Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
व्यापार-उद्योग

यश बिर्ला समूह आरोग्यनिगा क्षेत्रात आक्रमक विस्ताराचे नियोजन
व्यापार प्रतिनिधी: यश बिर्ला समूहाने प्रवर्तित केलेली आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रांची शृंखला ‘बिर्ला केरला वैद्यशाळे’ने आपले नूतनीकृत केंद्र मुंबईत प्रभादेवी येथे सुरू केले आहे. पूर्वापार चालत आलेल्या उपचार पद्धतीच्या परंपरेचा धागा पकडून सुरू झालेल्या या आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक निर्माण होणाऱ्या गंभीर आजारांवर समग्र उपचार केले जातील. शहरी धकाधकीचे जीवन जगत असलेल्या लोकांसाठी ताणतणाव दूर करणाऱ्या खास आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म चिकित्सा पद्धतींचा येथे अवलंब केला जाईल.

निर्यातक्षम प्रकल्पातील एकंदर निर्यात २३,००० कोटींनी वाढली!
व्यापार प्रतिनिधी: विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेझ प्रकल्पांतून होणाऱ्या निर्यातीत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत ३३ टक्क्यांची भरीव वाढ झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. संपूर्ण देशातून होणाऱ्या निर्यातीची वाढ जेमतेम ४ टक्के असताना सेझ प्रकल्पांची प्रगती निश्चितच उल्लेखनीय आहे, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाणिज्य मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार सेझ प्रकल्पांतून मार्च २००९ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत ८९,००० कोटी रुपयांची निर्यात झाली.

ओएसएस समूहाचे रेल्वे-विमानाच्या तिकीटांच्या आरक्षणासाठी नवीन ‘पोर्टल’
व्यापार प्रतिनिधी: रेल्वे, बस, विमानाची ई-तिकीटे, ऑनलाइन शॉपिंग, मोबाइलचे ऑनलाइन रिचार्ज आणि अन्य प्रकारच्या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या मुंबईस्थित ओएसएस (वन स्टॉप शॉप) या तब्बल १००० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या समूहाने ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लि. (आयआरसीटीसी)’ या कंपनीबरोबर नवीन ‘रेल पोर्टल’ सुरू केले आहे.

इंडसइंड बँकेचे ७५ कोटींच्या मायक्रो फायनान्स व्यवहाराचे नियोजन
व्यापार प्रतिनिधी: बंधन, इंडसइंड बँक व ग्रामीण कॅपिटल इंडिया यांनी मायक्रोफायनान्स रिसिव्हेबल्स अंतर्गत रु. ७५ कोटींचा एक पोर्टफोलिओ तयार केला आहे. या व्यवहाराची रचना व समायोजन ग्रामीण कॅपिटल इंडियाद्वारा करण्यात आले आहे. वरील कर्जामध्ये बंधन- कोणनगर व बंधन फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारा कृषी व कृषीसंबंधित क्षेत्रांसाठी वितरित केलेल्या कर्जाचा समावेश आहे.

होंडाची नवीन अ‍ॅक्टिव्हा बाजारात
व्यापार प्रतिनिधी: होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. या कंपनीने अ‍ॅक्टिव्हाचे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. ११० सी.सी. होंडा इंडिनची शक्ती असलेली अ‍ॅक्टिव्हा १५ टक्के जादा मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. यात कॉम्बी ब्रेक हे नवीन वैशिष्ट आहे. या नवीन टेक्नॉलजीमुळे स्कुटरचालकाला ब्रेकिंगचे अंतर कमी करणे तसेच झटक्यात ब्रेक लावणे शक्य होणार आहे. याचे डिझाईन अभिनव असून हॉलोजन लॅम्प आहेत. तसेच याची बॉडी पूर्णपणे मेटलची आहे. स्कूटरच्या बाजारपेठेत अ‍ॅक्टिव्हाने गेल्या काही वर्षांत पाऊल टाकून या बाजारपेठेची दिशाच बदलली आहे. आता या नवीन मॉडेलमुळे होंडाला या बाजारपेठेत आपले पाय अधिक मजबूत करता येतील. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने १०.७ लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे. मागच्या वर्षांपेक्षा या विक्रीत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील वर्षी कंपनीने १२.५ लाख दुचाकी वाहनांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.

मर्केटोर लाइन्सला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी: मर्केटोर लाईन्स लि. कंपनीची सिंगापूरमधील उपकंपनी सिंगापूर लाऊन्स (सिंगापूर) लि. ला २००९ सालचा सिंगापूर कॉर्पोरेट पुरस्कार अलीकडेच प्रदान करण्यात आला. कंपनीचे शेअरबाजारातील मूल्य ३०० दशलक्ष डॉलर असून नव्याने नोंद झालेल्या कंपन्यांच्या यादीत हा पुरस्कार मिळाला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. मित्तल यांनी हा अलीकडेच एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. अशा प्रकारे भारतीय कंपनीस मिळालेला सिंगापूरचा हा पहिलाच पुरस्कार आहे. मर्केटोर लाईन्स ही भारतातील खासगी उद्योगातील दुसरी मोठी जहाज वाहतूक कंपनी असून त्यांचा कारभार जागतिक पातळीवर चालतो.

रोल्टाच्या ‘सीप्झ’मधील नव्या विकास व बटवडा केंद्राचे उद्घाटन
व्यापार प्रतिनिधी : रोल्टा कंपनीच्या सीप्झ- सेझ, अंधेरी येथील नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक विकास व बटवडा (डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिलिव्हरी सेंटर) केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. बहुमजली इमारतीत सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात एका पाळीमध्ये १५०० कर्मचारी बसण्याची क्षमता आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी प्रगत संगणक यंत्रणा तसेच दूरसंचार व सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पुरविण्यात आले आहे. जागतिक पातळीवर विश्वसनीय, निरंतर, किफायतशीर सेवा पुरविण्यासाठी मजबूत बॅकअप पॉवर व्यवस्था सुद्धा उभारण्यात आली आहे. तसेच या केंद्रात मोठमोठे प्रशिक्षण कक्ष, ग्राहक सेवा केंद्र व प्रेक्षागृह यांची सज्जता करण्यात आली आहे. नवे विकासकेंद्र रोल्टा कंपनीच्या अंधेरीस्थित एमआयडीसीमधील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्कच्या सान्निध्यात आहे. येथेच रोल्टा कंपनीचे जागतिक मुख्यालय असून याच कार्यालयात कंपनीच्या जीआयएस, इंजिनीअरिंग डिझाइन, एंटरप्राइज इन्फर्मेशन, दूरसंचार तंत्रज्ञान विकास व बटवडा केंद्र आदींचा समावेश आहे.