Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रस्तालुटीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची मागणी
जामखेड, २७ एप्रिल/वार्ताहर

रस्तालूट प्रकरणी एकास काल पोलिसांनी अटक केल्यानंतर तालुक्यातील खर्डा, करमाळा,

 

बीड, कर्जत या चार मार्गांवर रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी पुढे आली आहे.
तालुक्यातील करमाळा रस्त्यावर पाडळी फाटा, खर्डा रस्त्यावर शिऊर फाटा, कर्जत रस्त्यावर रत्नापूर फाटा, बीड रस्त्यावर सौताडा घाट व खर्डा दिघोळ दरम्यानच्या रस्त्यावरील घाटात रस्तालुटीचे प्रकार वारंवार घडतात. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या मोटरसायकलस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सायंकाळी सात वाजल्यानंतर रस्तालुटीचे प्रकार घडतात. वरील सर्व ठिकाणी लोकवस्ती नसल्याने लुटारू या ठिकाणी थांबून मोटरसायकलस्वारांना तारेने अडवून मारहाण करून लुटायचे असे तंत्र अवलंबतात. त्यामुळे वरील सर्व ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त रात्री उशिरापर्यंत ठेवण्यात येत होता. त्याचबरोबर पोलिसांची गस्तही या ठिकाणापर्यंत होत होती. गेले काही दिवसांपासून पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला. या ठिकाणी पुन्हा पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी आहे. रस्तालुट प्रकरणी तालुक्यातील रत्नापूर येथील आबासाहेब लक्ष्मण वारे यांच्या फिर्यादीवरून आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथील दादा श्रीरंग गव्हाणे यास काल पोलिसांनी अटक केली. गव्हाणेचे अन्य तीन साथीदार शत्रूघ्न नवनाथ शिंदे, किरण विलास भैलुमे, अतुल दयानंद भैलुमे (सर्व आढळगाव, तालुका श्रीगोंदे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.