Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘लोकांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान वाढवावे’
श्रीगोंदे, २७ एप्रिल/वार्ताहर

समाजात चंगळवाद मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने लोकांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील

 

योगदान वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी केले.
तालुक्यातील वांगदरी येथे श्री. नागवडे यांच्या हस्ते तेथील अंबिकादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आज झाले. सुमारे ६० लाख रुपये खर्चून लोकवर्गणीतून हे काम ग्रामस्थांनी हाती घेतले आहे. त्या वेळी श्री. नागवडे म्हणाले की, समाज कोत्या गोष्टींकडे आकर्षित होत चालला आहे. ग्रामीण भागात कीर्तन-प्रवचनासारखे अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन होत असले, तरीही धार्मिक कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात हाती घेणे गरजेचे आहे. गावोगावी लाखो रुपये खर्च करीत मंदिराची कामे होतात, ही समाधानाची बाब आहे.
पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव नागवडे यांनी मंदिराबाबतची माहिती देताना सांगितले की, दगडी काम असलेला मंदिराचा गाभारा १९ गुणिले १९, कळस ५१ फूट, आरती मंडप १५ गुणिले ३५, तर सभामंडप ५० गुणिले ८० फूट आहे. ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, सगळे काम लोकवर्गणीतून करण्यात येईल. या वेळी ‘श्रीगोंदे’चे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सरपंच महेश नागवडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र नागवडे, तसेच दत्तात्रेय मासाळ, साहेबराव महारनोर, सुभाष गोरे, आबासाहेब जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन बापूराव कांबळे यांनी केले. आभार बी. के. लगड यांनी मानले.