Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वैफल्यग्रस्त आरोपीचा दोनदा आत्महत्येचा प्रयत्न
नगर, २७ एप्रिल/प्रतिनिधी

मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्य़ातील आरोपीने वैफल्यग्रस्त होऊन लागोपाठ दोनदा आत्महत्या

 

करण्याचा प्रयत्न केला. सबजेल कारागृह व नंतर सरकारी रुग्णालयात त्याने हा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे नोंदवले आहेत.
अब्दुल रेहमान ऊर्फ एरार नवाब (रा. रोहनशाहनगर, बीड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला कोतवाली पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्य़ात अटक केली आहे. सध्या तो नगरच्या मध्यवर्ती जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याला जामीन मिळालेला नाही.
कारागृहात असताना त्याने पत्र्याच्या तुकडय़ाने हाताला कापून घेऊन शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. कारागृहातील पोलीस सुभेदार बाळप्पा गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपास सहायक उपनिरीक्षक पाठक करीत आहेत. तपासात अब्दुल याला फिटस् येत असल्याचे व तो वैफल्यग्रस्त असल्याचे आढळले.
उपचारासाठी अब्दुलला सरकारी रुग्णालयाच्या कैदी विभागात ठेवण्यात आले. शनिवारी दुपारी त्याने शौचास जायचे आहे असे सांगितले. गार्ड हवालदार मोहन लक्ष्मण मगर त्याला घेऊन गेले. शौचालयाचे दार बंद असताना काच फुटल्याचा आवाज आल्याने मगर यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. तेव्हा त्याने हाता-पायावर काचेच्या तुकडय़ाने कापून घेतले होते. ‘मला भेटायला आई-वडील येत नाही, मला जगायचे नाही’, असे तो शिवीगाळ करीत ओरडत होता. तोफखाना पोलिसांकडे मगर (पोलीस मुख्यालय) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवला आहे.