Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उपनिरीक्षक शिंदेंना जामीन; शिपाई कळसकरला अटक
एक हजाराचे लाचप्रकरण
नागपूर, २६ एप्रिल / प्रतिनिधी

एक हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची न्यायालयाने

 

जामिनावर मुक्तता केली. मात्र पोलीस शिपायाला दुपारी अटक करण्यात आली.
आरोपपत्र लवकर सादर व्हावे, यासाठी एका आरोपीकडून एक हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्याचा शिपाई विजय कळसकर याला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शनिवारी सकाळी पकडले. सापळ्यात सापडल्याचे दिसताच कळसकरने ५०० रुपयांच्या दोन नोटा गिळून टाकल्या. या प्रकाराने भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाची धावपळ उडाली. ही रक्कम पोलीस उपनिरीक्षक माधव शिंदे यांच्या सागण्यावरून घेतल्याचे त्याने सांगितल्याने माधव शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक करण्यात आली.
दरम्यान, विजय कळसकरला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे कालपासून त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. विष्ठा व लघवीचे नमुने घेण्यात आले असून ते प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. विजय कळसकरला आज दुपारी रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याने त्याला अटक करण्यात आली. काल अटक केलेल्या माधव शिंदे यांना आज प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी तुंगार यांच्यापुढे हजर करण्यात आले.
माधव शिंदे यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली होती, मात्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.