Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

काष्टीजवळ बस उलटून २० प्रवासी जखमी
श्रीगोंदे, २७ एप्रिल/वार्ताहर

दौंड-श्रीगोंदे बस काष्टीजवळ उलटून २० प्रवासी जखमी झाले. बसचालकास अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने रस्त्याच्या कडेला बस घेण्याच्या प्रयत्नात आज सकाळी ९ वाजता हा प्रकार घडला.
श्रीगोंदे आगाराची बस (क्रमांक एमएच २० डी ५८५७) आज सकाळी सुमारे ३० प्रवाशांना

 

घेऊन दौंडवरून श्रीगोंद्याकडे निघाली. बस काष्टीजवळील राजयोग मंगल कार्यालयानजीक आली असता, चालक कोंडिराम झिंजाडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे गाडीचा वेग कमी करीत असतानाच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्याही स्थितीत प्रसंगावधान दाखवित त्यांनी बस रस्त्याच्या एका बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी बस रस्त्यावरून खाली उलटली. त्यामुळे चालकासहित वाहक, प्रवासी गाडीत अडकले. त्याच वेळी मंगल कार्यालयाचे मालक व जिल्हा मजूर संघाचे संचालक अनिल पाचपुते, कार्यकर्ते संदीप पाचपुते, सोमनाथ ढमे, संतोष गुंड व बाळासाहेब लंबाटे यांनी बसची पुढील काच फोडून सर्वप्रथम चालकाची सुटका केली. लगेच संकटकालीन दरवाजातून वाहक व प्रवाशांना बाहेर काढले. श्री. लंबाटे यांनी स्वतच्या जीपमधून गावात भोंग्याच्या साह्य़ाने ही बातमी देऊन लोक जमा केले.
या अपघातात बसचालक झिंजाडे यांच्यासह जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे - किरण भांगे (वाहक), मारुती बापू बोरुडे, रामदास आनंदा पाचपुते, रामदास राऊत, प्रवीण घोडके व त्यांची दोन मुले रोहित व प्रियंका, योगेश बिराळे, सविता बिराळे, मनीषा बिराळे. या सर्वावर काष्टीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. वाहकासह रामचंद्र शिंदे यांच्यावर तेथील खासगी रुग्णालयात उपचार केले. विशेष म्हणजे या अपघातातून आठ महिन्यांचे जुळे सुखरूप बचावले. त्यांना साधे खरचटलेही नाही. इतर जखमींच्या हाता-पायांना किरकोळ जखमा आहेत. दरम्यान, चालक झिंजाडे यांना मात्र पुढील उपचारासाठी दौंडला हलविण्यात आले. वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.