Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

काश्मीर सफरीवर जाणाऱ्या वैदर्भीयांच्या संख्येत वाढ
विक्रम हरकरे

नागपूर, २६ एप्रिल
हिंसाचाराच्या बातम्यांचा परिणाम नाही
पहिली पसंती भारताच्या नंदनवनालाच
जम्मू-काश्मिरात अलीकडच्या तीन महिन्यांच्या काळात दहशतवाद्यांच्या हिंसाचारात किंचित वाढ झाली असली तरी विदर्भातून काश्मीर टूरवर जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कोणतीही घट झालेली

 

नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा यात ४० टक्क्याने वाढच झालेली आहे.
जम्मू-काश्मीर सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्कराने आठवडाभराच्या प्रदीर्घ चकमकीनंतर ३१ दहशतवाद्यांना ठार केल्याचे वृत्त आजच प्रकाशित झाले आहे. सुमारे १०० ते १२० घुसखोर राज्याच्या विविध भागात शिरल्याचे ब्रिगेडियर गुरमीतसिंग यांनी शनिवारी श्रीनगरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर जम्मू-काश्मीर टूरवर जाणे कितपत सुरक्षित आहे, याविषयी विचारणा करण्यासाठी विदर्भातील टूर ऑपरेटर्सकडे पर्यटकांचे दूरध्वनी सुरू झाले आहेत. मात्र, पर्यटकांनी तेथे जाण्याचा निर्णय बदललेला नाही.
विदर्भातील उन्हाळा मे महिन्यात शिगेला पोहोचेल. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या मोठी राहणार आहे. बहुतेक पर्यटक सिमला, कुलू-मनाली, दार्जिलिंग, माथेरान, महाबळेश्वर, गंगटोक, पचमढी, उटी येथे जाणे अधिक पसंत करतात. यामागे ही ठिकाणे ‘सेफ’ आहेत, हे कारण असले तरीही गेल्या वर्षी काश्मिरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये ६५ टक्के पर्यटक महाराष्ट्रातील होते. बुकिंग फुल्ल झाल्यामुळे यंदा ही संख्या वाढल्याचे दिसून येते, अशी माहिती प्रकाश टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक पीयूष पेंडके यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
विदर्भातील पर्यटकांचे ग्रुप घेऊन काश्मीर टूर करणाऱ्या पीयूष पेंडकेंनी पंधरा वेळा जम्मू-काश्मीरला भेट दिलेली आहे. या काळात एकदाही त्यांना वाईट अनुभव आलेला नाही. त्यांच्या मते काश्मिरातील रहिवाशांचे जीवन पर्यटन व्यवसायावर निर्भर असले तरी १९८९ ते १९९८ या दहा वर्षांच्या काळात दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. १९९९ पासून हिंसाचाराचे प्रमाण हळहळू कमी होऊ लागले तसे तसे काश्मिरात पर्यटकांचे येणे सुरू झाले. विदर्भातील पर्यटकही याला अपवाद नव्हते. गेल्या दहा वर्षांत विदर्भातील पावणेदोन लाख पर्यटकांनी भारताच्या नंदनवनाची सफर केली असून बहुतेक टूर उन्हाळ्यात झालेल्या आहेत. पर्यटकांवर हल्ले होण्याची किंवा त्यांना ओलीस ठेवल्याची एकही घटना या काळात घडलेली नाही. गेल्या वर्षीच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळातही काश्मीर खोरे शांत होते, याकडे पेंडके यांनी लक्ष वेधले.
एखाद्या राज्यातील हिंसाचाराच्या बातम्यांचा सर्वाधिक फटका बसतो तो पर्यटन व्यावसायिकांना. त्यांना नियोजित टूर रद्द करावे लागतात. रेल्वे-विमानाचे आरक्षण, टुरिंग बस, हॉटेलांचे बुकिंग रद्द करावे लागते. अनेक पर्यटक भीतीमुळे जाणे टाळतात. जम्मू-काश्मिरातील स्वर्गीय सौंदर्याचा आनंद लुटण्याची इच्छा असली आणि सुरक्षेची पूर्ण खात्री झाल्याशिवाय तेथे जाण्यास पर्यटक धजावत नसले तरी विदर्भातील पर्यटकांच्या मनोधैर्यावर याचा कोणताही विपरित परिणाम झाल्याचे टूर ऑपरेटर्सना जाणवलेले नाही, असेही पेंडके यांनी सांगितले.
काश्मिरातील परिस्थिती पर्यटकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. दहशतवाद्यांशी चकमकीच्या घटना सीमावर्ती भागात घडलेल्या आहेत. पर्यटन हाच उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असल्याने स्थानिक लोक पर्यटकांच्या स्वागतासाठी पुढे येत आहेत. गेल्या वर्षी तर काश्मीर ‘हाऊस फुल्ल’ होते. शिकारा, हाऊसबोटी पॅक होत्या. टय़ुलिप गार्डन, मुगल गार्डन, गुलमर्ग, सोनमर्ग, शंकराचार्य मंदिर, पहेलगामला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी होती. दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य, केसर, अक्रोडाची शेती, चिनार वृक्षराजी पाहण्यासाठी पर्यटक आसुसलेले होते. गेल्या वर्षी २० हजार वैदर्भीयांनी काश्मीर टूर केली, अशी माहिती पेंडके यांनी दिली.
हांडा ट्रॅव्हल्सचे संचालक किशोर हांडा गेल्या तीन दशकांपासून या व्यवसायात आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीरला अनेक ग्रुप टूर नेल्या आहेत. हिंसाचाराच्या बातम्यांनी पर्यटन व्यवसायावर नकारात्मक परिणाम होतो परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून पर्यटकांनी धैर्याने काश्मीरची सफर केलेली आहे. टूर रद्द करणाऱ्या पर्यटकांची टक्केवारी अगदीच नगण्य आहे. एखाद दुसरे डिपार्चर रद्द करण्याचा प्रसंग येतो, असे हांडा यांनी सांगितले.
काश्मिरात आम्ही जेवढय़ा ग्रुप टूर्स केल्या त्यादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाहीत. यंदाचे बुकिंगही फुल्ल आहे. आजच्या बातम्या वाचून संभ्रमात असलेल्या काही पर्यटकांचे दूरध्वनी आले पण, त्यांनी टूर रद्द केलेली नाही, याचा हांडा यांनी उल्लेख केला.