Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजूर नळ पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर
एक्स्प्रेस फिडर लाईन
राजूर, २७ एप्रिल/वार्ताहर

राजूर नळ पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर झाल्या असून, भविष्यात वीज नाही म्हणून पाणी

 

नाही ही सबब राहणार नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त राजूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वीज देता आली, असे प्रतिपादन वैभव पिचड यांनी केले.
राजूर नळ पाणीपुरवठा योजना विजेअभावी सतत बंद पडत असे, तर निळवंडय़ाच्या पाणीसाठय़ामुळे येथील व परिसरातील ७ गावांची वीज उपकेंद्रे पाण्यात बुडाली. त्यामुळे आमदार मधुकरराव पिचड यांच्या विशेष प्रयत्नातून या योजनेसाठी कार्यकारी अभियंता प्रदक्षिणे यांनी पाठपुरावा करून ६० लाखांची तरतूद केली. वीज वितरण कंपनीत ६० लाख रुपये भरल्याने या भागातील विद्युत पुरवठा कार्यान्वित झाला. त्यात राजूर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी एक्स्प्रेस फिडर लाईन टाकण्यात आली. त्यासाठी ११ लाख ७५ हजार रुपये पाटबंधारे खात्याने वीज कंपनीकडे वर्ग केले. त्यामुळे आज अक्षयतृतीया व वैभव पिचड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वीजजोडणी करण्यात आली.
या प्रसंगी राजूर विभागातील सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत, स्वामी गगनगिरीमहाराज भक्त प्रतिष्ठान, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैभव पिचड यांचा सत्कार करण्यात आला.
प्रथम शेतकरी शशिकांत देशमुख यांच्या शेतात १० अश्वशक्तीच्या पंपातून पाणी देण्याचा प्रारंभही श्री. पिचड यांच्या हस्ते झाला. या वेळी सीताराम देशमुख, विलास पाटील देशमुख, गणपत देशमुख, संतोष बरसोडे, भास्कर येलमामे उपस्थित होते. नळयोजनेच्या पंपांना यापुढे २४ तास वीजपुरवठा होणार असून, दोन ४० अश्वशक्तीचे नवीन पंप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे राजूर गावाला सतत पाणीपुरवठा होणार आहे. जनतेने आता पाणीपट्टी नियमित भरल्यास वीज मंडळाचे बिल वेळेवर भरता येईल, असे पिचड यांनी सांगितले. आमदार मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातूनच हा प्रकल्प उभा राहिला असल्याचे ते म्हणाले. या वेळी स्वामी गगनगिरीमहाराज भक्त प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हेमलताताई पिचड म्हणाल्या की, राजूर गावाला आज आगळी-वेगळी भेट मिळाली. त्यामुळे गावकऱ्यांना आता सतत वीज व पाणी मिळेल. या वेळी सचिन मेहता, भास्कर येलमामे, संतोष बंदसोडे, पत्रकार शांताराम काळे, प्रकाश महाले, भीमाशंकर कवडे, काळू मोहंडुळे, विजय लहामगे यांनीची भाषणे झाली.