Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना ४० सायकलींचे वाटप
नागपूर, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बातम्या रोज वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात. आता तर त्यांच्याप्रति हळहळही वाटेनाशी झाली आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशीच अनेकांची मानसिकता

 

दिसून येते. काही काळ या बातम्यांचा गवगवा होतो. त्यामुळे एखादवेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बायकोला शासकीय अथवा समाजातून मदतीचा हातही पुढे येतो. पण नंतर परिस्थिती जैसे थे. फक्त एकरकमी आर्थिक मदतच नव्हे तर त्याही पुढे जाऊन अशा कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाचा विचार करून त्यांच्या शिक्षणासाठी काही करता येईल का, असा विचार सहयोग संस्थेने केला आणि तब्बल ४० सायकली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यात आल्या. सायकली देण्यातून दिसून आलेले लोकांचे दातृत्व आणि सहयोग ट्रस्टने पुढे केलेला मदतीचा हात यामुळे हायस्कूलमध्ये जाणाऱ्या अनेक मुलामुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
मार्च महिन्यात सहयोग ट्रस्टने ‘लोकसत्ता’तून जुन्या सायकली देण्याचे आवाहन लोकांना केले होते. विदर्भाबाहेरील लोकांनीही त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. काहींनी पैसे देऊ केले होते. या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.