Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

व्यक्तिवेध

अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या ज्येष्ठ लेखिका शांता रामा राव यांचे नुकतेच निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. पाशि्चमात्यांचे भारताविषयीचे गैरसमज दूर करून त्यांना भारताचे वास्तव दर्शन घडविणारे ललित लेखन करणाऱ्या भारतीय वंशाच्या लेखकांच्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधी म्हणून त्या लक्षात राहतील. आणि अर्थातच लक्षात राहतील त्या ई. एम. फॉर्स्टरच्या ‘अ पॅसेज टू इंडिया’ या प्रसिद्ध कादंबरीच्या नाटय़रूपांतरकार म्हणूनही. त्यांनी ऑक्सफर्ड प्लेहाऊससाठी केलेले हे नाटय़रूपांतर १९६०मध्ये लंडनच्या वेस्ट एण्ड थिएटरमध्ये सादर करण्यात येऊ लागले. तिथे त्याचे २६१ प्रयोग झाले. त्यानंतर दोन वर्षांनी न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवेवर त्याचे १०९ प्रयोग झाले. १९६५मध्ये या नाटकाचे बीबीसीसाठी दूरचित्रवाणी माध्यमासाठी जॉन मेनार्ड यांनी

 

रूपांतर केले व वारिस हुसैन यांनी ते दिग्दर्शित केले. पुढे १९८४ मध्ये डेव्हिड लीन यांनी त्यावर चित्रपट बनवला. शांता राव यांचा जन्म चेन्नईमधला. २४ जानेवारी १९२३चा. वडील सर बेनेगल रामा राव हे डिप्लोमॅट, तर आई धनवंती या भारतीय महिलांच्या हक्कांसाठीच्या चळवळीत होत्या, तसेच प्लॅन्ड पेरेंटहूड या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होत्या. शिक्षणासाठी शांता रामा राव यांना इंग्लंडला पाठविण्यात आले. तिथे १९३९ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेटस इथल्या वेलस्ली कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत. १९४४ मध्ये त्या पदवीधर झाल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर बेनेगल रामा राव याची नियुक्ती भारताचे जपानमधले पहिले राजदूत म्हणून झाली आणि राव कुटुंब टोकिओला गेले. तिथेच फॉबियन बॉवर्स या अमेरिकन तरुणाशी शांता राव यांचा परिचय झाला आणि १९५१ मध्ये त्यांच्याशी विवाह करून त्या न्यूयॉर्कला गेल्या. तिथे ब्राँक्सविलेच्या सारा लॉरेन्स कॉलेजमध्ये त्या शिकवू लागल्या. जोडीला लेखनही सुरू केले. शांता राव यांनी कादंबरीलेखन केले आणि प्रवासवर्णनपर लेखनही खूप केले. किंबहुना त्या त्यांच्या प्रवासवर्णनांसाठी विशेष ओळखल्या जाऊ लागल्या. या त्यांच्या कादंबऱ्यांनाही प्रवासवर्णनात्मकतेची गहिरी डूब आहे आणि त्यामुळे त्यांना काहीसा आत्मचरित्रात्मक बाजही आहे. ‘होम टू इंडिया’, ‘ईस्ट ऑफ होम’, ‘धिस इज इंडिया’, ‘माय रशियन जर्नी’, ‘गिफ्ट्स ऑफ पॅसेज’, ‘व्ह्यू टू द साऊथईस्ट’, ‘अ प्रिन्सेस रिमेंबर्स’, ‘अ‍ॅन इनहेरिटन्स’ ही त्यांची पुस्तके याची साक्ष देतील. ‘रिमेंबर द हाऊस’ आणि ‘द अ‍ॅडव्हेंचरेस’ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. तशीच विशेषत्वाने गाजली ती ‘गिफ्ट्स ऑफ पॅसेज’मधली त्यांची आत्मचरित्रात्मक कथा - ‘बाय एनी अदर नेम’. या कथेतल्या छोटय़ा शांता आणि त्यांची मोठी बहीण प्रमिला या अँग्लो-इंडियन शाळेत शिकत असताना शिक्षिका त्यांचे सिथिंया आणि पामेला असे नामकरण करते. एवढेच नव्हे, तर ‘भारतीय हे फसवेगिरी करणारे असतात’ असेही विधान करते. तेव्हा प्रमिला वर्गाबाहेर पडते, आपल्या धाकटय़ा बहिणीच्या वर्गात जाऊन तिला बाहेर बोलावून घेते आणि दोघीही शाळा सोडतात ती पुन्हा त्या वंशभेद करणाऱ्या शाळेचे तोंड न पाहण्यासाठीच. १९६६ मध्ये शांता राव या फॉबियन बॉवर्स यांच्यापासून विभक्त झाल्या आणि १९७७ मध्ये त्यांनी गडरेन वॉटल्स यांच्याशी विवाह केला. शांता राव आणि फॉबियन बॉवर्स यांच्या मुलाचे नाव जय पीटर बॉवर्स. अमेरिकन जीवनशैलीत आयुष्य व्यतीत करूनही शांता राव यांच्यातल्या भारतीय अस्मितेचे अस्तित्व सतत जाणवत राहिले आहे.