Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तुकाराम गडाख यांच्या भावाचे क्रेडिट कार्ड चोरणाऱ्यास अटक; बिग बाजारमध्ये वेटरला पकडले
नगर, २७ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीतील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार व विद्यमान खासदार तुकाराम

 

गडाख यांच्या भावाचे क्रेडिट कार्ड चोरून त्यावर बिग बाजारमध्ये सुमारे १० हजार रुपयांची खरेदी करणाऱ्या परप्रांतीय वेटरला तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
सिकंदर हृदयनाथ चोबे (मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या नटराज हॉटेलमध्ये वेटर, नगर) यास तोफखाना पोलिसांनी गेल्या शुक्रवारी (दि. २४) रात्री अटक केली. त्यानंतर त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आज पुन्हा न्यायालयाने त्याच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.
निवडणूक प्रचारकाळात उमेदवार गडाख यांनी आपले नगरमधील प्रचार कार्यालय हॉटेल नटराजमध्ये ठेवले होते. हॉटेलच्या सूटमध्ये
त्यांचे बंधू कृष्णराव गडाख (रा. पुणे) उतरले होते. मतदानाच्या रात्री (दि. २३) आठच्या सुमारास चोबे यास बिग बाजारच्या कर्मचाऱ्यांनी दोन क्रेडिट कार्डच्या साहाय्याने सुमारे १० हजार रुपयांची खरेदी करताना संशयावरून पकडले. चोबे याने कपडे, दागिने अशा स्वरुपाची खरेदी केली होती. नंतर त्याने क्रेडिट कार्ड दिले. कर्मचाऱ्यांनी त्यास नाव विचारले. स्लीपवर आलेले नाव चोबेने सांगितलेले नाव, सही यात विसंगती आढळल्याने कर्मचाऱ्यांनी खरेदी रद्द करून त्याला पोलिसांच्या हवाली केले.
तपास सहायक उपनिरीक्षक निमोणकर करीत आहेत. चोबे याने दोन्ही क्रेडिट कार्ड हॉटेलमध्ये सापडल्याचे पोलिसांना सांगितले. कृष्णराव गडाख पुण्यात असल्याने त्यांचे येथील मित्र मिलिंद आनंद मोभारकर (रा. गायकवाड मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी चोबेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. मोभारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णराव गडाख यांच्या सूटसाठी चोबे रुमबॉय म्हणून नियुक्त होता. त्याने एका क्रेडिट कार्डवर ८ हजार ३४० रुपयांची, तर दुसऱ्या कार्डवर ८७० रुपयांची खरेदी केली होती.