Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

विविध

पाकिस्तानमधील अण्वस्त्रे तालिबान्यांच्या हाती पडल्यास अनर्थ : हिलरी क्लिंटन
वॉशिंग्टन, २६ एप्रिल/पी.टी.आय.

पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे तालिबान्यांच्या हाती पडण्याची सर्वात वाईट आणि अनर्थकारी शक्यतेची अमेरिकेने धास्ती घेतली असून, याबाबत कठोर आणि परिणामकारक उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या भागावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव आणत असल्याचे, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी सांगितले.

आम्हाला सल्ले देण्याचे थांबवून मदत करा!
पाकिस्तानी राजदूताची
आंतराष्ट्रीय समुदायाकडे विनंती
न्यूयॉर्क, २६ एप्रिल/ वृत्तसंस्था
स्वात आणि बुनेर प्रांतामध्ये होत असलेल्या तालिबानीकरणाबाबत आम्हाला सल्ले देण्याऐवजी मदत करा, अशी विनंती पाकिस्तानचे अमेरिकी राजदूत हुसेन हक्कानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आज केली. आम्ही याबाबत अमेरिकेची मदत घेत असून आम्हालाही पाकिस्तानमध्ये तालिबानीकरण होऊ द्यायचे नाही, तेव्हा याबाबत आम्हाला सल्ले देण्याचे थांबवून मदत करावी, अशी अपेक्षा हक्कानी यांनी व्यक्त केली.

आता फेकला पंतप्रधानांवर जोडा
अहमदाबाद, २६ एप्रिल/पी.टी.आय.

मंत्री किंवा नेत्याच्या दिशेने पादत्राण भिरकावल्यावर आपल्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधता येते असा ट्रेंडच जणू आता तयार झाल्याने अहमदाबादेत आज पंतप्रधान मनमोहनसिंग हे निवडणुकीच्या जाहीर सभेत संबोधण्यासाठी येताच एका युवकाने पंतप्रधानांच्या दिशेने जोडा भिरकावला. सुदैवाने पंतप्रधानांचे व्यासपीठ बरेच दूर होते आणि विशेष संरक्षण दलाचे पोलीस जागरूक होते. पंतप्रधानांनी मात्र जोडा फेकणाऱ्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये, असे आदेश दिले.

पाकिस्तानी धार्मिक गटांची तालिबानींना सहानुभूती
माफी देण्यासाठी सरकारशी चर्चा
इस्लामाबाद, २६ एप्रिल/पी.टी.आय.
पाकिस्तानी मूलतत्त्ववादी गटांची तालिबान्यांप्रती सहानुभूती आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले असून, स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी शस्त्रे खाली ठेवण्याच्या मोबदल्यात त्यांना माफ केले जावे, या पर्यायावर पाकिस्तानी सरकार आणि प्रमुख मूलतत्त्ववादी गटांमध्ये चर्चा सुरू आहे.

बिहारमध्ये धावत्या ट्रेनमधून चार जणांना फेकले
हाजीपूर, २६ एप्रिल/पी.टी.आय.

रेल्वेत सहप्रवाशांशी झालेल्या भांडणाचे पर्यवसान गंभीर हाणामारीत झाले असून, त्यात चार जणांना धावत्या रेल्वेमधून फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार येथील चक मकरान रेल्वेथांब्याजवळ घडला. यात चारही जण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमृतसरहून बिहारमधील सहारा स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या दोन गटांमध्ये काही कारणांमुळे भांडणे झाली. त्यातून झालेल्या हाणामारीत चार व्यक्तींना धावत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आले. हे चारही जण खगारिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील तिघांची ओळख पटली असून, ते या भागात मजूरीची कामे करतात,असे हाजीपूर येथील रेल्वे पोलीस निरीक्षक बी.एन. मिश्रा यांनी सांगितले.

पाकिस्तानमधील स्फोटात १३ विद्यार्थिनी ठार
इस्लामाबाद, २६ एप्रिल/पी.टी.आय.
येथील दिर जिल्ह्यातील मुलींच्या एका शाळेबाहेर झालेल्या बॉम्ब स्फोटात १३ विद्यार्थिनी ठार तर ४० विद्यार्थ्यांनी जखमी झाल्या आहेत. हा बॉम्ब शाळेबाहेर एका खेळण्यात ठेवण्यात आला होता. दरम्यान, पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात पाकिस्तानच्या लष्कराने आज अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईत धुमश्चक्री होऊन अनेक तालिबानी अतिरेकी व एक सैनिक ठार झाला तर एका मेजरसह पाच सैनिक जखमी झाले. स्थानिक रहिवासी व प्रांतिक सरकार यांच्या विनंतीनंतर आज सकाळी दिर जिल्ह्णाातील इस्लामपुरा आणि लाल किला या भागात लष्कराने ही कारवाई सुरू केली होती. काला दमग येथे चकमकीत मौलवी शाहीद या स्थानिक म्होरक्यासह अनेक अतिरेकी ठार झाले तर एक सैनिक मृत्युमुखी पडला.