Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतदारांच्या उदासीनतेला नगरसेवक जबाबदार
लोकसभेची निवडणूक झाली. ठप्प झालेली महापालिका आता सुरू व्हायला हवी. वास्तविक मनपाचा निवडणूक कामकाजात काही विशेष सहभाग नव्हता. महसूल यंत्रणेचा होता तेवढा तर

 

नक्कीच नाही. आचारसंहिता अंमलबजावणी पथकाची जबाबदारी उपायुक्त अच्युत हांगे यांच्यावर होती. बरेच गुन्हे दाखल करून त्यांनी ती समर्थपणे पार पाडली. बाकी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी फार मोठय़ा संख्येने निवडणूक यंत्रणेत गुंतले नव्हते. तरी पण काम मात्र ठप्प होते. ज्याच्या त्याच्या तोंडी कारण होते ते फक्त निवडणूक आचारसंहितेचे.
नगरसेवकांवर मात्र त्यांच्या त्यांच्या पक्षाची प्रचाराची जबाबदारी होती. ती त्यांनी कशी पार पाडली ते मतदानाच्या आकडेवारीतून दिसते आहे. जिल्ह्य़ाच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निचांकी मतदान नगर शहराचे. फक्त ४०.२ टक्के. महिलांचे मतदान त्यापेक्षाही कमी, फक्त ३५.११ टक्के. तेही इतर सर्व मतदारसंघापेक्षा कमीच. या गोष्टीत मात्र नगर शहराचा जिल्ह्य़ात पहिला क्रमांक आहे, पण तो शेवटाकडून!
नगरसेवकांचा म्हणे त्यांच्या भागात प्रभाव असतो. वस्तुस्थिती अशी आहे की बहुसंख्य नगरसेवक त्यांच्या परिसरातील सामान्य नागरिकांपासून दुरावले आहेत. कोणत्याच पक्षाच्या नगरसेवकाच्या भागात भरभरून मतदान झाले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले हे महापौर संग्राम जगताप यांचे सासरे. मनपात सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचेच. त्याशिवाय स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छूक असलेले काही माजी नगरसेवकही घाम गाळत होते. मात्र, ते मतदानाची टक्केवारी वाढवू शकले नाहीत. त्यांचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनाही कसला परिणाम साधता आला नाही.
विरोधी सेना-भाजपमधील नगरसेवकही प्रचारात दिसत होते, मात्र ते नावापुरते. सेनेचे नगरसेवक आमदार राठोड यांच्या पुढे-मागे असत. त्यामुळे जेव्हा राठोड भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्यासमवेत असत तेव्हाच काय ते सेनेच्या नगरसेवकांचे दर्शन होत असे. भाजप नगरसेवकांमध्ये महिलांची संख्या अधिक. त्या कधी प्रचारात दिसल्या नाहीत. बाकीचे नगरसेवक येत-जात आणि चर्चा करत. ‘आमची मते तर फिक्स आहेत, ती कुठे जाणार नाहीत.’
आपण ज्या शहराचे प्रतिनिधीत्व करतो, त्या शहरात लोकसभेसारख्या मह्त्त्वाच्या, देशाशी निगडित निवडणुकीत इतके कमी मतदान व्हावे याबद्दल एकाही नगरसेवकाला काहीही वाटत नाही. काय वाटायला हवे ते सूज्ञ नागरिकांना माहिती आहे. पण फक्त मतदानाची टक्केवारीच का, या नगरसेवकांना कशाचेच काही वाटत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर शहर बससेवा बंद पडली, पण सर्वजण डोळ्यावर कातडे ओढून बसले होते. ठेकेदार मनपाच्या बहुतेक कामांना अगदी पद्धतशीरपणे चुना लावतात, पण नगरसेवक कधी त्याविरोधात आवाज उठवत नाहीत. मनपात सर्वसाधारण सभा होत नाही, त्यांची हक्काची स्थायी समिती अस्तित्वात येत नाही. स्थायी समितीच काय, पण इतर कोणतेही घटनात्मक पद किंवा कामकाज मनपात होत नाही, पण सत्ताधारी नगरसेवकांसह सर्वचजण मूग गिळून गप्प बसतात. कारण कशाचे काही वाटून घेणेच त्यांनी सोडलेले आहे.
जिल्ह्य़ाचे ठिकाण असणाऱ्या नगर शहरात इतके कमी मतदान व्हावे ही खरोखरच शरमेची बाब आहे. आपापल्या उमेदवारासाठी प्रचारफेऱ्या काढणाऱ्या नगरसेवकांच्या शब्दाला जनमानसात किंमत राहिली नाही, असा त्याचा सरळ अर्थ.
शालेय सुट्टय़ांमुळे सिद्धिबाग दुरुस्त करण्याचे साधे आश्वासन, ते सुद्धा सत्ताधारी पूर्ण करू शकत नाहीत. ऐन सुटीत ही बाग बंद आहे. दिल्ली दरवाजासमोरचा थेट पत्रकार चौकापर्यंतचा रस्ता रुंद, मजबूत होणे ही आज या शहराची सर्वात मोठी गरज आहे. पावसाळ्यात या रस्त्यात, विशेषत नीलक्रांती चौकात इतके पाणी साचते की त्यातून वाट काढणे मुश्किल होते. साडेसहा कोटींच्या या कामाला काही गाळेधारकांचा असलेला विरोध चर्चा करून सहज दूर करता येतो, येईल. पण ही कोंडी फोडायला एकजण तयार नाही. त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी मात्र सर्वजण पुढे. गाळेधारकांचा विचार होतो, तसाच त्या भागात राहणाऱ्या, त्या रस्त्याचा रोज जाण्या-येण्यासाठी वापर करावा लागणाऱ्या हजारो सर्वसामान्य नागरिकांचा विचार का कोणी करत नाही? ते संघटित नाहीत म्हणून?
एक ना दोन अशी शेकडो उदाहरणे आहेत. बेजबाबदारपणे वागून नगरसेवक रोज या शहराचा, इथल्या नागरिकांचा विश्वासघात करत आहेत. प्रशासनसुद्धा हातावर हात ठेवून गप्प बसते. वास्तविक प्रशासनाने ठाम राहून, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केवळ शहराचे, नागरिकांचे हितच बघितले पाहिजे. पण त्यांची भूमिका नेहमीच बोटचेपेपणाची असते. सगळ्या जबाबदाऱ्या सरकारवर ढकलून प्रत्येक वेळी इथे फक्त शांत बसून कसे चालेल? म्हणूनच आता काही झाले तरी ‘स्थायी’च्या सदस्यपदासाठी निवडणूक होईलच, दिल्ली दरवाजा ते पत्रकार चौक रस्ता पूर्ण करणारच, मनपातील सर्व घटनात्मक पदांच्या नेमणुका कराव्याच लागतील, सिद्धिबागेचे काम झाले नाही, तर ठेकेदाराला दंड करू, अशी कठोर भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे.. तरच काही खरे आहे!
राजू इनामदार
सहज दिसलं म्हणून..
गांधी मैदानातील शरद पवार यांच्या निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील दिग्गज नेते जमले होते. त्या गर्दीत महापौर संग्राम जगताप व्यासपीठावर अवघडलेपणाने एका कोपऱ्यात कसेबसे उभे होते. हा त्यांचा नाही, तर महापौरपदाचा अवमान होत आहे, ही बाब व्यासपीठाच्या खाली असणाऱ्या नगरसेवकांनी तरी किमान संयोजकांच्या लक्षात आणून द्यायला हवी होती. भाषणातसुद्धा फक्त शरद पवार यांनीच महापौरांचे नाव घेतले, अन्य कोणीही नाही.