Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

‘कन्ये’साठीचा कल्पवृक्ष बहरणार,की सुकणार?
संदीप आचार्य

उत्तर- मध्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी चित्रपट अभिनेता दिलीप कुमार यांच्यापासून सलमान खान यांच्यापर्यंत अनेक सिताऱ्यांनी हजेरी लावली असून दिवंगत खासदार व चित्रपट अभिनेते सुनिल दत्त यांचा महिमाच प्रिया दत्त यांना तारणार असे आजचे चित्र आहे. कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी यांना या मतदारसंघातून भाजपने शेवटच्याक्षणी उमेदवारी दिल्यानंतर लढतीत चुरस निर्माण झाली असली मनसेच्या प्रचाराचा नगारा जोरात वाजत असल्यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

‘अफझल’ऐवजी ‘आनंद’ असता तर त्याला एव्हाना फासावर चढविण्यात आले असते
लालकृष्ण अडवाणी यांचा आरोप
अहमदाबाद, २७ एप्रिल/पीटीआय
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मते मिळविण्यासाठी यूपीए सरकार अफजल गुरूला फाशी देण्यास दिरंगाई करीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज येथे केला. ‘अफझल’ऐवजी ‘आनंदसिंग’ किंवा ‘आनंद मोहन’ या नावाचा आरोपी असता तर त्याला एव्हाना फासावर चढविण्यात आले असते, असे अडवाणी पुढे म्हणाले. मी गृहमंत्री असतानाच्या काळात अक्षरधाम मंदिर तसेच संसदेवर दहशतवादी हल्ले झाले त्याचे काय असा प्रश्न यूपीएकडून विचारला जात आहे.

अनेक मंदिरांना मदत केली, पण त्याचे भांडवल केले नाही - शरद पवार
मुंबई, २७ एप्रिल / खास प्रतिनिधी
राममंदिराचा मुद्दा भाजपच्या वतीने गेली दोन दशके सातत्याने निवडणुकीत केला जात आहे. सहा वर्षे सत्तेवर असताना राम मंदिराचा प्रश्न सोडविता आला नाही. याउलट आपण मुख्यमंत्रीपदावर असताना प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी, पंढरपूर, गणपतीमुळे मंदिरांच्या विकासासाठी मदत केली होती पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. मुंबईतील आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि संजय पाटील यांच्या प्रचारार्थ पवारांच्या प्रचार सभा झाल्या.

देशातल्या पहिल्या विलेक्शनची गोष्ट
ही गोष्ट आहे, तब्बल ७०-७५ वर्षांपूर्वी, म्हणजे १९३७ साली झालेल्या निवडणुकींची. तशी १९०९ साली एक निवडणूक झाली होती, नाही असे नाही; पण सर्वसामान्यांचा तिच्याशी काही संबंध नव्हता. १९३७ सालच्या निवडणुकींच्या वेळी एकतर मतदारांची संख्या बरीच मोठी होती. शिवाय निवडणुकींच्या रिंगणात काँग्रेस प्रथमच उतरली असल्यामुळेही असेल, पण तिलाच देशातली पहिली निवडणूक मानले जाऊ लागले. निवडणूक वगैरे शब्द बरेच नंतर आले. त्या वेळी आम्ही खानदेशातल्या एरंडोल गावी राहत होतो. बाकीचे सगळे निवडणुकीला ‘विलेक्शन’ म्हणत असल्याने आम्ही पण तसेच म्हणायला लागलो होतो.

‘नॅशनल कॉन्फरन्सला मतदान म्हणजे मनमोहन सिंग यांना मत’
अनंतनाग, २७ एप्रिल / पी.टी.आय.

राजीव गांधी आणि फारुख अब्दुला यांच्यामधील दुसऱ्या पिढीतील नेत्यांनी सोमवारी काश्मीर खोऱ्यात संयुक्त प्रचार सभा घेऊन प्रचाराची राळ उडवून दिली. राहुल गांधी आणि ओमर अब्दुल्ला या दोघांनीही येथे एकत्रितपणे सभांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. खोऱ्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती असून तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराला मत दिले की ते मत संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मनमोहन सिंग यांनाच दिल्यासारखे होईल असे आवाहन राहुल गांधी हे विविध ठिकाणी भाषणातून करीत आहेत. तुमचे अमूल्य मत मनमोहन सिंग यांच्यासाठी असून लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी नसल्याचेही राहुल आवर्जुन सांगतात. करकुली येथील नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवार मेहमूद बेग यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप प्रणित तत्कालिन लोकशाही आघाडी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. या आघाडीने लोकांच्यात विद्वेषाची भावना पसरविण्याचे काम केल्याचा आरोप करून हे देशाच्या एकतेला बाधा देणारे असल्याचे मत व्यक्त केले. कॉँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात खोऱ्यात विकासाची अनेक कामे झाल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, मी येथे एक पुढारी म्हणून आलो नसून येथील अनेक युवकांशी मला मैत्री करायची आहे.

सोनियांच्या सभेदरम्यान झाडावरून पडून एकजण ठार
सम्सी, २७ एप्रिल/पीटीआय

पश्चिम बंगालमधील सम्सी येथे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची आज जंगी प्रचारसभा झाली. सभास्थानी गर्दी झाल्यामुळे सोनियांचे भाषण ऐकण्यासाठी काही जण सभास्थानाशेजारील आंब्याच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसले. मात्र भारामुळे ही फांदी तुटून तिच्यावर बसलेले लोक आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या श्रोत्यांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत एक ठार व तीन जण जखमी झाले. सोनियांच्या सम्सी येथील सभेला प्रचंड संख्येने जमलेल्या श्रोत्यांना काबूत ठेवणे पोलिसांना काही वेळा अवघड जात होते. एक क्षण तर असा आला की आता चेंगराचेंगरी होणार की काय असे वाटावे.

उद्धव ठाकरे यांचा विक्रोळी ते ठाणे रिक्षाप्रवास
मुंबई, २७ एप्रिल/प्रतिनिधी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे ठाण्यातील सभेकरिता निघाले खरे पण विक्रोळीला ट्रॅफीकजाममध्ये तब्बल सव्वा तास खोळंबा झाला. अचानक ठाकरे आपल्या लँडक्रुजरमधून उतरले आणि त्यांनी रिक्षाला हात केला. गर्दीतून वाट काढत रिक्षा निघाली आणि तासभरात ठाणे गाठून तेथे सभेकरिता ताटकळलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य हे ठाण्यातील सभेकरिता निघाले. गाडय़ांचा ताफा विक्रोळी पुलापाशी खोळंबला. सात वाजता ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या ठाकरेंना सव्वाआठ वाजले तरी ठाण्याला वेळेवर पोहोचण्याची शक्यता दिसत नव्हती. अचानक उद्धव ठाकरे लँडक्रुजरमधून उतरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर खाली उतरले. संरक्षणाला असलेले दोन पोलीसही ठाकरे यांच्या पाठोपाठ धावू लागले. ठाकरे यांनी रिक्षा धरली. त्यांच्या शेजारी नार्वेकर बसले. पुढे दोन पोलीस रिक्षा चालकाच्या शेजारी. ट्रॅफीकजाममधून वाट काढत रिक्षा मुलुंड चेकनाक्यापर्यंत पोहोचली. पुढे ठाण्यात राजन विचारे उद्घव यांची रिक्षा शोधत होते. विचारे यांची गाठ पडल्यावर खिशातून शंभराची नोट काढून उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाल्याच्या हातावर ठेवली. नको, नको म्हणत असतानाही रिक्षावाल्याच्या खिशात ठाकरे यांनी ती नोट कोंबली. विचारे यांच्या मोटारीतून ठाकरे यांनी सभास्थान गाठले. ठाकरे यांनी रिक्षातून ठाणे गाठल्याचे कळल्यावर पोलीसही अवाक् झाले..