद्धाश्रमाने नागपूर आणि आजूबाजूच्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला असून या वृद्धाश्रमाचा प्रथम वर्धापनदिन नुकताच

 

साजरा करण्यात आला.
म्युअर मेमोरिअल रुग्णालय १८९६ पासून नागपूर आणि परिसरातील गरजूंना स्वास्थ्य सेवा पुरवत आहे. डॉ. एमनेस एंडरसन यांच्यातर्फे या रुग्णालयाला हेलन आणि मेरी या बहिणींनी आर्थिक मदत देऊ केली होती. १९८७ मध्ये नवीन इमारतीचे बांधकाम होऊन अधिकतर सेवा या नवीन इमारतीत सुरू करण्यात आल्या होत्या. या रुग्णालयात सध्या १६५ खाटा आहेत. रुग्णालयाचे काम या नवीन इमारतीत असल्याने या इमारतीची गेल्या १५ वर्षांपासून पडझड झाली होती. २००७ च्या जून महिन्यात रेव्ह. व्हिक्टर अॅंगलो यांच्या मदतीमुळे या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. नागपूर आणि आसपासच्या गावातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोणताच आधार नाही अशांची सुश्रुषा या इमारतीत होऊ लागली. मार्च २००८ मध्ये या इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाले आणि एप्रिल २००८ पासून वृद्धाश्रमाच्या कामाला वेग आला. आज या ठिकाणी १५ वृद्ध महिला-पुरुष राहतात. रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर नि:शुल्क उपचार करण्यात येतात. या वृद्धाश्रमाला सरकारी आणि अशासकीय अशा दोन्ही संस्थांकडून मदत मिळते. म्यूअर मेमोरिअल रुग्णालयाचे सहकारी, हितचिंतक आर्थिक आणि वस्तू रूपाने वृद्धाश्रमाला मदत करीत असतात. व्हिक्टर अँग्लो, म्युअर मेमोरिअलचे संचालक विलास शेंडे, वैद्यक अधीक्षक डॉ. अनाबाला, कांबळे आणि अन्य कर्मचारी नियमितपणे या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि मदत करीत असतात.