Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तालुकामास्तर पदाबाबतच्या आदेशास वाटाण्याच्या अक्षता
नगर, २७ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील तालुकामास्तर पदाची जबाबदारी

 

केंद्रप्रमुखाकडे देण्याच्या ग्रामविकास खात्याच्या आदेशास येथील विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या पदाची जबाबदारी केंद्रीय मुख्याध्यापकाकडे ठेवण्याची महाराष्ट्रामध्ये कोठेही अस्तित्वात नसलेली परंपरा पुढे चालू ठेवताना जिल्हा परिषदेने ग्रामविकास खात्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी त्याचा काथ्याकूट चालवला आहे.
तालुकामास्तर हे पद सरकारने निर्माण केलेले स्वतंत्र पद नाही. सन १९९६मध्ये प्रशासकीय सोय म्हणून पश्चिम महाराष्ट्रात तालुकास्तरावर व तालुकांतर्गत विभागीय पातळीवर मुख्याध्यापकांकडे तालुकामास्तर पद ठेवले जाऊ लागले. शिक्षकांची वेतन बिले, रजा बिले, शालेय पोषण आहाराची बिले वितरित करणे, शिक्षकांची आर.डी.ची कामे हाताळणे, वरिष्ठ कार्यालयास सांख्यिकी माहिती पाठवणे अशा स्वरूपाची कामे तालुकामास्तर म्हणून मुख्याध्यापकास करावी लागतात. विभागीय पातळीवरचे धरून नगर जिल्ह्य़ाच्या प्रत्येक तालुक्यात विस्तार व शाळांची संख्या लक्षात घेऊन कमीत कमी तीन-चार, तर जास्तीत जास्त सहा-सात तालुकामास्तर पदे कार्यरत आहेत.
हे शासनमान्य स्वतंत्र पद नसल्याने त्यास स्वतंत्र वेतनश्रेणी, सेवा नियम किंवा निवड पद्धत नाही. तालुका व विभागातील ज्येष्ठ मुख्याध्यापकांतील इच्छुकाकडे तालुकामास्तरचे काम सोपवले जाते.
तालुकामास्तर पद केवळ पुणे व कोकण विभागात होते. महाराष्ट्रातील उर्वरित नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर या विभागात ही पदे अस्तित्वात नव्हतीच. नगरचा समावेश नाशिक विभागात होतो. नाशिक विभागात कोठेही पद अस्तित्वात नसताना पुणे विभागाच्या पायंडय़ानुसार नगर जि. प.ने हे पद मुख्याध्यापकांमार्फत कार्यरत ठेवले. इतर चारही विभागांत तालुकामास्तर पदाचे काम केंद्रप्रमुख पदावरील शिक्षकाकडून करून घेतले जात होते.
या चार विभागांप्रमाणेच कोकण व पुणे विभागातही तालुकामास्तर पदाच्या कामकाजाची मुख्याध्यापकांऐवजी केंद्रप्रमुखांकडे जबाबदारी देण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने गेल्या वर्षी १६ जुलै २००८ रोजी दिला. कोकण व पुणे विभागाप्रमाणे नगर जि. प.नेही याबाबतचा बदल करणे आवश्यक होते. नगर जि. प.ने या आदेशास वाटाण्याच्या अक्षता लावत या पदाची जबाबदारी मुख्याध्यापकांकडेच ठेवली आहे. तालुकामास्तरच्या कामाचे विकेंद्रीकरण करणे, राज्यात सर्वत्र एकच पद्धत राबवून सुसूत्रता निर्माण करणे असा उद्देश असल्याचे आदेशात नमूद केले होते. या उद्देशास नगरने हरताळ फासला आहे.
मुख्याध्यापकाकडे आधीच कामाचा अतिरिक्त भार असल्याने तालुकामास्तरची जबाबदारी स्वीकारण्यास अनेकजण नाखूष असले, तरी मिळणाऱ्या आमिषापोटी हे पद अनेकांना हवेसे वाटते. मात्र, अनेक प्राथमिक शिक्षक त्यांना मिळणाऱ्या दरमहा वेतनाच्या विलंबास तालुकामास्तरला (मुख्याध्यापकांना) जबाबदार धरतात. शिवाय विविध प्रकारची बिले मिळण्यात तालुकामास्तरकडून अडवणूक होत असल्याची शिक्षकांची तक्रारही आहे.
तालुकामास्तरची जबाबदारी मुख्याध्यापकांऐवजी केंद्रप्रमुखाकडे सोपवण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण विभागास पूर्वीच
मिळाला आहे. यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता, त्यांनी पूर्वीचीच प्रथा कायम असल्याचे सांगितले. याबाबत इतर जिल्ह्य़ांत काय केले जात आहे, याची माहिती पत्रव्यवहार करून मागविली जात आहे. सरकारने केंद्रप्रमुख पद शाळांवरील सनियंत्रणासाठी पर्यवेक्षकांच्या स्वरूपात निर्माण केले असताना त्याऐवजी तालुकामास्तर पद मुख्याध्यापकांकडे ठेवण्याच्या अट्टहासातून अध्यादेशाबाबत सरकारकडूनच अधिक मार्गदर्शन मागविण्याची भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजले.