Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

राज्य

अल्पसंख्याक समाज काँग्रेससोबतच
- विलासराव देशमुख

भिवंडी, २६ एप्रिल/वार्ताहर

मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत भिवंडी या यंत्रमागनगरीच्या समस्या सोडविण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले. त्यामुळे भिवंडीकर जनता मोठय़ा मताधिक्याने काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांना दिल्लीदरबारी पाठवतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी खंडूपाडा आमपाडा येथील प्रचारसभेत व्यक्त केला या सभेस वस्त्रोद्योग मंत्री अनिस अहमद, हर्षवर्धन पाटील, रविशेठ पाटील, विलास पवार यांच्यासह महापौर जावेद दळवी, उमेदवार सुरेश टावरे उपस्थित होते. भिवंडी यंत्रमाग उद्योगासाठी २७ हॉर्सपॉवरची अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

वसईतील सभेत सोनियांचे आवाहन
धर्माच्या नावावर देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना झिडकारा
ठाणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी
देशाला सुरक्षेची हमी आणि अखंडता व एकता टिकविण्याची क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. धर्माच्या नावावर देशाच्या एकतेला सुरुंग लावणाऱ्या भाजप-शिवसेनेसारख्या जातीय पक्षांना मते देऊ नका, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वसई येथील प्रचारसभेत केले. पालघर व भिवंडी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अनुक्रमे दामोदर शिंगडा व सुरेश टावरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी गांधी वसईत आल्या होत्या. यावेळी त्यांची सेंट ऑगस्तीन हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा झाली.

पिंपळगावच्या किराणा व्यापाऱ्याची हत्या
वणी, २६ एप्रिल / वार्ताहर

पिंपळगाव बसवंत येथील किराणा मालाचे व्यापारी प्रदीप झुंबरलाल छाजेड (५२) यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये हिसकावून घेत त्यांची हत्या केल्याचा प्रकार सुरगाणा तालुक्यात उघडकीस आला आहे. संशयितांना त्वरीत शोधून काढावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. छाजेड हे शुक्रवारी वणी येथे व्यापाऱ्यांकडून किराणा मालाची वसुली करण्यासाठी गेले होते.

अपघातप्रवण क्षेत्रातील महामार्गाला चौपदरीकरणाची प्रतीक्षा
जितेंद्र पराडकर, संगमेश्वर, २६ एप्रिल

मुंबई-गोवा महामार्गाची निर्मिती ही ब्रिटिशकालीन देणगी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बंदरांच्या माध्यमातून व्यापारउदीम चालत असे. दोन बंदरांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून या महत्त्वपूर्ण मार्गाची उभारणी करण्यात आली. पूर्वीचा लालमातीचा हा रस्ता टप्प्याटप्प्याने सुधारण्यात आला. कोकणात कोकण रेल्वे सुरू झाली तरी या राष्ट्रीय महामार्गाचे महत्त्व तसूभरही कमी झाले नाही. अशा स्थितीत वाढत्या वाहतुकीमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्राला चौपदरीकरणाची प्रतीक्षा आहे.

चिंदरच्या भगवती उत्साही मंडळातर्फे आचरा येथे ‘२६/११’ चे छायाचित्र प्रदर्शन
सावंतवाडी,२६ एप्रिल/वार्ताहर
रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची छायाचित्रे मुंबईतील छायाचित्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून टिपली होती. यातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर आणि ठाणे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मे २००९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात न्यू इंग्लिश स्कूल आचरा, ता. मालवण येथे भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन विनामूल्य आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्ष राहावयास हवे. आपले संरक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्यावरच आहे. हा संदेश जनमानसांत पोहचविण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे सर्वसामान्य नागरिक जागरूक होतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे भगवती उत्साही मंडळाचे अध्यक्ष आत्माराम नाटेकर आणि विलास हडपी यांनी सांगितले.

निंभोऱ्यात युवकाची हत्या; दोघांना अटक
भुसावळ, २६ एप्रिल / वार्ताहर

तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील युवकाची सासरा व शालकाने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातील कनाथर येथील मूळ रहिवासी सुनील कोली (२८) हा युवक गेल्या काही महिन्यांपासून निंभोरा येथे सासरवाडीत राहून भाजी विक्री करीत होता. व्यसनाधीन सुनीलचे नेहमी घरात पत्नीसह सर्वाशी भांडण होत होते. त्याच्या भांडणास वैतागून त्याचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने सासरा छोटेलाल कोली व शालक पप्पू कोली या दोघांनी सुनीलचे हातपाय दोरीने बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. सासरा व शालक या दोघांनाअटक करण्यात आली आहे.

वणीजवळील अपघातात एक ठार सहा जखमी
वणी, २६ एप्रिल / वार्ताहर

क्वालिस व बसची धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना वणी-कळवण मार्गावरील दरेगाव फाटय़ाजवळ घडली.
वणी येथील रहेमतुल्ला फकीर मोहंमद पठाण (५५) हे सटाणा येथे मुलीकडे कुटुंबियांसह जात असताना हा अपघात झाला. क्वालिस दरेगाव फाटय़ाजवळ आली असता समोरून बसची धडक बसल्याने रहेमतुल्ला पठाण हे जागीच ठार झाले तर इम्तियाज पठाण (४८), जहीर पठाण (३०), अश्रफ पठाण (२६), अकीला शेख व तिचे दोन लहान मुले जखमी झाले. वणी येथील ग्रामीण रूग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर जखमींना नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.