Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुंगसा मुंगसा..
स्वामी विजयानंद या जाणत्या मित्रासमवेत आम्ही जंगलभटकंतीसाठी गर्भगिरीच्या डोंगररांगात गेलो होतो. विजयानंदांना डोंगररांगांची, तेथील कडेकपारीची, नैसर्गिक विविधतेची, पायवाटांची व जंगलातील प्राणी-वनस्पतींची खडा न खडा माहिती होती. गर्भगिरीत केवळ पावसाळ्यात

 

दिसणाऱ्या औषधी वनस्पती पाहण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो होतो. पायवाटेने चालत आम्ही एका उंच सुळक्यापाशी येऊन थांबलो. पाऊस पडून गेलेला असल्यामुळे सुळक्यावरून पाण्याचा प्रपात पडत होता. ते दृष्य मोठे नयनमनोहारी होते.
आम्ही उंच कडा चढून, जेथून धबधबा खाली कोसळत होता तेथे पोहचलो. डोंगरमाथ्यावरून दरी खूपच खोल वाटत होती व त्यातून कोसळणाऱ्या धबधब्याचे रौद्ररूप पाहून भीती वाटत होती. चुकून पाय घसरला तर काय होईल या कल्पनेने जिवाचा थरकाप होत होता. विजयानंद मात्र बिनदिक्कतपणे थेट धबधब्याच्या मुखाशी गेले व आम्हाला माहिती सांगू लागले. खोल दरीतून वर येणारा वारा आपल्याबरोबर पाण्याचे आल्हाददायक तुषार घेऊन अंगावर येत असल्यामुळे आमच्या चित्तवृत्ती उल्हासीत झाल्या. स्वामींनी उंच डोंगरकपारीवर उगवलेला एक पिंपळवृक्ष आम्हाला दाखविला. साधारणत ३००-३५० फूट उंचीच्या डोंगरकपारीच्या मध्यावरच तो वृक्ष उगवला होता. डोंगरकडा उंच, सरळ व काळ्या कातळाचा असूनही, पिंपळवृक्ष कसा वाढला असेल याचा आम्ही विचार क रू लागलो. माणूस तर सोडा जंगलातील चीटपाखरूही ज्या उंच ठिकाणी पोहचू शकणार नाही तेथे िपपळवृक्ष आपली मुळे खडकात घट्ट रोवून उभा आहे ही निसर्गाची किमयाच म्हटली पाहिजे. स्वामींनी त्या भटकंतीत आम्हाला पिंपळाच्या तीन उपजाती दाखविल्या. त्यातील महत्त्वाचे फरक आमच्या लक्षात आणून दिले. त्यापैकी एका पिंपळवृक्षाला तर चक्क वडासारख्या पारंब्याची मुळे होती.
आम्ही रमतगमत पायवाटेने पुढे पुढे जात असताना दोन्ही बाजूला उंच उंच वाढलेले गवत, वेली व झुडपे यांचा मुलायम स्पर्श मन प्रसन्न करीत होता. जंगलातील झाडांची सावली व हवेतील सुखद गारवा यामुळे भटकंती फारच आनंददायी वाटत होती. विजयानंद विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी यांची खुबीने माहिती सांगत होते. तेवढय़ात एका मित्राने समोरच्या दृष्याकडे सर्वाचे लक्ष वेधले. मुंगूस व त्याची दोन पिल्ले पायवाटेवरून आमच्याकडे मान उंचावून टकमक पाहत होती. आम्ही निश्चल होऊन मुंगूस व त्याची पिल्ले पाहत राहिलो. आमच्यापैकी काहीजण मुंगूस पाहिले म्हणजे काहीतरी शुभ घटना घडणार यामुळे आनंदी झाले होते. आमची हालचाल पाहून मुंगूस आपल्या लहानग्या पिल्लासमवेत गवतात दिसेनासे झाले. मी मात्र मुंगूस या प्राण्याच्या आठवणीत रममाण झालो.
शालेय विद्यार्थी असताना एकदा आमच्या शाळेसमोर गारूडय़ाचा खेळ आला होता. गारूडय़ाने आपल्या खांद्यावरील कावड पटांगणात खाली टेकविली आणि लयबद्ध आवाजात डमरू वाजवू लागला. नागोबा आणि मुंगूस यांच्या लढतीचे रसभरीत वर्णन तो क रू लागताच विद्यार्थी व ओटय़ावर बसलेल्या लोकांचा घोळका जमा झाला. गारूडी आपल्या गाठोडय़ातून एक एक टोपली अलगद काढून जमिनीवर ठेवू लागला. टोपलीचे झाकण काढताच त्यात ठेवलेले विविध प्रकारचे छोटे-मोठे साप आमच्या नजरेस पडू लागले. गारूडय़ाने टोपलीचे झाकण उघडले की आतला प्राणी आपल्या शरीराची हालचाल करत असे. त्याचबरोबर जमलेले लोक घाबरून मागे सरकत. गारूडी त्यातील एकेक साप हातात घेऊन खेळवत असे. त्याची माहिती सांगत असे. त्यात पुष्कळ अद्भूत बाबींचा भरणा असे. त्याने साप जमिनीवर सोडला की, सळसळणारे उमदे जनावर पाहून पाहणाऱ्याची पाचावर धारण बसत असे. टोपलीतील बहुतेक साप दाखवून व हाताळून झाले होते. खेळ अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला होता. आता गारूडी पुंगी वाजवत होता व त्याचा लहानगा मुलगा डमरू वाजवून पोटासाठी पैशाची मागणी करीत होता. गारूडय़ाने अत्यंत काळजीपूर्वक अखेरची टोपली गाठोडय़ातून सोडली. सर्वाच्या नजरा त्याकडे रोखल्या. झाकण उघडल्याबरोबर पिवळाधमक नाग फणा उभारून डोलू लागला. गारूडी सुरेल बासरी वाजवून आपल्या शरीराची हालचाल करत होता. त्याबरोबर नागोबाही फणा डोलवून प्रतिसाद देत होता. शेपटीकडून काळजीपूर्वक पकडून गारूडी नागराजास खेळवत होता.
खेळ अंतिम टप्प्यात आला होता. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या िपजऱ्याकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले. पिंजऱ्यात ठेवलेले मुंगूस त्वेषाने नागाकडे पाहत अस्वस्थ हालचाली करत होते. नागाची नजर मुंगसावर पडली. तत्क्षणी शरीराचे वेटोळे क रून व फणा उंच उभारून नाग मुंगसाकडे पाहू लागला. त्यांचे हाडवैर त्यांच्या नजरेतून स्पष्टपणे प्रतीत होत होते. काही वेळातच गारूडय़ाने पिंजऱ्यातील मुंगसाला मुक्त केले व खेळाच्या अंतिम टप्प्यास सुरुवात केली.
नागोबाने आपल्या छातीच्या बरगडय़ा ताणून हाताच्या पंजाएवढा फणा काढला व फुत्कार टाकत मुंगसाला आव्हान दिले. मुंगूसही महावस्ताद. ते नागाभोवती अत्यंत चपळाईने फेरी मारू लागले. मुंगूस जवळ येताच नाग फुत्कारत त्याच्यावर झेप घ्यायचा. त्याक्षणी मुंगूस अत्यंत चपळाईने मागे सरायचं. मुंगूस सारखा उडय़ा मारायचा व विविध डावपेच क रून नागाला नामोहरम करायचा. माघार घ्यायला कुणी तयार नव्हते. नागोबाला हुलकावणी देत मुंगूस त्याच्याभोवती गोलगोल फेऱ्या मारी, तर नाग त्याच्यावर आपले डोळे रोखून त्याचा वेध घेई. मुंगसाच्या अंगावरचे केस ताठ उभे राहत व शेपटीची सारखी हालचाल होत होती. मुंगूस नागाच्या फडीची ढाल दातात पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते व त्याचबरोबर नागाचा दंश टाळण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेत होते. दोघांनाही मरणाची भीती वाटत होती. तरी लढतीत ते एकमेकांच्या जीवावर टपले होते. मुंगूस नागाची खांडोळी करण्यासाठी अधीर झाले होते, तर साप मुंगसाला चावा घेऊन त्याच्या शरीराला विळखा घालून, गळा दाबून त्याला ठार मारण्यास उतावीळ झाला होता. लढाई बऱ्याच वेळ सुरू राहिली. नाग क्षीण होत चालला होता, तर मुंगसाचे डोळे त्वेषाने इंगळासारखे लाल झाले होते. मुंगूस कुठल्याही क्षणी नागाच्या फडीचा चावा घेऊन त्यास यमसदनास पाठवील अशी परिस्थिती होती. असाहाय्य नाग आक्रमण थोपविण्यापेक्षा जास्त काही हालचाल करत नाही हे पाहून गारूडय़ाने मध्यस्थी केली व नागाला सुरक्षित टोपलीत, तर मुंगसाला पिंजऱ्यात बंद केले.
या घटनेचा माझ्या मनावर खोल असा ठसा उमटला तो कायमचाच. हाडवैर असलेले हे प्राणी उतावीळ झाले होते ते एकमेकांचा जीव घेण्यासाठी. अशा लढतीत मुंगूस नागाची खांडोळी खांडोळी करतो व नागापासून आपल्या पिलांचे रक्षण करतो, तर नाग संधी मिळताच चावा घेऊन मुंगसाला यमसदनी धाडतो व त्याच्या पिलांचाही फडशा पाडतो.
मुंगूस हा सर्वाना परिचित असलेला हिंस्त्र सस्तन प्राणी भारतात सर्वत्र आढळतो. मुंगूस बिळात राहतो व आपल्यापेक्षा मोठय़ा प्राण्यावर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाही. त्याचे तोंड निमुळते, कान लहान, पाय आखूड व शेपूट लांब असते. मुंगूस छोटे सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी, साप, विंचू, बेडूक, पक्ष्यांची अंडी खातो. मुंगूस रक्तपिपासू असून, ते पोल्ट्री फार्मवर एकावेळी अनेक क ोंबडय़ा मारते व त्यांचे रक्त शोषते. मुंगसाचे दात मांसाचे तुकडे करण्यास व मांस खाण्यास जास्त सोयीस्कर असतात. मुंगूस चपळ, सावधान व धीट असते. त्याचे कान लहान असल्याने व ते बंद करण्याची सोय असल्यामुळे बीळ उकरताना त्यात माती अथवा कचरा जात नाही. मुंगूस अंडी फ ोडून किंवा त्यास छिद्र पाडून त्यातील बलक शोषून घेते. मुंगूस अत्यंत चपळाईने सापाचे किंवा नागाचे डोके तोंडात धरून चटकन त्याची कवटी फ ोडून त्याला ठार मारते. असे करताना सापाचा विषारी दात त्यास लागणार नाही याची दक्षता घेते. मुंगसास सापाचे विष लागत नाही अशी एक निराधार समजूत आहे. मुंगसास सापाचे विष भिनले तर ते मुंगूस वेल खाते व त्यामुळे विष उतरते अशीही चुकीची समजूत आहे. साप चावल्यास मुंगसास विषबाधा होते. तथापि मांजर, डुक्कर, मुंगूस हे प्राणी सापाच्या विषास कमी संवेदनशील आहेत. मुंगूस सापाच्या विषास कमी संवेदनशील असल्या कारणाने त्याच्यावर सापाच्या विषाचा परिणाम लगेच होत नाही. त्यास थोडा वेळ लागतो.
मुंगूस साप, उंदीर व कीटक खात असल्यामुळे तो उपयुक्त प्राणी आहे. मुंगसास सापाची चाहूल पटकन लागते. ते मनुष्यवस्तीजवळील विषारी व बिनविषारी साप खाऊन किंवा मारून टाकत असल्यामुळे व सापांचा मनुष्यवस्तीतील धोका कमी करत असल्या कारणाने त्याचे तोंड पाहणे शुभ मानले जात असावे.
मुंगूस आणि साप यांचे हाडवैर त्यांच्या लढतीतून व एकमेकांना संपवायचेच या इर्षेतून स्पष्टपणे जाणवते.