Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तलावांनी तळ गाठल्याने माशांवर संक्रांत
कर्जत, २७ एप्रिल/वार्ताहर

उन्हाच्या कडाक्याची झळ मनुष्यालाच नव्हे, तर वन्यजीव, तसेच जलचरांनाही बसत आहे.

 

तालुक्यातील बहुतांशी तलावांनी तळ गाठला आहे. पाणी आटल्याने मासे तडफडून मरत आहेत. रवळगाव येथील तलावातील हजारो मासे मरण पावले.
दिवसेंदिवस तापमापकातील पारा वाढतच आहे. आज ४१ अंश सेल्सिअस तापमान होते. बहुतांशी तलावांनी तळ गाठला आहे. उन्हामुळे तलावातील उर्वरित पाणी गरम होते. त्यामुळे मासे थंडाव्यासाठी किनाऱ्यावरील चिखलात उडय़ा मारतात. मात्र, नंतर त्यांना जीव गमवावा लागत आहे.
वाढत्या उन्हामुळे जुलाब, उलटय़ांसारखे आजार होत आहेत. दूधधंद्यावरही उन्हाचा मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील अर्थकारण दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. दूध संकलन घटल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. उष्णतेमुळे गायांना वेगवेगळे आजार बळावत असल्यानेच दूधउत्पादन घटले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. वन्यजीवही पाण्याच्या शोधात गावकुसाजवळ येत आहेत. उन्हापासून गायी-म्हशींना संरक्षण मिळावे यासाठी दिवसातून दोनवेळा धुवावे. शक्य नसल्यास किमान पोते ओले करून अंगावर टाकावे, असा सल्ला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे