Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची मागणी
राहाता, २७ एप्रिल/वार्ताहर

साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिर्डीतील नागरिकांनी आज आंदोलन करून मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची मागणी केली.
आंदोलनाची चाहूल लागलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती इनामदार आज शाळेकडे फिरकल्याच

 

नाहीत. त्यामुळे त्यांना काळे फासण्याचा आंदोलकांचा मनसुबा पूर्ण झाला नाही. मात्र, व्यवस्थापनाने महिनाभरात मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई न केल्यास व्यापक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
शिर्डीचे उपाध्यक्ष अभय शेळके व नीलेश कोते यांच्या नेतृत्वाखाली शंभर युवक व महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सध्या या शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षीपासून या शाळेकडून लहान मुलांना येण्या-जाण्यासाठी बस पुरविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यंदा शाळेने पालकांकडून कोर्ट फी स्टॅम्प लावून आपण मुलांच्या जाण्या-येण्याची स्वत जबाबदारी घेत असल्याबद्दल हमीपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.
संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी डॉ. यशवंतराव माने आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी बी. डी. साबळे, पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे, संस्थानचे सुरक्षाप्रमुख दौलतगिरी गोसावी आदी उपस्थित होते. शाळेच्या खालावलेल्या गुणवत्तेबद्दलही नागरिकांनी तक्रारी केल्या. शाळेत प्रवेश देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, सध्या उपलब्ध असलेल्या दोन बसचे नियोजन करून बस सुरू करण्यात येईल तसेच आणखी बस सुरू करण्याबाबत व्यवस्थापनाची परवानगी घेण्यात येईल, पालकांनी हमीपत्र लिहून देण्याची अट रद्द करण्यात येईल, मुख्याध्यापिका इनामदार यांच्या निलंबनाची मागणी व्यवस्थापनापर्यंत पोहचविण्याची हमी डॉ. माने यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात पंकज लोढा, राजेंद्र गंगवाल, महेंद्र गोंदकर, सचिन चौघुले आदी सहभागी झाले होते. दरम्यान, गेल्या वर्षी व्यवस्थापनानेच जे पालक आपल्या मुलांची येण्या-जाण्याची सोय स्वत करतील, त्यांच्याच पाल्याला प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.