Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

क्रीडा

मुकेश सिंग ‘मिस्टर इंडिया’
महाराष्ट्राच्या कातुर्डेची संधी हुकली
अरुण राज ‘बेस्ट पोझर’
दिल्लीला सर्वसाधारण विजेतेपद
मुंबई, २६ एप्रिल / क्री. प्र.

मयम सन्याल, अरुण शोकिन, फहीम राजा, सागर कातुर्डे, नेपाल सिंग, वीरेंद्र मल्हान, सुदेश पवार, विक्रम, मुकेश सिंग अशी विविध गटातील अव्वल खेळाडूंनी पंचांनी सांगितल्याप्रमाणे पोझेस दिल्या आणि आता प्रतीक्षा होती २००९चा मिस्टर इंडिया कोण याची? महाराष्ट्राचा सागर कातुर्डे आणि दिल्लीचा मुकेश सिंग यांना पुन्हा एकदा पंचांकडून पोझेस दाखविण्याची विनंती..तेव्हाच या दोघांमधूनच मिस्टर इंडिया निश्चित होणार हे स्पष्ट झाले. शरीराचे आकारमान, स्नायूंची ठेवण आणि अनुभव या जोरावर ‘काँटे की टक्कर’ झाल्यानंतर अखेर पंचांनी विजेतेपदाची माळ टाकली गतविजेता मुकेश सिंगच्या गळ्यात.

अर्धशतकी खेळीने आत्मविश्वास
परत आला- सायमंड्स

मेलबर्न, २६ एप्रिल/वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आपली कारकीर्द पुन्हा आकार घेईल ही आशा मी पूर्णपणे सोडून दिली होती, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्रय़ू सायमंड्स याने व्यक्त केली आहे. या सामन्यातील अर्धशतकी खेळीने माझा गमावलेला आत्मविश्वास परत येण्यास मोठी मदत होईल, असेही त्याने म्हटले आहे.

कबड्डी: विश्वशांती व शिवशक्ती अंतिम फेरीत
मुंबई, २६ एप्रिल/क्री.प्र.

श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित ५८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात विश्वशांती क्रीडा मंडळ, मुंबई शहर व शिवशक्ती क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर या संघांनी अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळवला, तर पुरुष गटात छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली, अमर हिंद क्रीडा मंडळ, मुंबई शहर, उत्कर्ष क्रीडा मंडळ, मुंबई शहर व सात आसरा स्पो. क्लब या संघांनी उपान्त्य फेरीत खेळण्याचा मान मिळवला.

‘सुपर ओव्हर’ ने उडविली
‘बोल आऊट’ ची दांडी

मुंबई, २६ एप्रिल / वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगमधील लढतीत झालेली बरोबरी आणि त्यानंतर ‘सुपर ओव्हर’द्वारे ठरविण्यात आलेला विजेता यामुळे ‘सुपर ओव्हर’बद्दल प्रत्येक क्रिकेटचाहत्याच्या मनात एक वेगळे कुतुहल निर्माण झाले आहे. मुळात अशी बरोबरी झाल्यानंतर ‘बोल आऊट’ हा नियम होता. त्यानुसार प्रत्येक संघाला गोलंदाजीद्वारे जास्तीतजास्त वेळा यष्टय़ा उद्ध्वस्त करण्याची संधी मिळत होती. पण यातून दोन्ही संघातील क्रिकेटमधील कौशल्य पणाला लागत नव्हते.

ट्वेन्टी-२०साठी कसोटीला ओरामराम
दरबान, २६ एप्रिल/वृत्तसंस्था

एकदिवसीय आणि ट्वेंटी २० क्रिकेटमध्ये आणखी खेळता यावे यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा आपण विचार करीत आहोत, असे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेकब ओराम याने म्हटले आहे. क्रिकइन्फो या संकेतस्थळाशी बोलताना ओराम याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्स सज्ज
पोर्ट एलिझाबेथ, २६ एप्रिल/ पीटीआय
पहिल्या सामन्यात विजयाची चव चाखल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांना त्यानंतरच्या सामन्यांमध्ये विजय मिळविणे शक्य झाले नसल्याने विजयाच्या मार्गावर परतण्यासाठीच उद्या दोन्हीही संघ सज्ज असतील.

चेन्नईला चार्ज व्हावे लागेल
दरबान, २६ एप्रिल/ पीटीआय

आयपीएलच्या पहिल्या सत्रात अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्जला या सत्रात मात्र लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नसून त्यांना यावेळी चार्ज व्हावेच लागेल. गिलख्रिस्टचा डेक्कन संघ मात्र नावाप्रमाणे फुल चार्ज असून विजयी घौडदौड कायम राखण्याचाच प्रयत्न असेल.

क्रिकेट : अंजुमन इस्लाम आणि जाधव क्रिकेट क्लब विजयी
मुंबई, २६ एप्रिल/क्री.प्र.

सैफ खान या सलामीवीराने ४१ चेंडूमध्ये ५५ धावा केल्याने ९ बाद १३८ अशी चांगली धावसंख्या उभारणाऱ्या अंजुमन इस्लाम (इंग्लिश) संघाने त्यानंतर लिटल स्टार स्पोर्टस् क्लबला ९ बाद १०४ असे रोखले आणि डॉ. केएम मुन्शी स्मृती (१४ वर्षांखालील) टी-२० स्पर्धेची उपान्त्यपूर्व फेरी गाठली. अमन मोहम्मद, अष्टपैलू गुळे (३४) आणि कृतिक हिंगवाडी यांनी प्रत्येकी तीन बळी घेत अंजुमनला विजय मिळवून देण्यात तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावली.

पंजाब दी रॉयल व्हिक्ट्री; राजस्थानचा पराभव
केपटाऊन, २६ एप्रिल / वृत्तसंस्था
कुमार संगकाराच्या जिगरबाज ६०धावा व युसूफ अब्दुल्लाने २१ धावांत घेतलेले ३ बळी यामुळे पंजाब किंग्ज इलेव्हन संघाने गतविजेत्या राजस्थान रॉयल संघाला २७ धावांनी पराभूत करण्याची करामत केली व आपली गुणांची संख्या चारवर नेली. शेन वॉर्नच्या राजस्थान संघाने पंजाबला १३९ धावांवर रोखून आपण विजय मिळविणार असे चित्र निर्माण केले पण ही छोटी धावसंख्या पार करताना त्यांची दमछाक झाली. इरफान पठाणने अस्नोडकर व स्मिथ यांनी झटपट माघारी धाडल्यानंतर राजस्थानचा संघ सावरूच शकला नाही. रवींद्र जडेजाच्या ३७ तर शेन वॉर्नच्या ३३ धावा वगळता राजस्थान संघ पुरता अपयशी ठरला व त्यांना २० षटकांत ७ बाद ११२ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

क्रिकेट: एच.डी.एफ.सी. व स्टँडर्ड चार्टर्ड अंतिम फेरीत
मुंबई, २६ एप्रिल/क्री.प्र.

एच.डी.एफ.सी. बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड यांनी ५३ व्या सर बेनेगल रामराव आंतर बँक क्रिकेट स्पर्धेच्या ज्युनियर गटातून अंतिम फेरीत धडक मारली. एच.डी.एफ.सी.ने आय.सी.आय.सी.आय.च्या २१३ धावांचे आव्हान ८ विकेटस् गमावून पूर्ण केले. किरण मुथुकृष्णन (७४) याने प्रथम राजीव देठेसह तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची आणि नंतर निरंजन प्रसादसह (नाबाद ४४) सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागी रचून संघाला अंतिम फेरीत नेले. मुथुकृष्णनने ७४ धावांच्या खेळीत ९ चौकार व एक षटकार ठोकला. दुसऱ्या उपान्त्य लढतीत अमर आरतेच्या अष्टपैलू (३५/३ व नाबाद ६०) खेळीमुळेस्टँडर्ड चार्टर्ड बँकेने अभ्युदय बँकेवर पाच विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला. अमर आरते, विनय बापट (प्रत्येकी ३ बळी) यांनी अभ्युदय बँकेला ३८ षटकांत १५४ धावांत गुंडाळले. हे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची ३ बाद १० अशी नाजूक अवस्था होती; मात्र आरतेने दीपक माळेकर (२३) सह चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागी रचून संघाचा डाव सावरला व नंतर संदीप अगरवालने केवळ २२ चेंडूत सहा चौकार व दोन षटकारांसह नाबाद ४३ धावा करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.