Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सर्वधर्मीय सभेत शांतता राखण्याचे आवाहन
सावनेरच्या चर्चवरील हल्ला प्रकरण
सावनेर, २६ एप्रिल / वार्ताहर

येथील डग्लस चर्चवर हल्ला झाल्यानंतर गावात शांतता स्थापन व्हावी यासाठी शुक्रवारी येथील बाजार चौकात नागरिक मंचतर्फे सर्वधर्मीय शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या

 

अध्यक्षस्थानी आमदार सुनील केदार होते. तर आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, कवी सुधाकर गायधनी, अॅड. सत्यनाथन, डॉ. सुरेश खैरनार, आरपीआयचे नेते विलास गजघाटे, डग्लस चर्चचे व्यवस्थापक मार्क मधुकर साखरपेकर, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय सत्यसोधक समाजाचे प्रमुख पॉल लार्सन, सत्यशोधक समाजाचे नेते सुनील सरदार प्रामुख्याने उपस्थित होते.
सावनेरच्या इतिहासात चर्चवर हल्ल्यासारखी निंदनीय घटना घडली. मात्र शहरवासियांनी कायदा हातात न घेता शांतता व सुव्यवस्था भंग होऊ दिली नाही. माझे कार्यकर्ते स्वत:चा खर्च करून चर्चच्या तोडफोडीची नुकसान भरपाई करतील, अशी ग्वाही सुनील केदार यांनी याप्रसंगी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या संविधानाचा सन्मान ठेवत सावनेरवासीयांनी संयम ठेऊन घडलेल्या घटनेनंतर प्रतिशोध व्यक्त केला नाही. यात आमदार सुनील केदार आणि येथील पोलीसांनी प्रशंसनीय काम केल्याचे गौरवोद्गार डॉ. यशवंत मनोहर यांनी काढले. पांढऱ्या शुभ्र कपडय़ांवर मूठभर लोकांनी डाग लावला, मात्र तेवढय़ाच तत्परतेने शहरवासीयांनी तो पुसण्याचे काम केल्याचेही ते म्हणाले.
शहरात शांतता राखल्याबद्दल सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भादीकर व पोलीस निरीक्षक दिलीप गवई यांनी मोलाचे काम केल्याने सुधाकर गायधनी यांनी त्यांची प्रशंसा केली. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय सत्यशोधक पॉल लार्सन यांनी इंग्रजीत दिलेले भाषण सुनील सरदार यांनी मराठीत अनुवाद करून सांगितले. त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.
अॅड. जयंतराव खेडकर यांनी प्रास्ताविकातून शांतता सभेची भूमिका विशद केली. सभेचे संचालन ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले. किशोर गुऱ्हारीकर यांनी आभार मानले. याप्रसंगी अहमद कादर, नागेश घोडकी, मधुकर माटे, नगरसेवक रामेश्वर रुशीया, विनोद जैन, व्यापारी संघाचे अध्यक्ष मदन पाटील, अविनाश काकडे, सुधीर मार्टीन व्यासपीठावर उपस्थित होते. तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक राष्ट्रवंदनेने सभेचा समारोप झाला. सभेला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.