Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पोलीस मिळवून देऊ शकतात चोरीस गेलेला मोबाईल फोन
राजेश्वर ठाकरे
नागपूर, २६ एप्रिल

मोबाईल फोन चोरी गेल्यावर अथवा हरविल्यास सुगावा लागून परत मिळलेच याबाबत

 

कोणालाच विश्वास नाही. परंतु, पोलीस यंत्रणा सतर्क आणि कर्तव्यदक्ष असल्यास तुमचा आवडता ‘हँडसेट’ पुन्हा हातात येऊ शकतो, हे अंबाझरी पोलीस ठाण्याने दाखवून दिले आहे.
गेल्या चार महिन्यांमध्ये अंबाझरी पोलिसांनी मोबाईल फोनच्या १७ चोऱ्यांचा तपास लावला. त्यापैकी ९ फोन मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. मोबाईल, सायकल यासारख्या वस्तू चोरी गेल्यास तपास लागून ती वस्तू परत मिळेल, असा विश्वास जनतेत नाही. त्यामुळे अशा वस्तू चोरी गेल्यास पोलिसात तक्रार केली जात नाही. मोबाईल फोन तर आज एक गरज बनले आहेत. त्यात शेकडो दूरध्वनी क्रमांक साठवलेले असतात. शिवाय अलिकडे मोबाईल फोनमध्ये महत्त्वाचा ‘डेटा’ देखील ‘स्टोअर’ केला जाऊ शकतो. याशिवाय, आवडता ‘हँडसेट’ ही बाबही महत्त्वाची आहे. लग्नसमारंभात किंवा कुठल्यातरी कार्यक्रमात ‘हँडसेट’ हरवला किंवा चोरी गेला तर मोठी पंचाईत होते. अचानक जगाशी संपर्क तुटल्यासारखा भास होऊ लागतो. अशात सात-आठ दिवसात तो फोन पुन्हा तुमच्या हातात आला तर आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
अशाच प्रकारचा अनुभव लता मंगेशकर रुग्णालयातील मेट्रन रिता लुईस जॉन यांना आला. लेडीज क्लब लॉनवर २३ मार्च २००९ ला असलेल्या एका लग्न समारंभात त्यांचा मोबाईल फोन पर्समधून चोरी गेला होता. मॉडेल क्रमांक नोकीया-५२०० आणि आयएमइआय क्रमांक ३५७६८९०११५९१७५६ असल्याची माहिती त्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना दिली. परंतु, फोन परत मिळेल असे वाटत नव्हते. पण, पोलिसांना त्यांचा फोन हुडकून काढण्यात तब्बल एक महिन्याने यश आले.
मोबाईल फोन हरवल्याची तक्रार अदखलपात्र आहे. परंतु चोरी झाल्याची तक्रार दखलपात्र मानली जाते. फोन हरविल्याची तक्रार गंभीरतेने घेतली जाईलच असे सांगता येत नाही. मात्र, चोरी गेलेल्या फोनच्या तपासात संबंधित मोबाईल कंपनीची मदत घ्यावी लागते. ही मदत मिळविण्यासाठी पोलीस उपायुक्तच्या माध्यमातून मोबाईल कंपनीशी संपर्क साधावा लागतो. चोरी गेलेल्या ‘हँडसेट’चा आयएमइआय क्रमांक कंपनीला सांगितला जातो. त्यातून त्या आयएमइआय क्रमांकाचा ‘हँडसेट’ वापरणारी व्यक्ती कोणत्याही ‘सव्र्हिस प्रोव्हायडर’ची सेवा घेत असेल तरी तो पकडला जाण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती अंबाझरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नामदेव इंगळे यांनी दिली. या तपासात हेड कान्स्टेबल आनंद वानखेडे, राजू मानेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असेही अंबाझरी ठाणेदार इंगळे म्हणाले.
आमदार व्हिक्टर फ्रेट्स यांच्याकडून
अंबाझरी पोलिसांना रोख बक्षीस
अंबाझरी पोलिसांच्या या कर्तबगारीवर आमदार व्हिक्टर फ्रेट्स जाम खुश झाले. फ्रेट्स यांनी अंबाझरी पोलिस ठाणे गाठून पोलिसांची प्रशंसा केली व रोख बक्षीस दिले. फ्रेट्स म्हणाले, ‘माझा एक लाख दहा हजार रुपयांचा ‘लॅपटॉप’ चोरीस गेला. त्यात बरीच महत्त्वाची माहिती होती. तो मिळाला नाहीच. तसेच चार ‘हँडसेट’ चोरीस गेले, त्यांचाही अद्याप सुगावा लागला नाही. परंतु, रिटा जॉन यांचा ‘मोबाईल फोन’ महिन्याभरात पोलिसांनी हुडकून काढला. त्यामुळे आपल्याला आनंद झाला. यासाठी अंबाझरीचे पोलीस कौतुकास पात्र आहेत.’