Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

पाणी टंचाई
आराखडा फसला

प्रशांत देशमुख,वर्धा, २६ एप्रिल

पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सादर केलेला उपाययोजनांचा आराखडा पूर्णत: फ सला आहे. परिणामी भरीव तरतूद करीत नव्याने सादर केलेला आराखडा तहानलेलेल्यांना केव्हा पाणी देणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अपवाद वगळता जिल्ह्य़ात पाणीटंचाई नाही. उद्योगांचा व शेतीचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार नाही. टंचाईची ओरड नाही. अशी विधाने दोन महिन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. पुलगावच्या टंचाईबाबत प्रश्नांचा भडीमार झाल्यावर ओरड निर्थक असल्याचे भाव दर्शवित जिल्हाधिकारी पत्रकार परिषदेतून उठून गेले होते. मात्र आज प्रशासन पूर्णत: तोंडघशी पडल्याची स्थिती दिसून आली आहे.

चारा गुरांची भटकंती
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, २६ एप्रिल

पाणीटंचाई सोबतच या जिल्ह्य़ातील पशुपालकांना चारा टंचाईला तोंड द्यावे लागत असून तीव्र उन्हामुळे जंगलातील गवत नष्ट झाल्याने पशुंना चाऱ्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चारा टंचाईची तीव्रता अधिक आहे. तीव्र उन्हामुळे यंदा एप्रिल महिन्यात जिल्ह्य़ातील लोकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नदी, नाले, विहिरी, हातपंप आणि आता सिंचन प्रकल्पातील पाणी कमी होत चालल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वन्यप्राण्यांची गावांकडे धाव
यवतमाळ, २६ एप्रिल/ वार्ताहर

यवतमाळ जिल्ह्य़ात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई आणि उन्हं यामुळे केवळ जनताच त्रस्त झालेली नाही तर जंगलातील वन्यप्राणीसुद्धा पाण्याअभावी त्रस्त होऊन त्यांनी गावांकडे धाव घेतली आहे. तापमानदर्शक यंत्रातील पारा दिवसेंदिवस वर चढत असून आग ओकणाऱ्या सूर्याच्या तप्त उन्हांमुळे नदी, नाले, तलाव, विहिरी आटल्या आहेत. सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी वेगाने कमी झाल्याने अभयारण्यातील प्राणी पाण्याच्या शोधासाठी गाव- शहराकडे मोर्चा वळवत असल्याचे वृत्त आहे.

अनिल मोहिलेंसोबत सुरेल गीतयात्रा
‘स्वप्नातल्या कळ्यांनो’..

डॉ. सुलभा पंडित

संगीतकार अनिल मोहिले हे नाव मराठी आणि हिंदी संगीतप्रेमींच्या परिचयाचेच आहे. अनिल-अरुण ही जोडी म्हणजे संगीतकार अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल हेही रसिक जाणतात. याखेरीज कवी अनिल मोहिले, संगीत संयोजक अनिल मोहिले आणि, व्हायोलिन वादक अनिल मोहिले अशीही त्यांची ओळख आपल्याला आहेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लता मंगेशकर यांच्यासमवेत अनेक मोठय़ा कार्यक्रमातून देशात आणि विदेशातही त्यांनी संगीत संयोजक म्हणून कामगिरी बजावली आहे.

युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
अकोला, २६ एप्रिल/प्रतिनिधी

अभूतपूर्व पाणीटंचाई असतानाही शहरातील अनेक भागात बांधकामे सुरू असून ही कामे त्वरित बंद करण्यात यावीत या मागणीसाठी युवक काँग्रेसने २७ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त गिरीधर कुर्वे यांना या संदर्भात नुकतेच निवेदन सादर क रण्यात आले. भीषण पाणीटंचाई असल्यामुळे बांधकामे थांबवण्यात यावी, फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आयुक्तांच्या कक्षात २७ एप्रिलपासून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महानगर युवक काँग्रेस अध्यक्ष मनीष हिवराळे, इलियास गौरवे, संजय देशमुख, गणेश क ळसकर, अयज बुंदेले, विराज निचळ, अनिल उंबरकर, अशोक तिवारी, संजय वर्मा, सोनु जयरत्नम, आशीष वर्मा, राहुल वानखडे, मनोज पाटील, श्याम शर्मा, प्रभुदास खेडकर आदींनी हा पवित्रा घेतला आहे.

मूर्तीजापुरात दूषित पाणीपुरवठा
मूर्तीजापूर, २६ एप्रिल/ वार्ताहर

आग ओकणाऱ्या सूर्याचा दाहक प्रताप आणि भीषण पाणीटंचाईत होरपळणाऱ्या मूर्तीजापूरवासीयांवर आता आणखी एका जीवघेण्या संकटाचे सावट दिसू लागले आहे. दर २० ते २५ तर कधी ३० दिवसाड मिळणाऱ्या पाण्याची साठवणुक, दूषित पाण्याचा पिण्यासाठी नाईलाजाने उपयोग करावा लागत असल्यामुळे येथील रुग्णालयांमधून अतिसारग्रस्त रुग्णांची गर्दी दिसू लागली आहे. अशावेळी आरोग्य खात्याने विशेष दखल घ्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. भीषण पाणीटंचाईपोटी शहरातील नागरिकांना घरातील मोठमोठय़ा भांडय़ात साठवून ठेवलेले पाणी पिणे अपरिहार्य असल्याने अतिसारासारख्या साथीच्या रोगांची लागण सुरू झाल्याचे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर होऊ लागल्याने पोटाचे विकार, गॅस्ट्रो डायरिया, जॉइंडीस सारख्या रोगांचा धोका वाढत असून त्याचे कमी अधिक प्रमाणात प्रत्यंतर उपचारार्थ रुग्णालयांमधून उपचार करणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून येऊ लागले आहे. आरोग्य विभागाच्या इशाऱ्यानुसार जास्तीत जास्त चार दिवस साठलेले पाणी पिण्यायोग्य असू शकते. मात्र, मूर्तीजापूरवासीयांवर १५ ते २०, ३० दिवस साठवून ठेवलेले पाणीही पिण्याची सद्यस्थिती असल्याने शहराचे आरोग्यच धोक्यात आले असल्याचे सुज्ञ नागरिक बोलू लागले आहे.

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
चंद्रपूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

सरदार पटेल स्पोर्ट्स अकादमींतर्गत स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत छोटूभाई पटेल सभागृहात घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पध्रेत जिल्हय़ातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.टी.एफ. गुल्हाणे यांच्याशी संपर्क साधावा.

उष्माघातापासून बचाव करा
बुलढाणा, २६ एप्रिल/ वार्ताहर

सर्वसाधारणपणे एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादूर्भाव होतो. त्यामुळे मृत्यू उद्भवू शकतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. कसबे यांनी केले आहे. उन्हाळ्यात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे जास्त वेळ करू नये, कारखान्याला बॉयलर रुममधील काम, काच कारखान्यातील काम, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम, घट्ट कपडय़ांचा वापर, तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध यामुळे लवकर उष्माघात होतो. उष्माघात झालेल्यास थकवा, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, बेचैनी व अस्वस्थता येणे आदी लक्षणे आढळून येतात. उष्माघातावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाचे काम सकाळी किंवा सायंकाळी कमी तापमानात करावे, उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नयेत, पांढऱ्या रंगाचे सैल कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करून भरपूर पाणी प्यावे अथवा सरबत घ्यावे, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी किंवा पांढऱ्या रुमालाचा वापर करावा, उष्माघात झालेल्या रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात, एवढे करूनही रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास दवाखान्यात दाखल करावे, असे आवाहन डॉ. कसबे यांनी केले आहे.

युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक, सात जणांविरुद्ध गुन्हा
अकोला, २६ एप्रिल/प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून झालेल्या युवकाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्याच्या लहान उमरी परिसरात बाल्या ऊर्फ पुरुषोत्तम बांडेबुचे (२७) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. लहान उमरीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक पाच च्या आवारात ही घटना गुरूवारी रात्री घडली होती. मारेकरऱ्यांनी चाकू आणि तलवार तेथेच टाकून पळ काढला होता. पुरुषोत्तम बांडेबुचेचे वडील बाबुराव कानोदी बांडेबुचे यांनी सिव्हिल लाईन्स पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बबलू जगताप, तानाजी जगताप व त्याची दोन मुले, बबन जगताप आणि त्याचे दोन भाचे या सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू जगताप आणि सचिन पवार या दोघांना शुक्र वारी रात्री अटकही करण्यात आली आहे. या दोघांनीही खुनाची कबुली दिली असून, पूर्ववैमनस्यातून बांडेबुचेचा काटा काढल्याचे पोलिसांना सांगितले आहे. अन्य आरोपींनाही लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिव्हिल लाईन्सचे ठाणेदार बी.एम. मल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र उमक, यशवंत शिंदे, दीपक तायडे, केशव भालतिलक, अनिल धनभर, अजय बिहाडे, उमेश लाखे, सतीश बोदडे, महेंद्र बराटे आदींनी ही कारवाई केली.

विद्या दळवी यांचा गौरव
चंद्रपूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

अग्निशमकाच्या साहाय्याने आग विझवणे या स्पध्रेत महाऔष्णिक विद्युत केंद्र येथील दवाखान्यातील परिचारिका विद्या सतीश दळवी हिने उत्कृष्ट महिला अग्निशमक म्हणून द्वितीय क्रमांक पटकावला. १४ ते २० एप्रिल हा कालावधी अग्निशमक सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. ऊर्जानगरातील महाऔष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत अग्निशमक विभागातर्फे स्वयंपाक घरातील आग विझवणे, अग्निशमकाच्या साहाय्याने आग विझवणे अशा दोन स्पर्धा महिलांकरिता घेण्यात आल्या. त्यांना मुख्य महाव्यवस्थापक विजय सिंह व चव्हाण चौधरी यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ वाघमारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.
विद्या दळवी यांच्या यशाबद्दल काळे, साहाय्यक संचालक सुरक्षा विभाग, डॉ. किशोर राऊत, डॉ. अशोक कासटवार, डॉ. अमित ग्वालवंशी, अविनाश राखुंडे, येशुदास मेश्राम, जुनघरे, मनोज भगत, चंदा हजारे व अन्य कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

क्रीडा प्रशिक्षण शिबिराला उत्तम प्रतिसाद
गोंदिया, २६ एप्रिल/ वार्ताहर

भारतीय क्रीडा मंडळ व जिल्हा ग्रामीण लेदर क्रिकेट संघटनेच्या संयुक्त वतीने क्रिकेट प्रशिक्षण शिबिर १० एप्रिल ते २० मे पर्यंत इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन समाज सेवक नानू मुदलियार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून दररोज सकाळी ५.३० ते ७.३० तर संध्याकाळी ५ ते ६.३० वाजेपर्यंत नियमित सराव करीत आहेत. उद्घाटन सोहोळ्याला सचिव अनिल शहारे, प्रकाश भैरव, मनीष जायस्वाल, मुन्ना यादव, फिरोज निगाला, अशोक यादव, सलीम तिगाला उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरातून प्रतिभावंत खेळाडूंना जिल्हा व राज्य पातळीवर खेळण्याची संधी प्राप्त होण्यास मदत मिळते. शिबिरात ५ ते २५ वर्षांपर्यंतचे एकूण ६० च्यावर विद्यार्थी सहभागी झाले आहे.

मुस्लिम कृती समितीचे धरणे
अकोला, २६ एप्रिल/प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर यांच्या विरोधात पत्रके वितरित केल्याप्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी विदर्भ मुस्लिम कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. बाबासाहेब धाबेकर यांच्या विरोधात पत्रके वितरित करण्यात आली. या संदर्भात पातूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. विदर्भ मुस्लिम कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन या पत्रकबाजीचा निषेध केला. या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री अजहर हुसेन, महापौर मदन भरगड, पुष्पा गुलवाडे, सुषमा निचळ, मजूषा गरड, शांता नृपनारायण, मंगला ठाकूर, जहरुद्दीन चव्हाण, सै कमरोद्दीन सै ईस्माईल, सनाउल्ला खान, महेमुद, सलीमखान, अ. मजीद अ. अजीज आदींनी सहभाग घेतला.

मतदान प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांना मानधनापोटी ९६.७३ लाखाचे वाटप
भंडारा, २६ एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीदरम्यान, निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचारी आणि पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना मानधनापोटी जवळपास ९६ लाख ७३ हजार रुपये वाटण्यात आल्याची माहिती आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १६ एप्रिलला घेण्यात आली. २ हजार ४८ मतदान केंद्रावरून झालेल्या या निवडणुकीत जवळपास १० लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नक्षलवादग्रस्त भागातही निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणुकीदरम्यान, विविध विभागांचे ९ हजारावर कर्मचारी तर ४ हजारावर पोलीस कामात होते. एका केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह मतदान अधिकारी, सहाय्यक मतमोजणी आणि एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा चार जणांची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण भंडारा लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ९ हजार १२ कर्मचाऱ्यांनी हातभार लावला तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३ हजार ९७४ पोलिसांनी कर्तव्य चोखपणे बजावले.

खामगावात वानरांचा हैदोस; एक जखमी
खामगाव, २६ एप्रिल/ वार्ताहर

वानराने चावा घेतल्याने एक जण जखमी झाल्याची घटना येथील शिवाजी वेस भागात घडली. या परिसरात वानरांचा हैदोस सुरूच असून वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शिवाजी वेस, भोईपुरा भागातील आनंदा पांडुरंग सूर्यवंशी यांच्यावर वानराने अचानक हल्ला चढवून त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. यात त्यांना दुखापत होऊन हाताला पाच टाके पडले. दरम्यान, काल सायंकाळी सुरेश सुराणा, शिवाजी सांजोरे यांच्यावरही वानराने हल्ला केला. शहरातील गोपाळनगर, शिवाजी वेस, अंबिका नगर, घाटपुरी नाका भागात वानरांचा हैदोस सुरूच असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी रात्री गच्चीवर झोपणे बंद केले आहे. बऱ्याच नागरिकांच्या घरावरील डिशचेही वानरांनी नुकसान केल्याचे समजते. गत काही दिवसांपूर्वी या भागातून वनविभागाने दोन वानरांना पकडून नेले होते. मात्र, आता पुन्हा वानरांचा हैदोस सुरू झाला असून वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बुलढाण्यात आज शोभायात्रा
बुलढाणा, २६ एप्रिल / प्रतिनिधी

वीरशैव धर्माचे प्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांची ८७९ वी जयंती २७ एप्रिलला शहरात साजरी होत आहे. यानिमित्त बुलढाणा शहरात सोमवारी शोभायात्रा काढली जाणार आहे. शोभायात्रेचा प्रारंभ दुपारी ३.३० वाजता सुनीलप्पा बोधेकर यांच्या निवासस्थानावरून पताका, टाळ, मृदंगाच्या निनादात महिला भजनीमंडळाच्या भक्तिमय वातावरणात होणार असून चैतन्यवाडी पंधाडे कॉर्नर रामनगरमार्गे द्वारका नगरातील महादेव नारायण क्यावल यांच्या निवासस्थानी सांगता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सिद्धेश्वर नवलारखे राहणार असून प्रा. शिवप्पा पझारकर औरंगाबाद हे बसवेश्वरांच्या कार्याची सखोल माहिती विशद करणार आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. बुलढाणा शहर व परिसरातील सर्व वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवा अ.भा. वीरशैव युवक संघटनेच्यावतीने सुनीलप्पा बोधेकर, रवी वाघमारे, विलास मोदे, क्यावल पंधाडे, चित्ते, जतकरप्पा, करदळे, सरजने, मिटकरी, कापसे यांनी केले आहे.

कुरुम पाणीपुरवठा योजनेच्या साहित्याची चोरी
मूर्तीजापूर, २६ एप्रिल / वार्ताहर

कुरुम येथील पाणीपुरवठा योजनेची हजारो रुपये किंमतीची मालमत्ता चोरीस गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकारामुळे कुरुम येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
नळयोजनेची २५ हजार रुपये किंमतीच्या लोखंडी जाळीसह योजनेचे पाईप, आवार भिंतीच्या लोखंडी सळ्या आदी सुमारे ८० ते ९० हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याची तक्रार तेथील सरपंच उमेश मडगे यांनी केली असून विहिरीवरील मोटारपंपही चोरीस जाण्याची भीती व्यक्त केली आहे. या आधीसुद्धा मारुती ढवळे यांच्या खासगी विहिरीवरील विद्युत मोटारींची दोन वेळा चोरी झाली.

गोरेगावात १० मे रोजी सोनार समाजाचा सामूहिक विवाह सोहोळा
गोंदिया, २६ एप्रिल / वार्ताहर

जिल्हा सोनार समाज ट्रस्टच्यावतीने १० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या हायस्कूलच्या मैदानावर सामूहिक विवाह सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंत २० जोडप्यांची नोंदणी झाली आहे. विवाह करणाऱ्या दाम्पत्याला संस्थेतर्फे वर-वधूला कपडे, वऱ्हाडय़ांना २ वेळ जेवणाची व्यवस्था, निवासाची सोय, आकर्षक मंडप, वाजंत्री, अक्षता, हारतुरे, व्हिडीओ कॅसेट, वधूला जीवनोपयोगी पाच भांडी इत्यादी देण्यात येणार आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या शुभमंगल योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या दाम्पत्याला प्रत्येकी १० हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे.