Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कपाशीची भरपाई न मिळाल्याने नाराजी
शेवगाव, २७ एप्रिल/वार्ताहर

लाल्या रोगग्रस्त कपाशीच्या पिकाचे तालुक्यात पंचनामे होऊन अद्यापि शेतकऱ्यांना नुकसान

 

भरपाई न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी होत आहे.
यंदा कपाशीची उशिरा झालेली लागवड, कमी पाऊस व प्रतिकूल हवामान त्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव झाला. तालुक्याच्या पूर्व भागात हे प्रमाण जास्त असून, इतरत्रही शेतकऱ्यांचे या रोगाने नुकसान होऊन कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट आली. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार महसूल व कृषी खात्याने पंचनामे करून सरकारकडे प्रस्ताव पाठवले आहेत.
सरकारने या संदर्भात ठरवलेल्या धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या दोन हेक्टर क्षेत्राचे पंचनामे तलाठय़ांनी केले. याबरोबर शेतकऱ्यांकडून शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत रक्कमही स्वीकारली. अनेक गावच्या शेतकऱ्यांना या रकमेच्या पावत्याही देण्यात आलेल्या नाहीत, मग ही लाखो रुपयांची रक्कम कोठे? असाही प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
या प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनशक्ती मंच या पक्ष व संघटनेने तहसील कार्यालयावर मोर्चा व अन्य आंदोलनेही केली. परंतु सरकारकडून कोणतीही हालचाल झाली नाही. आता जून महिना जवळ आला असून शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाल्यास खरीप हंगामातील बी-बियाणे खरेदी करण्यासाठी या रकमेचा उपयोग होईल, अशाही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.