Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कुकडीच्या आवर्तनासाठी रस्त्यावर उतरू - जगताप
श्रीगोंदे, २७ एप्रिल/वार्ताहर
कुकडीचे दुसरे आवर्तन न सोडल्यास श्रीगोंदे, पारनेर व कर्जत तालुक्यांतील उन्हाळी पिके वाया

 

जातील. ती वाचविण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील तांत्रिकदृष्टय़ा मृत असणारे सुमारे ४ टीएमसी पाणी तातडीने सोडावे; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
श्री. जगताप म्हणाले की, कुकडीतून उन्हाळ्यासाठी दोन आवर्तने देण्याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसासह इतर पिकांचे नियोजन करताना महागडे भुईमूग बियाणे, तसेच दुप्पट दराने खते खरेदी केली. आता आवर्तन सोडण्यासाठी धरणात पाणी नसल्याचे सांगितले जाते. उन्हाळ्यातील पहिले आवर्तन निवडणूक धामधुमीत सोडताना पाण्याचा मोठा अपव्यय झाला. नियमानुसार ते आवर्तन झाले नाही का? अभ्यास न करता कालवा समितीने दोन पाण्याचा निर्णय घेतला. याला जबाबदार कोणीही असो, पण आता दुसरे पाणी न मिळाल्यास श्रीगोंदे, पारनेर, कर्जतमधील कुकडीखालील शेतकरी उद्ध्वस्त होतील.
केवळ कुकडी कारखाना कार्यक्षेत्रात १० लाख टन उसाची नोंद आहे. उसासह भुईमूग, जनावरांची चारा पिके धोक्यात येतील. एकीकडे कुकडी पाण्याची ही अवस्था असताना दुसरीकडे वीजप्रश्नही गंभीर झाला आहे. १२ तासांपेक्षा जादा भारनियमन केले जाते. परिणामी दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे, असेही जगताप म्हणाले.
पुढील वर्षी कुकडी कारखाना उसाला पहिला हप्ता दीड हजार रुपयांपर्यंत देणार असल्याने उसपीक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी कुकडी आवर्तन आठ दिवसांत मिळणे आवश्यक आहे. धरणांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याची आकडेवारी मिळते, पण ही खरी कशी धरायची, असा सवाल करीत ते म्हणाले की, पिंपळगाव जोगे धरणात उपयुक्त पाणीसाठा नाही, अशी आकडेवारी सांगते. पण धरणातील मृत साठा ४ टीएमसी आहे. हे सगळे पाणी धरणातून येडगावमध्ये सोडता येते. तसे करून आवर्तन पूर्ण होऊ शकते. या मृत साठय़ाचा वापर आता संजीवनी ठरवून केला, तर शेतकरी वाचेल. त्यातही राजकारण आणून हे पाणी इतरत्र वापरले, तर मात्र अवघड होईल. आठ दिवसांत आवर्तन सोडा; अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून पाटबंधारे, तहसील व महावितरणची कार्यालये बंद करू, असे ते म्हणाले. यावेळी कुकडी कारखान्याचे संचालक सुभाष डांगे उपस्थित होते.
लवकर राजकीय भूकंप
तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर भाषा करताना जगताप म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांचा विजय निश्चित असून, तालुक्यातून आघाडी मिळेल. तालुक्यातील भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेता विधानसभेपूर्वी काही बडे नेते भाजपच्या गळाला लागून तालुक्यात राजकीय भूकंप होईल. आजही दोन्ही काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते त्या दृष्टीने संपर्कात आहेत.