Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

हापूस अजूनही भावातच !
पुणे, २६ एप्रिल / प्रतिनिधी

अक्षयतृतीयेसाठी कोकणच्या राजाची आवक चांगली झाली असली तरी कर्नाटकच्या राजाने मात्र त्याला मागे टाकत आपलाच ‘भाव’ वाढवून घेतला. रत्नागिरीच्या तयार मालाची सात हजार पेटय़ांची आज विक्री झाली तर त्यापेक्षा अधिक कर्नाटकच्या आंब्याची विक्री झाली. रंगाने पिवळसर असणाऱ्या कोकणच्या राजाची चव न्यारीच. पुणेकर खवय्यांना त्याची भुरळ पडली नसेल तर नवलच! सुट्टय़ा लागल्या आणि अक्षयतृतीया आली की आपोआपच मार्केट यार्डातील फळांच्या विभागाकडे ग्राहकांची पावले वळतात.

उत्तरपत्रिका घरी नेणाऱ्या विद्यार्थिनीसह निबंधकाला अटक
पिंपरीच्या डी.वाय.पाटील महाविद्यालयातील प्रकार
पुणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी
पेपर अवघड गेल्याने निबंधकाशी संगनमत करून विद्यार्थिनीने उत्तरपत्रिकाच घरी नेल्याचा प्रकार आज उघडकीस आला. पिंपरीतील वल्लभनगरच्या डी.वाय.पाटील महाविद्यालयात काल हा प्रकार घडला. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थिनीसह निबंधकाला अटक केली. विद्यापीठाच्या चार पुरवणी उत्तरपत्रिका, खान हिचे हॉल टिकीट, पेन, पेन्सिल, संबंधित विषयाचे पाठय़पुस्तक असा माल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. गुन्हे अन्वेषण शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

‘दुबळय़ा’ शिवसेनेकडून ‘प्रबळ’ राष्ट्रवादीला कडवे आव्हान
बाळासाहेब जवळकर

पिंपरी, २६ एप्रिल

लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने मावळ आणि शिरूर मतदारसंघात कमी ताकदीच्या ‘दुबळ्या’ शिवसेनेने अतिशय ‘प्रबळ’ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला कडवे आव्हान दिले आहे. शिवसेनेची वाढणारी हीच ताकद लोकसभेपाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताप्राप्तीची प्रबळ महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप-सेनेच्या जागावाटपात मावळ व शिरूरची जागा शिवसेनेच्या वाटय़ाला आल्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव यांना पुन्हा रिंगणात उतरवून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, तर जिल्हाप्रमुख गजानन बाबर यांना मावळमधून संधी देत सेनेने त्यांच्यावर जुगार खेळण्याचा निर्णय घेतला.

विद्यापीठ हे माणूस घडविणारे मंदिर - पाडगावकर
पुणे, २६ एप्रिल/खास प्रतिनिधी

‘विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे कार्यालय नसून माणूस घडविणारे मंदिर आहे,’ असे मत कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आज येथे व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या चौदाव्या स्थापनादिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. आनंद यादव, कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, संस्थेचे कार्यवाह विश्वजित कदम, डॉ. उत्तमराव भोईटे आदी या वेळी उपस्थित होते.

गंगाधर म्हमाणे यांना आज ‘वीरशैव भूषण’ पुरस्कार
पुणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्र वीरशैव सभेतर्फे उद्या आयोजित करण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या कार्यक्रमात गंगाधर म्हमाणे यांना वीरशैव समाजाच्या वतीने ‘वीरशैव भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वीरशैव सभा शहर समितीचे अध्यक्ष नरेंद्र व्यवहारे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. व्यवहारे म्हणाले, की पुरस्काराचे वितरण उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. याप्रंसगी दैनिक सकाळचे संपादक यमाजी मालकर, मोहन जोशी, िलगायत सेवा मंडळाचे अध्यक्ष बिपीनचंद्र ऊर्फ मेणकर, शांताराम बर्डे, कल्याण गाभणे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानात सायंकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी गुरुबाबा महाराज औसेकर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे, असेही व्यवहारे यांनी सांगितले.

‘लष्करातील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक’
पुणे, २६ एप्रिल/खास प्रतिनिधी

‘अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची माहिती देणारे तंत्रज्ञानाचे ज्ञान लष्करातील अधिकाऱ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळेच लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभ्यासक्रमांना यापुढील काळात वाढते महत्त्व राहील,’ असे मत मेजर जनरल राजीव दत्त यांनी आज येथे व्यक्त केले. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) पदवीदान समारंभात ते बोलत होते. संस्थेचे प्रमुख कर्नल अनिल कामोजी यांनी स्वागत केले. याप्रसंगी पदविका प्राप्त केलेल्या १२१ विद्यार्थ्यांपैकी ११२ हे लष्कराच्या नियमित सेवेतील होते. ग्रेफ केंद्रातील सहा, आसाम रायफल्समधील दोन आणि मॉरिशसमधील एकाचा त्यात समावेश आहे.

विजेचा गैरवापर उघडकीस
पुणे, २६ एप्रिल/ प्रतिनिधी

रहिवासी वापरासाठी घेतलेल्या वीजजोडातून व्यावसायिक कारणांसाठी वीजपुरवठा करून सुमारे एक लाख रुपयांहून अधिक किमतीच्या विजेचा गैरवापर केल्याचा प्रकार बिबवेवाडी भागातील गगण गॅलेक्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये उडघकीस आला. याबाबत ‘महावितरण’कडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोसायटीला रहिवासी वापरासाठी दिलेल्या मीटरमधून एअरटेल व रिलायन्स कंपनीच्या एक्सचेंजला व्यावसायिक कारणांसाठी वीज पुरवठा देण्यात आला होता. सुमारे एक वर्षांपासून हा वीजपुरवठा सुरू होता. सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष व महापालिकेतील अधिकारी श्रीनिवास कंदूल यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतहून याबाबत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार पद्मावती विभागाचे कार्यकारी अधिकारी पी. एम. भुंजे यांनी सोसायटीत जाऊन पाहणी केली. सुमारे एक वर्षांपासून हा वीजपुरवठा देण्यात आला असून, एक लाखाहून अधिक किमतीच्या विजेचा गैरवापर झाला असल्याचे भुंजे यांनी सांगितले. रहिवासी वापरासाठी दिलेल्या वीजजोडातून व्यावसायिक कारणासाठी वीज देण्याचा प्रकार वीज कायद्यानुसार गुन्हा असल्याने सोसायटय़ांनी अशाप्रकारे वीजपुरवठा देऊ नये, असे आवाहन भुंजे व कंदुल यांनी केले आहे.

निवडणुकीनंतर आता ‘मनसे’ गेमिंगमध्ये!
पुणे, २६ एप्रिल/खास प्रतिनिधी

निवडणुकीच्या रिंगणामध्ये हल्लाबोल केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता गेमिंगचे मैदान गाजविण्यासाठी सज्ज झाली आहे. गेमिंग क्षेत्रातील आघाडीच्या झपॅक डॉट कॉम या कंपनीशी त्यासाठी सहकार्य करार करण्यात आला असून कंपनीच्या संकेतस्थळावर मनसेचे विविध आविष्कार पाहण्यास मिळणार आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित शर्मा यांनी या नव्या प्रकल्पाबाबत माहिती दिली. मनसेला युवकवर्गाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळेच युवकांच्या आकर्षणाचा कें द्रबिंदू ठरलेल्या या संकेतस्थळावर मनसेने आता उपस्थिती लावली आहे. पारंपरिक राजकीय पक्षाच्या कामकाजापेक्षा हटके धोरण स्वीकारून मनसेने पारदर्शक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच झपॅकसारख्या संकेतस्थळाच्या माध्यमातून पक्षाची धोरणे स्पष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे तरूण वर्गाने व्यक्त केलेल्या स्वप्नांवर आधारित एक स्पर्धाही चालविण्यात येणार असून त्यामधील सवरेत्कृष्ट स्वप्न हे मनसेच्या धोरणांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. मनसेच्या आयटी विभागाचे प्रमुख केदार डोंबळकर यांनी सांगितले की, ‘मनसे हा तरुणाईचा ब्रॅण्ड आहे. त्यामुळेच झपॅकबरोबर सहकार्य करून तरुणाईशी थेट संपर्क साधण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.’

‘कर्णबधिर मुलांसाठी टाटा मोटर्सकडून मदत देण्याचा प्रयत्न ’
पुणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

‘समाजासाठी काही करू शकलो नाही याची मला खंत वाटत आहे. भविष्यात कर्णबधिर मुलांसाठी टाटा मोटर्सकडून मदत देण्याचा प्रयत्न करीन,’ असे उद्गार टाटा मोटर्सचे व्यवस्थापक आर. भास्कर यांनी आज काढले. कर्णबधिर बालकांच्या पालकांसाठी ‘कॉक्लिआ फॉर हिअरिंग अँड स्पीच’ या सोसायटीने १६ आठवडय़ांच्या अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. या अभ्यासक्रमाचा समारोप आज करण्यात आला. या वेळी मुंबईच्या अलियावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर दि हिअरिंग संस्थेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख राजीव जळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच राजीव जळवी व महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक अ‍ॅलन परेरा यांच्या हस्ते अभ्यासक्रमात सहभाग घेणाऱ्या पालकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी अनिशा सिन्हा, मनीषा मोहिते, दीप्ती जोशी, वर्षां वैद्य व इतर प्रमुख प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्षा देशपांडे यांनी केले, तर आर. भास्कर यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शिक्रापूर-चाकण मार्गावर टेम्पोच्या धडकेने वृद्ध ठार
शिक्रापूर, २६ एप्रिल/वार्ताहर

रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध इसमाला टेम्पोने जोरात धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास शिक्रापूर-चाकण मार्गावर पिंपळे जगतापजवळ हा अपघात झाला.
या अपघातात पांडुरंग शंकर खेडकर (वय ७५, रा. खेडकर वस्ती, पिंपळे जगताप, ता. शिरूर) हे जागीच मृत्युमुखी पडले. शिक्रापूर पोलिसांनी अपघाताविषयी दिलेली माहिती अशी- पांडुरंग खेडकर नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी घरातून पाहेर पडले. रस्ता ओलांडत असताना चाकणहून शिक्रापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने (एमएच-१४-व्ही-३३००) त्यांना जोरात धडक दिली. या धडकेने ते जागीच ठार झाले. सयाजी पांडुरंग खेडेकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, टेम्पो चालक दिनकर दुर्योधन करदळे (रा. जांभुळके, ता. आटपाडी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

लष्करी महाविद्यालयात एड्सविषयक कार्यशाळा
पुणे, २६ एप्रिल / प्रतिनिधी

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने एचआयव्ही एड्स संदर्भात तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन क रण्यात आले होते. एचआयव्हीच्या उपचारांबाबत पूरक उपचारपद्धती (पॅलेशिएशन) या विषयावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मेजर जनरल एच.एल. काकरिया यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन महाविद्यालयाचे अतिरिक्त संचालक मेजर जनरल बी. एस. राठोर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. एचआयव्ही मार्गदर्शन करणारे सादरीकरण यावेळी करण्यात आले. मेजर जनरल काकरिया यांनी एचआयव्ही एड्सच्या उपचार आणि निगा राखणाऱ्या पूरक पद्धतींसंदर्भात भाष्य केले. ‘एचआयव्ही सारख्या आजार असलेल्या रुग्णाला सामान्य जीवन जगता यावे यासाठी आवश्यक पूरक उपचार व निगा राखणाऱ्या पद्धतींचा शोध लागला पाहिजे,’ अशी अपेक्षा मेजर जनरल एच. एल. काकरिया यांनी व्यक्त केली.

डॉ. वसंतराव देशपांडे फाऊंडेशनचा संगीत महोत्सव दोन मे पासून
पिंपरी, २६ एप्रिल / प्रतिनिधी

चिंचवड येथील डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने या वर्षी दोन व तीन मे रोजी एकविसाव्या वार्षिक संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पं. अजय पोहनकर यांचे गायन, पं. सुरेश तळवळकर यांचे तबलावादन व स्वाती दैठणकर यांच्या नृत्याचा कार्यक्रम हे यंदाचे प्रमुख आकर्षण आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना दामले यांनी ही माहिती दिली. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणारा हा संगीत महोत्सव संगीत रसिकांसाठी खुला आहे. महोत्सवाचे उद्घाटन दोन मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. पहिल्या दिवशी ओंकार दादरकर (मुंबई) यांचे गायन होणार आहे. त्यानंतर पं. पोहनकर यांचे गायन होणार आहे. दुसऱ्या दिवशी, रविवारी नचिकेत देव यांचे गायन व त्यानंतर स्वाती दैठणकर यांचा शिवोहम् हा भरतनाटय़म नृत्याचा विशेष कार्यक्रम सादर होईल. पं. तळवळकर यांच्या तालमाला या तबलावादनाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. संगीत रसिकांनी मोठय़ा संख्येने महोत्सवात सहभागी होऊन या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दामले यांनी केले आहे.

गरवारे वॉल रोप्समधील भंगार मालास आग
पिंपरी, २६ एप्रिल / प्रतिनिधी

चिंचवड थरमॅक्स चौकातील गरवारे वॉल रोप्स कंपनीच्या आवारात असलेल्या भंगार मालाच्या गोदामास आज दुपारी आग लागली. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. तथापि, पोलिसांकडून घटनेचा शोध सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी ए. डी. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वा चारच्या सुमारास गरवारे वॉल रोप्स कंपनीवरुन गेलेल्या उच्चदाब वाहिनीत झालेल्या घर्षणामुळे ठिणगी पडून आवारात असलेल्या भंगार मालास प्रथम आग लागली, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या प्रत्येक केंद्राची एक गाडी व टँकर तसेच बजाज आणि फोर्स मोटर्स कंपनीचे बंब घटनास्थळी आले. आग नेमकी कोठे लागली आहे, याचा शोध घेत असतानाच ही आग अचानक कंपनीचा लेखाजोखा ठेवलेल्या गोदामाकडे पसरली.

वैद्यक परिषदेसाठी सोळा टक्केच मतदान!
पुणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्र वैद्यक परिषदेसाठी राज्यातील ३६ केंद्रांवर आज झालेल्या मतदानाचे प्रमाण हे अत्यल्प असून, ते प्रमाण १६.२० टक्के एवढे आहे. एकूण ७५ हजार मतदारांपैकी १२ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने डॉक्टरांमध्येही मतदानाविषयी उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र वैद्यक परिषदेसाठी राज्यात आज मतदान झाले. एकूण ३६ केंद्रांवर मतदान करण्यात आले. जिल्ह्य़ाच्या ठिकाणी एकच मतदान केंद्र असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्या डॉक्टरांच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरले. या कारणास्तव मतदानाचे प्रमाण घटले, असे काही तज्ज्ञांनी सांगितले. ७४ हजार ८६७ मतदारांपैकी १२ हजार १२९ एवढय़ा मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचे प्रमाण हे १६.२० टक्के एवढे आहे. राज्यात सर्वाधिक मतदान हे नागपूरला झाले असून, ते तीस टक्के इतके आहे. पुण्यात ११.५१ टक्के, गोिदया ५० टक्के (१८२ पैकी ९१ मतदारांनी हक्क बजावला), मुंबई शहर ९.५४ टक्के, मुंबई उपनगर जिल्हा ११.५१ टक्के असे प्रमाण आहे. अन्य ठिकाणीही त्याचे फारसे प्रमाण चांगले नाही. मतमोजणी येत्या दोन मे रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. बी.एस. तायडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

महिलेची छेड काढणाऱ्या रोमियोला नागरिकांचा चोप
पिंपरी, २६ एप्रिल / प्रतिनिधी

चिंचवड गावातील गांधीपेठेमध्ये अंधाराचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोस शनिवारी परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी चांगलाच चोप दिला. या रोडरोमियोस पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सुभाष मगर (वय २६, रा. पडवळनगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या रोमियोचे नाव आहे. याबाबत थेरगावमध्येच राहणाऱ्या एका २६ वर्षीय विवाहित महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला संगणक अभियंता असून तिचा पतीही संगणक अभियंता आहे. शनिवारी कंपनीला सुट्टी असल्याने ते गांधीपेठ बाजारपेठेत फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, सागरने बाजारपेठेत वीज पुरवठा खंडित झालेला असल्याचा फायदा घेऊन तिचा हात पकडून अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. तिचा हात सोडविण्यासाठी आलेल्या पतीस त्याने धक्काबुक्की केली. तिने आरडाओरड करून नागरिकांना एकत्र येण्यास भाग पाडले. नागरिकांनी त्याला चोप देऊन चिंचवड पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्या ताब्यात दिले. अधिक तपास फौजदार महादेव तोंदले करीत आहेत.