Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ताजनापूर उपसा योजनेचे पाणी दुष्काळी गावांना देण्याची मागणी
शेवगाव, २७ एप्रिल/वार्ताहर

तालुक्याच्या पूर्व भागातील कायम दुष्काळी पट्टय़ातील बाभळगाव, ठाकूर लिमगाव, राक्षी,

 

हसनापूर, माळेगाव, कोळगाव आदी गावांना ताजनापूर उपसा योजनेतून शेतीसाठी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी आमदार नरेंद्र घुले यांना निवेदन दिले. त्यात म्हटले की, तालुक्यातील ही गावे वर्षांनुवर्षे दुष्काळी असून, जानेवारीनंतर या भागातील विहिरींना पाणी शिल्लक राहात नाही. शेतीचा पाणी प्रश्न गंभीर असल्याने खरीप हंगाम संपल्यावर शेतकऱ्यांना उपजिविकेसाठी राज्यातील विविध साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडणीसाठी जावे लागते. वर्षांनुवर्षे हाच येथील शेतकऱ्यांचा नित्यक्रम झाला आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांना कोणतीही नगदी पिके घेता येत नाहीत.
केवळ बाजरी, कमी पाण्यावर येणारी कपाशी यावरच शेतकऱ्यांची गुजराण असून, अपवाद वगळता दारिद्र्याशी व नैसर्गिक संकटांशी लढाई करण्यातच शेतकऱ्यांच्या पिढय़ा व्यतीत झाल्या आहेत.
जायकवाडी धरणाच्या अस्तित्त्वानंतर धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेची घोषणा केली. आमदार घुले यांनी मोठा निधी उपलब्ध केल्याने योजनेतून पाणीही बाहेर पडले आहे. यातील बरीच कामे पूर्णत्वास गेली आहेत. पाणीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे
वरील गावांना पाणी देणे शक्य आहे. चारी किंवा कालव्याने पाणी देणे शक्य नसल्यास किमान या भागातील पाझर तलाव, नालाबंदिस्ती, बंधारे पाण्याने भरून देण्याची सोय केल्यास शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळेल.
या भागातील जमिनी हलक्या असल्याने या पाण्याने विहिरींना त्याचा फायदा होईल, याकडेही शेतकऱ्यांनी घुले यांचे लक्ष वेधले आहे.