Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अक्षयतृतीयेचा सण पारंपरिक उत्साहात साजरा
नगर, २७ एप्रिल/प्रतिनिधी

अक्षयतृतीयेचा सण आज पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. आंबा खरेदीसाठी

 

शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ‘आनंदधाम’मध्ये वर्षीतप केलेल्या ७ महिलांचा साधू-साध्वींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
अक्षयतृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात करण्याची प्रथा आहे. ती पाळण्यासाठी आज बाजारात आंब्यांची मोठी उलाढाल झाली. रत्नागिरी, देवगड, हापूस, कर्नाटक, लालबाग, पायरी आदी प्रकारच्या आंब्यांची मोठी विक्री झाली.
आनंदधाममध्ये विनोदमुनी, आदर्शऋषी, महेंद्रऋषी, विशालऋषी, विमलकंवरजी, अर्चनाजी या साधू-साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला. ऋषभदेव यांनी वर्षभर उपवास केले होते. या उपवासाचे पारणे अक्षयतृतीयेला फेडले होते. या स्मृतिनिमित्त हा सण साजरा करण्यात येतो. वर्षीतप करणाऱ्या श्रीमती चांदाबाई नवलमल गुगळे, पुष्पाबाई हिरालाल भंडारी, विमलबाई सुमतीलाल संचेती (सर्व रा. नगर), सुनीता अभय गांधी (सुकेना, जि. नाशिक), नलिनी भिकचंद कांकरिया (पूर्णा, जि. धुळे), सुशीलाबाई फकिरचंद कोठारी (धुळे), विमलबाई जसराज संचेती (मालेगाव) या ७ भगिणींचा श्रावक संघ व धार्मिक परीक्षा बोर्डतर्फे हस्तीमल मुनोत व गोकुळ गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकमेकांना उसाचा रस देऊन अक्षयतृतीया साजरी करण्यात आली. गांधी परिवारातर्फे गौतमी प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती.