Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘भांडवलदारांनी सहकार चळवळ बदनाम केली’
राहाता, २७ एप्रिल/वार्ताहर

सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या विश्वासाचा आत्मा जपत राज्यात सहकार

 

चळवळ वृद्धिंगत झाली असली तरी सहकारातील जीवनशैली आपण स्वीकारली नाही. मात्र, भांडवलदारांनीच सहकार चळवळ बदनाम केली, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केली.
पद्मश्री विखे पाटील यांच्या २९व्या पुण्यतिथीनिमित्त प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजिलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार बाळासाहेब विखे होते. या वेळी ‘मुळा-प्रवरा’चे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष सचिन गुजर, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, पं. स.चे सभापती सुभाष गाडेकर, ‘पायरेन्स’चे अध्यक्ष एम. एम. पुलाटे, भारत तांबे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष कारभारी ताठे उपस्थित होते.
पद्मश्री विखे पाटलांनी सहकाराचा प्रारंभ केला. त्यांच्याशिवाय सहकार पूर्ण होत नाही, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले की, लोकशाही आणि सहकार चळवळ या दोन गोष्टी एकमेकांना पूरक असल्याने सहकार चळवळ वृद्धिंगत झाली, तरी त्यातली जीवनशैली आम्ही स्वीकारली नाही. लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावू न शकणारी माणसेदेखील लोकशाहीचे मारक ठरतात. समाजातील हरणाऱ्या घटकाला सहकार चळवळीने खरा आधार दिला.
खासदार बाळासाहेब विखे म्हणाले की, राज्यात सहकार उभा राहिला यामागे तपश्चर्या होती. पद्मश्री विखे पाटलांच्या कामाची अजूनही समाजाला ओळख पटली नाही. त्यासाठी अधिक काळ लागणार आहे. जागतिकीकरणाचा सहकाराला कमी धोका आहे, चळवळीला नेत्यांचा धोका आहे. यासाठी सहकार चळवळीतील धुरिणांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे. सहकाराला मंदीच्या काळात सामाजिक दिशा देण्याची गरज महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. ही चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आता तरुणांनी खांद्यावर घ्यावी.
प्रारंभी श्री. म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. ऊसतोडणी कामगारांचा अपघाताने झालेला मृत्यू, त्यांच्या जळालेल्या झोपडय़ा, मृत झालेले बैल याचा विखे कारखान्याने विमा उतरविला होता. त्या विमा रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले. अण्णासाहेब कडू यांनी आभार
मानले.